autoplay="autoplay"
loop="loop"
src="https://drive.google.com/uc?export=download&id=10JzzOwsCmszkbg_vCI5IDAaZsWZ7k_nJ">Your browser does not support the
audio
element.-दीपक तांबोळी
"शुभा,ए शुभा,उठ लवकर.अगं किती वेळ झोपून रहाणार आहेस?"संगीता आपल्या लेकीला ओरडून म्हणाली.
"झोपू दे ना आई.रात्री दोनपर्यंत मी झोपले नव्हते"
"हो!माहीतेय मला दोनपर्यंत तू काय केलं असशील ते!फेसबुक नाहीतर व्हाँटस्अप वर चँटींग या व्यतिरीक्त काय केलं असणार?अभ्यास तर केलाच नसशील.चल उठ लवकर.नऊ वाजलेत"
"तू ना बाई अशीच आहे.माहीतेय माझ्या मैत्रिणी दहापर्यंत झोपलेल्या असतात."
"चांगल्या मुलींशी तर तू मैत्रीच नको करु.आपल्या कामवालीची मुलगी बघ.सगळं आवरुन सकाळी सात वाजता आपल्याकडे हजर असते"
"ए बाई नको लेक्चर देऊस सकाळी सकाळी. उठते मी" शुभा धुसफूस करतच उठली.बेड न आवरता,चादरी तशाच बेडवर फेकून ती ब्रश करायला गेली.संगीताने हताशपणे तिचं बेड आवरलं.
हा प्रसंग आता रोजचाच झाला होता.ग्रँजुएशन आटोपल्यानंतर एमपीएससीच्या परीक्षेच्या तयारीसाठी शुभा घरीच होती.म्हणायला ती क्लासेसला जायची पण तिचं अभ्यासात लक्षच नव्हतं.सदोदित मोबाईल घेऊन व्हाँटस्अप नाहीतर फेसबुकवर तिचं चँटींग सुरु असायचं.त्याचा कंटाळा आला की टिव्हीवरच्या सिरीयल्स बघणं हेच तिचं जीवन बनलं होतं.एकुलती एक मुलगी म्हणून तिला रवी आणि संगीताने मोठ्या लाडाने वाढवलं होतं.तिचा प्रत्येक हट्ट पुरवला होता.त्यावेळची परीस्थितीही उत्तम होती.रवी एका कंपनीत चांगल्या पगारावर नोकरी करत होता.संगीता एम.एड असूनही तिला त्याने नोकरी करु दिली नव्हती.तशी गरजही नव्हती.पण सुखाचे दिवस फिरायला वेळ लागत नाही.रवीच्या कंपनीत दोन राजकीय पक्षांच्या युनियन स्थापन झाल्या आणि संघर्षाला सुरुवात झाली.काम कमी आणि भानगडीच जास्त होऊ लागल्या.प्राँडक्शन ठप्प झालं.पोलिस केसेस जास्त होऊ लागल्या.शेवटी कटकटींना कंटाळून मँनेजमेंटने कंपनीच बंद केली.हजारो कामगार बेकार झाले.रवीसारखे इमानदार अधिकारीही त्यात भरडले गेले.युनियन लिडर्सनी कामगारांची दिशाभूल करुन त्यांच्याकडून पैसे उकळले आणि कोर्टात केसेस दाखल केल्या.पण कोर्टातील प्रकरणं गोगलगाईच्या गतीने पुढे सरकत असतात.कंपनी बंद होऊन दहा वर्षं होऊन गेली तरी कोणताच निकाल लागला नव्हता.रवीला घरी बसावं लागलं तशी संगीताने एका शाळेत नोकरी धरली.'काही महिने मोफत काम करा मग पगार सुरु करु'असं तिला सांगण्यात आलं.कधीतरी पगार सुरु होईल या आशेवर संगीता शाळेत शिकवत राहीली.रवीनेही खटपट करुन एका सुपर शाँपीमध्ये मँनेजरची नोकरी मिळवली पण पगार अगदीच कमी होता.पाच वर्षानंतर एका संचालकाच्या ओळखीने संगीताला महिना पाच हजार पगार सुरु झाला.त्यालाही आता पाच वर्षं होऊन गेली होती अजूनही ती परमनंट नव्हती.
