देवपूजा | Devpuja | mp3 | audiostory








www.FMmarathi.in







शिर्षक : देवपूजा
कॅटेगरी : प्रेरणादायी कथा
कॉपीराइट : Fmmarathi original©
कालावधी : ७ मी ६ से.
नॅरेटर : ॲडमीन 





फाटकाचा आवाज आला तसं मी दार उघडून पाहीलं तर एक म्हातारा बाहेर उभा होता.

     "फुलं घेऊ का?"  मी काही बोलण्याआधीच त्यानं विचारलं.

    "हो, घ्या ना..... "

    तो फुलं तोडू लागला. तसा मी इतक्या सकाळी झोप मोडल्याबद्दल चरफडत घरात शिरलो.

     मला नुकतीच पुण्यामध्ये नोकरी मिळाली होती. नशिबाने मला रुमही चांगली आणि पटकन मिळाली. रुमच्या बाहेरच अंगणात चांदणीचं झाड होतं. कायम पांढऱ्या फुलांनी लगडलेलं. मला या फुलांचा काहीच उपयोग नव्हता.  कारण माझ्याकडे देव नव्हते. गावाहून येतांना आईने मला श्रीराधाकृष्णाचा फोटो घेऊन जायचा खुप आग्रह केला, पण मी पडलो एक नंबरचा नास्तिक. आपलं भविष्य आपणच घडवतो असं वाटणारा! मी तो फोटो आणायचं टाळलं.

     म्हातारा रोज फुलं घ्यायला यायचा. आता तो विचारायचा नाही. माझी किंवा घरमालकांचीही त्याला हरकत नव्हती.

     एक दिवस घरमालकांना त्याच्याबद्दल विचारलं. त्यांनी जे सांगितलं ते ऐकून खुप दुःख झालं.

     म्हाताऱ्याचं नांव एकनाथ होतं. त्याच्या बायकोचा आणि मुलाचा अपघातात मृत्यु झाला होता. मुलीचं लग्न होऊन ती आफ्रिकेत स्थायिक झाली होती. आई आणि भावाच्या मृत्युनंतर वडीलांना घेऊन ती आफ्रिकेत गेली होती, पण जावयाच्या घरी रहाणं एकनाथ काकांना पटलं नाही. थोड्याच दिवसात ते भारतात परतले आणि आता एकटेच रहात होते.

     एक दिवस ते आले तेव्हा मी बाहेरच उभा होतो. त्यांच्या हातातल्या परडीत खुप वेगवेगळी फुलं होती. मी त्यांना विचारलं, "काका तुमच्याकडे खुप देव आहेत का?"

    "नाही हो, मोजकेच आहेत. का?"

    "मग इतकी फुलं का?"

    "अरे, भरपुर फुलं असली की देव कसे प्रसन्न दिसतात. आणि ते प्रसन्न दिसले की आपला दिवसही उत्साहात जातो...."

    "काका मी तुमच्याबद्दल मी ऐकलंय. एवढं सगळं होऊनसुध्दा तुमचा देवावर विश्वास आहे.....??"

    "बेटा, जे प्रारब्धात आहे ते देवांनासुध्दा चुकलं नाही. राम, कृष्ण अशी कितीतरी उदाहरणं आहेत. माझ्या मुलाचं आणि बायकोचं आयुष्यंच तेवढं होतं, त्याला देव तरी काय करणार....!!"

     "पण आता या वयात देव देव करुन काय मिळणार?"

    " काहीतरी मिळवण्या साठीच, स्वार्थासाठीच देवाची पुजा करायची नसते बेटा. देवावरच्या प्रेमासाठीसुध्दा पुजा केली पाहीजे....."

     मी हसलो. मला ते पटलं नाही. म्हणाल़ो, "आपल्या देशात मला नाही वाटत कोणी स्वार्थाशिवाय देवाला नमस्कार सुध्दा करत असेल"

     "का नाही?ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, रामदास अशी कितीतरी उदाहरणं आहेत की ज्यांनी नेहमी मानव कल्याणासाठी देवावर प्रेम केलं. स्वतःचा स्वार्थ कधी बघितला नाही.......!"

     मी चुप बसलो. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि हसून म्हणाले, "एकदा पुजा करुन बघ बेटा. बघ दिवसभर कसं प्रसन्न वाटतं ते. माझ्या एकाकी, निरस आयुष्यात या भगवंतामुळेच रंगत आहे. तूही तो अनुभव घे......!!"

     ते निघून गेले आणि मी विचारात पडलो. वाटलं, करुन बघायला काय हरकत आहे? नाही काही वाटलं तर सोडून देऊ.

    त्या दिवशी संध्याकाळी आॅफिसमधून येतांना राधाकृष्णाची फोटोफ्रेम आणि पुजेचं साहित्य घेऊन आलो.

     दुसऱ्या दिवशी बुधवार होता. मी सकाळीच लवकर उठलो. अंघोळ करुन राधाकृष्णाची फोटोफ्रेम टेबलवर ठेवली. गंध लावून हार घातला. फुलं वाहिली. निरांजन लावले. अगरबत्ती लावताच रुममध्ये प्रसन्न वातावरण तयार झालं. इच्छा नसतानाही मी राधाकृष्णांना नमस्कार केला. अंगावर शहारे आले.

    त्या पूर्ण दिवसात एकनाथ काका म्हणत होते तसं खरोखरच मला प्रसन्न वाटत होतं.


     या गोष्टीला आता चार वर्ष झालीयेत. मधल्या काळात खुप घडामोडी घडल्या. मी माझ्या आई-वडिलांसोबत एकनाथ काकांनाही चारधाम यात्रा, मथुरा वृंदावन गोवर्धन परिक्रमा घडवून आणली. महाराष्ट्रातल्या अनेक तीर्थक्षेत्रीही त्यांना घेऊन गेलो.

     काका कधी बोलले नाहीत, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान आणि माझ्याबद्दलची कृतज्ञता दिसून यायची.......

     दोन वर्षांपूर्वी काका वारले. त्यांची आफ्रिकेतली मुलगी- कविता, जावई आणि गोड चेहऱ्याची नणंद- सोनाली आले होते. काकांचं क्रियाकर्म त्यांच्या इच्छेनुसार  मीच केलं. या तेरा-चौदा दिवसात माझे आणि सोनालीचे सुर कसे कुणास ठावूक जुळून आले......

     सहा महिन्यांनी कवितेच्या नवऱ्याच्या ओळखीमुळे मला आफ्रिकेत गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळाली. त्यानंतर सहा महिन्यातच माझं आणि सोनालीचं, जात वेगवेगळी असूनही, बिनविरोध लग्न झालं.


    आज आफ्रिकेतल्या माझ्या बंगल्यात मी मोठं देवघर बनवून घेतलंय. खुप फुलं वाहून देवपुजा केल्याशिवाय मी घराच्या बाहेर पडत नाही.

    कधीकाळी मी नास्तिक होतो यावर माझा स्वतःचाच आजकाल विश्वास बसत नाही.....!!


एक हरे कृष्ण भक्त


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या