◾ध्येय वेडा :- नतमस्तक

 नतमस्तक


आपल्या आयुष्याच्या उतरणीला प्रत्येकाच्या डोक्यात एक विचार नक्कीच येऊन जातो,

आपल्या आयुष्यात कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या कारणाने संबंध आलेल्या लोकांना पैकी काही जणांना आपण छोट्याशा कारणावरून दुरावलेल असतं.कारण एकदम शुल्लक असतं पण आयुष्यभर ती माणसं दुरावली जातात. दुसरी मध्ये असताना एका मुलाने माझा चिमटा काढला होता कारण होतं ते मी त्याची पेन्सिल घेतल्याच.. शाळा संपली कॉलेज पूर्ण  झालं ,आयुष्याच्या उतरणीला आलो तरीसुद्धा मी त्या माझ्या बालपणीच्या मित्रांशीआयुष्यात पुन्हा एकदाही बोललो नव्हतो. बऱ्याच वेळा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये समोर येणे झालं होतं. तरीही नजरेला नजर लावली नव्हती. योग्य होतं का हे? मी माझ्या आयुष्यातील  माझा एक मित्र वजा केला होता.

 आपण आपल्या अहंकाराला विनाकारण जोपासत बसलो आणि सोन्यासारखी माणसं आपल्या आयुष्यातून एक एक करून दूर जात घालवतो.  एखादी  छोटीशी चूक ही आयुष्यभराची ताटातूट करण्यास बस होती. 

 आपण जसे जसे परिपक्व होत जातो तसं तसं लक्षात येतं की, भावना आणि अहंकार ह्यांच्यात असलेली सूक्ष्म रेषा योग्य वेळी जाणून वागायला हवं होत......

हे हव होत ते हवं होत हे कळेपर्यंत संपूर्ण आयुष्य संपण्याच्या कक्षेत कधी गेलं हेच समजलेले नसतं..

अश्या एखादा क्षणी आपण माघार घेऊन एखाद्याला  क्षमा सुद्धा करण्याच्या तयारीत असतो पण ..पण अहंकार हा  क्षमे पेक्षा  वरचढ ठरतअसतो आणि एक घाव दोन तुकडे करून रिकामा होतो..

भावना दुखावली असं आपण म्हणतो तेव्हा खूप वेळा भावना नाही तर अहंकार दुखावलेला असतो. 

अगदी एखादी आनंदाची बातमी जरी त्या दुखावलेल्या मित्राबद्दल कुणी दिली तरीसुद्धा आपल्याला थोडाही आनंद होत नाही. हे असं का?

 कुणाचंच कुणावाचून काही अडत नाही हे जरी खरं असलं तरीही  आयुष्यात आलेली चांगली माणसं जेव्हा गैरसमजुतींमुळे दुरावतात तेव्हा मात्र जर ती आपल्या आयुष्यात राहिली असती तर कदाचित जगणं अजूनही सुंदर आणि अर्थपूर्ण झालं असतं असं मात्र कधीकधी नक्कीच  वाटून जातं.... 

ब-याचदा तर समोरच्या वागण्याचा अर्थ  आपण आपल्या मतानुसार काढतो, तसा विचारही समोरच्याचा नसतो, तो सहज आपलं म्हणून वागत असतो.. परंतु आपण त्याचा चुकीचा अर्थ काढून समोरच्याला सहजपणे आपल्या आयुष्यातून काढून टाकायला मागेपुढे बघत नाही. आणि याच आपल्या अहंकाराला काहीही वाटत नाही...

असाच एक मित्र वीस वर्षांपूर्वी छोट्या कारणावरून तुटला गेला होता. मॉर्निंग वॉकला रोज त्याची भेट व्हायची. सुरुवातीला तो समोरून येताना दिसला की रस्ता बदलून पुढे जायचो. पण जसजसे उतरणीला लागल्यावर आपल्या चुका समजू लागल्या तेव्हा  रस्ता बदलल्याचं टाळू लागलो, सुरुवात फक्त स्मित हास्याने झाली.. असं बरच महिने सुरू राहिलं.  असा एक प्रसंग घडला, त्याचा आणि माझा एक कॉमनमित्र अचानक हार्टफेल मुळे आम्हाला सोडून गेला, त्याच्या अंत्यविधी साठी आम्ही सर्व मित्र घाटावर जमलो असताना एक डोक्यात विचार येऊन गेला कशासाठी आणि कुणासाठी आपण एकमेकाशी वैर करत बसतो? काय न्यायचे आहे जाताना?हा माझ्या डोक्यातील विचार  माझ्या न बोलणाऱ्या मित्राच्याही डोक्यात आला असावा, तो दुसर्या दिवशी सकाळी नेहमी प्रमाणे माझ्या समोरून येताना दिसला, मी थोडी दिशा बदलली पण तो   माझ्या समोर येऊन उभा राहिला व हात जोडून  मला म्हणाला ,"अण्णा काही चूक माझ्याकडून झाली असेल तर लहान भाऊ म्हणून माफ करा. खूप छोट आयुष्य आहे आपण असा अबोला धरायला नको’’

अचानकपणे उद्भवलेल्या या प्रसंगाला कसं रिऍक्ट व्हावं हे मला समजलं नाही.

ह्या गोष्टीचा मला त्या रात्री खूप त्रास झाला. भांडण व्हायचं कारण कितीतरी शुल्लक होतं मग त्याच्या छोट्या चुकीला मी माफ का करू शकलो नव्हतो ?

दुसऱ्या दिवशी सकाळी तो नाहामी प्रमाणे पुढून येताना दिसला ,समोर आल्यावर त्याच्या हातात  हात घेउन मी त्याला गुड मॉर्निंग म्हणालो, खूप वर्षांनी ताटातूट झालेल्या एखाद्या व्यक्तीने हातात घ्यावा आणि तो सोडूच नये या प्रमाणे मी त्याचा हात पकडून ठेवला होता. त्यावेळी  त्याच्या चेहर्या वरील जे भाव होते ते पाहून मला खूप मोठं समाधान देऊन गेले....

  त्या क्षणाला ठरवलं एक पाऊल मागे यायचं पण कुणाशीही कसलंही वैर करायचं नाही... शक्य असतील तेवढी तुटलेली नाती पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करायचा... कुणाची कितीही मोठी चुक असली तरी ती आयुष्यापेक्षा, नात्यापेक्षा  निश्चितच मोठ्ठी नसते या मतावर मी ठाम झालो.  इथून पुढे मात्र एक पाऊल मागे घेऊन अहंकाराला बाजूला ठेवून नवीन उमेदीने जुनी नाती टिकवण्याचा प्रयत्न करू लागलो .शांत झोप लागण्यासाठी हा माझा निर्णय पुरेसा होता .............


संजय पाटील 

९८२२१९९०००

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या