रवी नोकरीत असतांना त्यांनी कर्ज घेऊन घर बांधलं होतं.त्याचे हप्ते अजून सुरु होते.दोघांच्या तुटपुंज्या पगारात संसार कसातरी सुरु होता.पण शुभाला त्यांनी कोणतीही कमतरता भासू दिली नव्हती.ती अकरावीत असतांनाच तिला त्यांनी मोबाईल आणि लँपटाँप घेऊन दिले होते.आपली मुलगी माँडर्न टेक्नॉलॉजीत मागे पडायला नको आणि तिच्या मित्रमैत्रिणीत तिचं हसं व्हायला नको हा त्यामागचा हेतू होता.पण सोशल मिडीयात वावरण्याव्यतिरीक्त शुभाने या टेक्नॉलॉजीचा दुसरा वापरच केला नव्हता.बारावीत ती कशीबशी पास झाली होती.बी.एस्सीतही तिला चांगले मार्क्स नव्हते.आता एमपीएससी करायचं खुळ तिच्या डोक्यात कुणीतरी भरवलं होतं पण अभ्यास करण्याऐवजी दिवसरात्र ती मोबाईल घेऊन पडलेली असायची.संगीताला ती कोणत्याच घरातल्या कामात मदत करायची तर नाहीच उलट संगीतालाच ती आपल्या तालावर नाचवायची.त्यामुळे परवडत नसतांनाही संगीताला धुण्याभांड्यासाठी बाई लावावी लागली होती.शुभाचं वागणंही अतिशय उर्मटपणाचं होतं.त्याबद्दल आईवडीलांनी तिला अनेकदा समजावून सांगितलं होतं पण तिच्या डोक्यात काहीएक फरक पडला नव्हता.
या एप्रिलमध्ये संगीताच्या शाळेतले दोन शिक्षक निव्रुत्त होणार होते.त्यांच्या जागी संगीताची वर्णी लागण्याची शक्यता होती.कारण टेंपररी शिक्षकात तीच सिनियर होती.अपेक्षेप्रमाणे एक दिवस तिच्या ओळखीच्या संचालकांनी तिला बोलावून घेतलं.
"मँडम अभिनंदन. कालच संचालक मंडळाची मिटींग झाली आणि तुम्हाला परमनंट करण्याचा निर्णय घेण्यात आलाये " संचालक प्रफुल्लित चेहऱ्याने तिला सांगत होते.संगीताच्या आनंदाला पारावार उरला नाही.दहा वर्षाच्या मेहनतीचं फळ आज मिळणार होतं.
"धन्यवाद सर"
"पण तुम्हांला माहीत आहे आजकाल फुकट काही मिळत नाही.मँनेजमेंटने अकरा लाखाची डिमांड केली आहे"
संगीताचं उडणारं विमान एकदम जमीनीवर कोसळलं.
"काय्य.....अकरा लाख?सर मी इतके पैसे कुठून आणू?आणि सर तुम्हांला माहीत आहे मी पाच वर्षे अगदी फुकट शिकवलंय.नंतरची पाच वर्षही मी अक्षरशः पाच हजारात काम केलंय"
"मँडम तो विचार करुनच मी मँनेजमेंटला पैसे कमी करायला सांगितले. ते तर सोळा लाख मागत होते.आणि तुम्हाला कल्पना नसेल सोळा लाख देणारेही आहेत आपल्या स्टाफमध्ये.देणारे आहेत म्हणून तर मँनेजमेंटचं फावतंय.तेव्हा ही संधी चुकवू नका.पुढे परमनंट व्हायला तुम्हाला किती वर्ष लागतील सांगता येत नाही"
" सर थोडे थोडे करुन दिले तर चालतील?"
"साँरी मँडम.त्याकरता तुम्हांला चेअरमनसाहेबांना भेटावं लागेल.त्यांना चालत असेल तर आम्हांला काही प्राँब्लेम नाही "
चेअरमनचं नांव ऐकताच संगीता शहारली.चेअरमन एक नंबरचा स्त्रीलंपट माणूस होता.त्याची नजर अतिशय घाणेरडी होती.तिने त्याच्या लंपटपणाचे अनेक किस्से ऐकले तर होतेच पण त्याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात तिच्यासह इतर शिक्षिकांसोबत त्याने केलेली घाणेरडी लगट ती विसरली नव्हती.डोळ्यात आलेले अश्रू तिने कसेबसे आवरले.
