वेडा .... Veda

 वेडा

      दीपक तांबोळी


पार्टीचं ठरलं तसा आकाश सर्वांना म्हणाला

"अरे मिल्याला कळवून देवूया पार्टीचं.म्हणजे तो दुसरी कामं सोडून येईल.नाहीतर त्याचं चालतं मला हे काम आहे ,ते काम आहे"

"ए हा मिल्या आजकाल घरात फार लक्ष द्यायला लागलाय.त्याला एकदा समजवा रे.लग्न झाल्यावर करायचीच आहेत म्हणा घरातली कामं "

पुजा ओरडली.

" हो ना यार.थांब मीच त्याला फोन लावतो"

समीर म्हणाला आणि त्याने मिलींदला फोन लावला.

"ए स्पीकर आँन कर"आकाश समीरवर ओरडला तसा समीरने स्पीकर आँन केला

" हँलो मिल्या अरे या रविवारी आपण पार्टी ठेवलीये.येतोस का जरा इकडे.हाँटेलचं ठरवू या"

" साँरी यार समीर .मी आता ठरवलंय,वडिलांच्या पैशाने पार्टी करायची नाही"मिलिंद म्हणाला

"आता हे नवीन काय शोधून काढलंस?"

"नवीन नाही. आपण इंजीनियर झालो तेव्हाच मी ठरवलं होतं की जास्तीतजास्त सहा महिने वडिलांच्या पैशावर मजा करायची कारण एक मुलगा म्हणून वडिलांवर आपला तो हक्क आहे.पण सहा महिने होऊन गेलेत आपल्याला नोकरी नाही. आता वडिलांच्या पैशाने काहिच करायचं नाही. मी बाईकही वापरणं सोडलंय.सध्या सायकलवरुनच फिरत असतो आणि तेही काम असेल तरच.रिकामं फिरणं टोटली बंद.हा मोबाईलही नोकरी नाही मिळाली तर या महिन्याच्या शेवटी बंद होणार आहे"

" अरे मिल्या तुला वेड तर लागलं नाही ना?"आकाश त्रासून म्हणाला " घरात काही भांडण झालंय का?काका काही बोललेत का?"

"नाही रे!पण तुला माहित नसेल त्यांनी फार कष्टात दिवस काढलेत.कधी एक वेळ जेवून तर कधी उपाशी राहून.आज ते क्लास वन आँफिसर आहेत पण अजुनही त्यांची रहाणी किती साधी आहे हे तुम्हीही पाहिलं असेलच"

"मिल्या आमच्या सगळ्यांच्या वडिलांपेक्षा तुझ्या वडिलांना जास्त पगार मिळतो.पैशांची कसलीच कमतरता नाही. मग कशाला यार ही कंजूसी?बरं तुझ्याकडे नसतील तर आम्ही भरतो तुझे पैसे.पण तू ये यार"नयना चिडून म्हणाली

"नयना आणि माझ्या मित्रांनो माझी तुम्हांला विनंती आहे की तुम्हीही वडिलांच्या पैशावर ऐश करणं सोडून द्या.माझ्या वडिलांनी वयाच्या दहाव्या वर्षापासून कामाला सुरुवात केली आपण बावीसाव्या वर्षी करायला काय हरकत आहे?आपल्या आईवडिलांनी आपल्याला शिकवलं,मोठं केलं,कमावण्यालायक केलं.आता आपली जबाबदारी आहे की आपण त्यांच्यावर ओझं न बनता स्वकमाईवर जगलं पाहिजे"

" अरे पण कुणी नोकरी दिली तर आपणही करु.आपण कुठं नाही म्हणतोय?नोकरीच मिळत नाही तर आपण काय करणार?"

"इंजीनियरची नोकरी नसेल मिळत तर दुसरे जाँब करायला काय हरकत आहे?मी तर बघायला सुरुवातही केली आहे"

"ए बाबा तुला यायचं नसेल तर नको येऊ पण बोर नको करु यार.मी फोन बंद करतोय"

समीर वैतागून म्हणाला आणि त्याने फोन बंद केला

"यार हा मिल्या वेडा झालाय.हे आदर्शवादी विचार याच्या डोक्यात कुठून घुसले काय माहीत?"आकाश निराशेने मान हलवत म्हणाला "बरं मग पार्टी करायची की नाही?महिना झाला आपण बोर झालोय.मिल्या नाही आला तरी करु.काय म्हणताय?"

"ए पण आकाश मिल्याशिवाय कशीतरीच वाटेल रे पार्टी.मिल्या म्हणजे जाँली माणूस.नुसती धमाल आणतो पार्टीत"नयना म्हणाली

"बोडख्याचा जाँली.बघितलंस ना किती सिरीयसली बोलत होता.म्हणे वडिलांच्या पैशाने काहीच करणार नाही"पुजा करवादली

मग त्या सातही मित्रांचा बराच खल झाला आणि हो नाही करता करता शेवटी हायवेवरच्या"हाँटेल प्राईड" मध्ये पार्टी करायचं नक्की झालं.