"सर मी तुम्हांला तीनचार दिवसात कळवते"
"लवकरात लवकर कळवा म्हणजे आम्हांला तसा निर्णय घेता येईल"
तिने मान डोलावली.
घरी येऊन तिने रवीशी चर्चा केली.पण दोघांना कोणताच मार्ग दिसत नव्हता.आधीच घराचं कर्ज होतं.त्यामुळे नवीन कर्ज मिळणं कठीण होतं.इतके पैसे एकदम देऊ शकतील असे नातेवाईकही नव्हते.आणि असते तरी कुणाच्या उत्कर्षावर जळणारे पैसे थोडीच देतात!एक मंगळसूत्र सोडलं तर संगीताचे सगळे दागिने घराच्या बांधकामासाठी खर्ची पडले होते.त्यात दोघांनाही असं लाच देऊन काम करुन घेणं पसंत नव्हतं.
काहीच निर्णय न झाल्याने सात दिवस संगीताने संचालकांना काहीच कळवलं नाही.शेवटी पुढच्या आठवड्यात नको ती बातमी आली.प्रत्येकी सोळा लाख घेऊन मँनेजमेंटने तिच्यापेक्षा कितीतरी ज्युनियर असलेल्या शिक्षकांना परमनंट केलं होतं.
संताप,अपमान आणि दुःख यांची धगधग मनात घेऊन संगीता घरी परतली.घराचं दार सताड उघडं होतं.सोफ्यावर एक कुत्रं झोपलं होतं.सगळीकडे पसाराच पसारा होता.तिने कुत्र्याला हाकललं.शुभाला हाक मारली.कुठलाच प्रतिसाद आला नाही.ती शुभाच्या खोलीत आली.शुभा कानाला हेडफोन लावून मोबाईल बघत होती.संगीताने तिला दोनतीन हाका मारल्या पण तिने उत्तर दिलं नाही.संतापून संगीता तिच्याजवळ गेली.तिच्या कानावरचे हेडफोन तिने खेचून काढले.हातातला मोबाईल हिसकावला आणि जमीनीवर जोराने आपटला.त्याचे तुकडे तुकडे झाले.मग तिने शुभाला हाताला धरुन उठवलं आणि तिला बेफाम होऊन मारु लागली.शुभाला आई एवढी का संतापलीय ते कळेना.मारता मारता संगीताच्या तोंडाचा पट्टा सुरुच होता
"नालायक.जेव्हा पहावं तेव्हा हातात मोबाईल.जेव्हा.हातात मोबाईल.आईला काय त्रास होतोय,बापाला काय त्रास होतोय काहीच समजत नाही ना तुला!अभ्यास करायचा सोडून ही थेरं सुचताहेत तुला
नाही का?"
शुभा जोरजोरात रडायला लागली आणि संगीताच्या हातातल्या बांगड्या फुटल्या तेव्हाच संगीता मारायची थांबली.तिची नजर खाली पार्ट न पार्ट वेगळ्या झालेल्या मोबाईलवर पडली.संतापून तिने पायाने तो अजूनच चिरडून टाकला आणि मग रडत रडत ती स्वतःच्या बेडरूममध्ये गेली.बेडवर पडून ती ढसाढसा रडू लागली.
थोड्यावेळाने संतापाचा पूर वाहून गेल्यावर ती शांत झाली.शुभाच्या खोलीचा तिने अंदाज घेतला.एक भयावह शांतता पसरली होती.अचानक एका अनामिक भितीने तिला घेरलं.थोड्याथोड्या कारणांनी आत्महत्या करणारी मुलं तिला आठवली."बापरे हे काय करुन बसलो आपण!एका तरण्याताठ्या पोरीला मारलं!तिने काही जीवाचं बरंवाईट केलं तर!"
जीवाच्या आकांताने ती उठली.शुभाच्या खोलीत
धावत गेली.शुभाला बेडवर मुसमुसतांना पाहून तिचा जीव भांड्यात पडला.
रात्री संगीताने अनेक वेळा विनवणी करुनही शुभा न जेवताच झोपून गेली.रवी घरी परतल्यावर संगीताने त्याला सर्व हकिकत सांगितली. शुभाच्या वागण्याने तोही चिंतेत पडला.शुभा जिवाचं काही बरंवाईट करुन घेईल या विचाराने रात्रभर दोघांना झोप आली नाही.दोघंही आलटून पालटून शुभाच्या खोलीत जाऊन तिला पाहून येत होते.
रात्री लवकर झोपल्यामुळे शुभाला सकाळी सहा वाजताच जाग आली.अख्खा दिवस तिच्या समोर होता आणि टाईमपाससाठी मोबाईलही नव्हता आणि लँपटाँपचा कीबोर्डही काम करत नाहीये हे तिच्या लक्षात आलं.मनातल्या मनात तिने आईला शिव्यांची लाखोली वाहीली.
नाश्त्याच्या टेबलवर सगळे जमल्यावर रवी तिला समजावू लागला. "बेटा तंत्रज्ञान हे माणसाच्या सोयीसाठी,सुखासाठी असतं.याचा अर्थ असा नव्हे की आपण त्याच्या आहारी जावं.बघ इंटरनेट हा ज्ञानाचा महासागर आहे.व्हाट्सएप,फेसबुकवर आपण आपल्याला माहीत असलेली माहीती पटकन शेअर करु शकतो.माणसांना जवळ आणणारी ही माध्यमं आहेत.पण होतंय काय की माणसं जवळ येण्याऐवजी दूर होत चालली आहेत.याला कारण आपलं या माध्यमांच्या आहारी जाणं"
रवी बडबडत होता आणि शुभा कोणतीही प्रतिक्रिया न देता चहा पीत होती.अशी लेक्चर्स ती नेहमीच ऐकत आली होती.आणि अशा लेक्चर्सचा तिला कंटाळा आला होता.
आईवडील दोघंही कामावर निघून गेल्यावर शुभाला काय करावं ते कळेना.घरातला पसारा तिच्या पहिल्यांदाच लक्षात आला.ती उठली.पटापट सगळ्या रुममधला पसारा आवरला.भिंतींवरची जाळी काढली.कपाटं आवरली.धुळ साचलेले पंखे पुसून काढले.पुस्तकांच्या कपाटातली धुळ साफ केली.इतक्या वर्षात वडिलांनी जमवलेल्या या खजिन्याकडे तिचं लक्षच नव्हतं.एक पुस्तक तिने काढून पाहीलं.हिमालयाचं प्रवास वर्णन त्यात होतं.त्यातले फोटो पाहून आणि वर्णंन वाचून जग सुंदर असल्याची तिला पहिल्यांदाच जाणीव झाली.कामवालीचं काम झालं तशी तिने भांडी लावून दिली.रात्री उशीरापर्यंत जागल्यामुळे दुपारी तिला झोप यायची.आज झोप येत नसल्यामुळे तिने एमपीएससीचं पुस्तक काढून वाचायला सुरुवात केली.आश्चर्य म्हणजे आज वाचण्यात तिचं मन लागलं.संध्याकाळी ती क्लासमध्ये गेली.तिथंही तिचं मन एकाग्र झालं.संध्याकाळी संगीता शाळेतून परतली आणि चकाचक घर पाहून आश्चर्यचकीतच झाली.
शाळांना सुट्या लागल्या.संगीता घरी राहू लागली.पण दोघा मायलेकीत एकतर्फी संभाषण होतं.संगीता बोलायची पण शुभा 'हो''नाही' इतकंच उत्तर द्यायची.
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एक दिवस कामवाली आणि तिची मुलगी घरी आल्या.संगीताने त्यांच्या हातातला पेढ्याचा बाँक्स पाहूनच काय ते ओळखलं.
"काय गं दहावीचा रिझल्ट लागला वाटतं!किती मार्क्स मिळाले?"
" ९३ टक्के" मुलगी तिच्या पाया पडत म्हणाली.शुभा तिथंच बसली होती .ते ऐकून तिला आश्चर्याचा धक्काच बसला.
"ताई तुम्ही तिला शिकवलं नसतं तर ती पास सुध्दा झाली नसती.लई उपकार झाले ताई तुमचे आमच्यावर"
कामवालीच्या डोळ्यात अश्रू आले.