हाँटेल प्राईड चांगलंच महागडं हाँटेल होतं.पण तिथे कुठेही मिळणार नाहीत असे चवदार पदार्थ मिळायचे शिवाय निसर्गरम्य वातावरणात छान ग्रुपमध्ये जेवता यायचं.ठरल्यानुसार आकाश,समीर,सुशांत अगोदरच पोहचले त्यांनी टेबल्स व्यवस्थित लावून घेतले मग नयना,पुजा,रश्मी,तनुजा पोहचल्या.

" यार मिल्या आला असता तर मजा आली असती"सगळे टेबलभोवती बसल्यावर आकाश म्हणाला

" मिल्याशिवाय ही आपली पहिलीच पार्टी असेल.तो नाही तर कसंतरीच वाटतंय" पुजा म्हणाली.तेवढ्यात एक सुटाबुटातला कँप्टन तिथे आला.त्याने तीन चार मेनूकार्ड टेबलवर ठेवली आणि अदबीने उभा राहिला.सगळ्यांच्या गप्पा सुरुच होत्या.

"एस्क्युज मी सर.काही स्टार्टर, कोल्ड्रिंक्स हवीत का सर?"

तो आवाज ऐकून समीरच्या डोक्याला झिणझिण्या आल्या त्याने चमकून त्या माणसाकडे पाहिलं आणि जोरात ओरडला

" मिल्या तू....?"

सगळा ग्रुप दचकून त्या माणसाकडे पाहू लागला

"अरे मिल्या तू इकडे काय करतोहेस?तुला कसं कळलं आम्ही इकडे येणार आहे?बसबस ती चेअर घे" 

आकाशचं आश्चर्य अजुनही कमी होतं नव्हतं

"साँरी सर मी तुमच्यासोबत बसू शकत नाही. आपण माझे आदरणीय कस्टमर आहात"मिलींद गंभीरपणे म्हणाला

"मिल्या ये जोक हमको बहुत अच्छा लगा.बसबस आता जास्त भाव नको खाऊस.तुला सरप्राईज द्यायचं होतं ना आम्हांला?"तनुजा हसत म्हणाली

"नाही मँडम.मला तुम्हांला सरप्राईज नव्हतं द्यायचं.मी इथला नोकर आहे.तुमची आँर्डर घ्यायला आलोय.काही स्टार्टर आणू का?

आमच्या इथलं व्हेज प्लँटर खुप छान आहे मँडम.हराभरा कबाबही मस्तच आहेत"

सगळे अवाक होऊन एकमेकांकडे पाहू लागले.एक आय.टी. इंजीनियर हाँटेलमध्ये काम करतोय हे त्यांच्या पचनी पडत नव्हतं.

"मिल्या तू खरंच इथे नोकरी करतोहेस की तू हे हाँटेल विकत घेतलंय की तू आमची गंमत करतोहेस? "

सुशांतने अस्वस्थ होऊन विचारलं

" नाही मी खरंच नोकरी करतोय.पाचच दिवस झालेत मला लागून"

"तुझ्या घरी हे माहित आहे?"नयनाने विचारलं

" हो तर.त्यांना आवडला माझा निर्णय.तुम्हांला माहितेय वेस्टर्न कंट्रीजमध्ये विद्यार्थ्यांनी वेटरचं काम करणं काँमन असतं.आणि बघा ना मी चांगला सुटाबुटात आहे.फक्त आपल्या पदार्थांची माहिती द्यायची आणि कस्टमरच्या आँर्डर्स घ्यायच्या एवढंच माझं काम.क्वचित प्रसंगी वेटरचंही काम करावं लागतं पण मला त्याची लाज नाही. कोणत्याही कामाची लाज बाळगायची नाही हे मी वडिलांकडून शिकलोय.शिवाय सुटेबल नोकरी मिळाली की ही नोकरी सोडता येईल.तोपर्यंत आपण आपल्या स्वकमाईचं खातोय याचं समाधान तर असेल"

सगळे कधी त्याच्याकडे तर कधी एकमेकांकडे बघत होते.मिलींदचे विचार त्यांना पटत होते पण असं धाडस आपल्याकडून कधीतरी होईल का?याची खात्री वाटत नव्हती.

आँर्डर्स दिल्या गेल्या.मिलींद त्यांची आँर्डर घेऊन दुसऱ्या टेबलवर गेला.स्टार्टर आलं मग जेवणही आलं पण आता कुणाचंही खाण्यात मन लागत नव्हतं.गप्पा तर बंदच होत्या जणू सगळ्यांच्या तोंडाला कुलुपं लागली होती.