"अगं खरी मेहनत तर तिचीच आहे.झोपडपट्टीत राहून,लोकांची धुणीभांडी करुन,कोणतेही क्लासेस न लावता तिने हे यश मिळवलंय.तिचं कौतुक करावं तितकं कमीच आहे"
चारपाच दिवसांनी तिघं रात्री डायनिंग टेबलवर बसले असतांना रवी म्हणाला
"मी एक निर्णय घेतलाय.अँडिशनल इन्कमसाठी मी एल.आय.सी.ची एजन्सी घ्यायचं ठरवलंय.पण यामुळे मी खुप बिझी होणार आहे.बाहेरची कामंही तुम्हालाच करावी लागतील.चालेल?"
"अहो मी पण एक निर्णय घेतलाय.या शाळेत मी परमनंट होण्याचे चान्सेस आता फार कमी आहेत.मला एका नवीन शाळेतून आँफर आलीये.ते सात हजार देणार आहेत.मी ती शाळा जाँईन करायचं म्हणतेय"संगीता म्हणाली.
"अग पण ती बिगर अनुदानीत शाळा असणार.अशा शाळेत कधीच परमनंट करत नाहीत.म्हणजे आयुष्यभर तुला सरकारी पेस्केल कधीच लागू होणार नाहीत"
रवी निराशेने म्हणाला.
"मी काय म्हणते बाबा करु द्या आईला तिथे नोकरी" शुभा मध्येच बोलू लागली "आपल्या कामवालीच्या मुलीने आईची खुप पब्लिसिटी केलीये.आईच्या अनुपस्थितीत अनेक जण ट्यूशनसाठी चौकशी करुन गेलेत.मीही मग चारपाच काँलनीत फिरले.चाळीस मुलं तयार आहेत आईकडे ट्युशन्स लावायला.मी त्यांना ५००रु महिना फी सांगीतलीये.ते तयार आहेत.अशा रितीने महिन्याला वीस हजार आईला मिळत जातील.मला खात्री आहे विद्यार्थ्यांची संख्या जरुर वाढेल .मग आपण एखादी मोठी जागा भाड्याने घेऊ क्लाससाठी"
ते ऐकून संगीता हसली.
"अहो मँडम ते सगळं ठीक आहे.पण घरची,बाहेरची कामं कोण करणार?"
"मी आहे ना!"शुभा आत्मविश्वासाने म्हणाली.
"ते तुम्ही माझ्यावर सोडून द्या"
"अगं पण घरची कामं करशील तर एमपीएससीचा अभ्यास कसा आणि कधी करशील?"रवीने शंका उपस्थित केली.
"बाबा एक झोपडपट्टीतली मुलगी दहा ठिकाणी धुणीभांडी करुन ९३%मिळवू शकते तर मी घरातली काम करुन एमपीएससी क्लियर नाही करु शकत?"
तिचा आवेश पाहून रवी आणि संगीता दोघंही आश्चर्यचचकीत झाले.
"चला आमची शुभा मँच्युअर झाली म्हणायची.आता तुला नवीन मोबाईल घेऊन द्यायला हरकत नाही"रवी खुशीत येऊन म्हणाला
"नाही बाबा मी निर्णय घेतलाय,जोपर्यंत मी एमपीएससी क्लियर करणार नाही तोपर्यंत मोबाईल,लँपटाँपला हात लावणार नाही.आतापर्यंत मी आभासी जगात वावरत होते.गेल्या काही दिवसात मला वास्तव जग पहायला मिळालं आणि हे वास्तवातलं जग आभासी जगापेक्षा खुप सुंदर आणि क्रियाशील बनवणारं आहे हे माझ्या लक्षात आलं म्हणून मी हा निर्णय घेतलाय"
आपल्या मुलीचा समजुतदारपणा पाहून संगीताला गहिवरुन आलं.शुभाजवळ येऊन तिने तिला जवळ घेतलं.शुभानेही तिला मिठी मारली.का कुणास ठाऊक तिला आईबद्दल प्रेम वाटू लागलं.
© दीपक तांबोळी
9503011250
(ही कथा माझ्या " हा खेळ भावनांचा " या पुस्तकातील आहे
लेखकाच्या नावासहीत शेअर करायला हरकत नाही.माझ्या पुस्तकांच्या अधिक माहितीसाठी क्रुपया वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा)
0 टिप्पण्या