" सर अजून काही मागवू.चहाकाँफी,आईसक्रीम, एनी डेझर्ट?"त्यांचं जेवण संपत आलेलं पाहून मिलींदने विचारलं

"मिल्या अरे दोन घास आमच्याबरोबर खा रे.तेवढंच आम्हांला बरं वाटेल.घासातला घास खाणारे आपण मित्र.तू वाढतोहेस आणि आम्ही खातोय कसं वाटतं ते"बोलताबोलता पुजाचे डोळे भरुन आले.

मिलींद खाली वाकला डिशमधल्या पापडाचे त्याने दोन तुकडे खाल्ले.मग वेटरला हाक मारुन हाँट वाँटर बाँऊल्स आणायला सांगितले.

"फ्रेडस् कसं वाटलं जेवण?परत येणार ना आमच्या हाँटेलमध्ये?"त्याने विचारलं

"तू इथे असेपर्यंत कधीच नाही"असं म्हणण्याचं सगळ्यांच्या ओठावर आलं होतं पण कुणाच्याच तोंडातून निघालं नाही.

सगळे बाहेर येऊन आपापल्या गाड्यांजवळ आले

" यार हा मिलिंद आपल्यातला सगळ्यात श्रीमंत मुलगा.पाँश वस्तीत आलिशान बंगला,चकाचक फोर व्हिलर.भावाचं आँटोमोबाईलचं दुकान. काय नाहिये त्यांच्याकडे ?आणि ही काय दुर्बूध्दी सुचावी त्याला.नक्कीच त्याच्या घरी भांडणं झाली असणार.त्याचा भाऊ किंवा वहिनी काहीतरी बोलली असणार.नाहीतर एक आय.टी.इंजीनियर कशाला हाँटेलमध्ये वेटरचं काम करील?"समीर म्हणाला

"तसं काहीच नाहिये" नयना म्हणाली "त्याचे भाऊ,वहिनी खुप चांगले आहेत.मी चांगली ओळखते त्यांना.शिवाय वडिल अजून नोकरी करतात आणि तो बंगलाही त्यांनीच बांधलाय.आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बी.ई.होऊन आताशी आपल्याला सहा महिने झालेत.आपले आईवडील अजून आपल्याकडून नोकरीची अपेक्षा करत नाहीत. मिल्याचे आईवडीलही करत नसतील.हाच वेडा आहे."

" हो खरंय.मलाही तेच वाटतं.आपण काँलेजमध्ये असतांनाही ह्याच्या डोक्यात समाजसेवेचं खुळ शिरलं होतं.ब्लड डोनेशन कँप अँरेंज कर,कधी पुरग्रस्तांसाठी कपडे पाठव,कधी बाबा आमटेंच्या श्रमसंस्कार शिबिराला मुलांना घेऊन जा.असे रिकामटेकडे उद्योग हा करायचा.नुसता वेडा पोरगा आहे"आकाश म्हणाला तशा सगळ्यांनी संमतीने माना डोलावल्या.रात्र झाल्यामुळे हळूहळू सगळे पांगले.




style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-7384059194066495"
data-ad-slot="7297264882">


घरी पोहचल्यावर ग्रुपमधल्या कुणीही मिलिंद बद्दल चकार शब्दही काढला नाही. कदाचित आईवडील आपल्यालाही असाच जाँब करायला लावतील अशी भिती सगळ्यांना वाटत होती.मात्र एक झालं की त्या दिवसानंतर सगळेजण कसून नोकरी शोधायला लागले.अनेक ठिकाणी अर्ज करण्यात आले.पण दोन तीन महिने झाले कुठूनच काही प्रतिसाद न मिळाल्याने परत एकदा सगळे सुस्त झाले.


एक दिवस समीरचा आकाशला फोन आला

"आकाश अरे आजचा पेपर बघितला का?"

"नाही रे.काही नोकरीची जाहिरात आलीये का?"

"अरे नाही. आपल्या मिल्याचा फोटो आलाय पेपरमध्ये.एका संस्थेने त्याला कचरा वेचणाऱ्या मुलांची शाळा चालवल्याबद्दल पुरस्कार घोषित केलाय"

" यार हा मिल्या म्हणजे येडाच माणूस आहे.काहिही करतो पागल.ती हाँटेलातली नोकरी सोडली का रे त्याने?"

"काय माहित! पण बहुतेक सोडलीच असणार. कारण या मुलांची शाळा चालवायला त्याला वेळ कुठून मिळणार?तू असं कर ,आपल्या सगळ्या ग्रुपला कळवून दे ही बातमी.म्हणजे त्याचं अभिनंदन तरी करता येईल"

आकाशने सर्वांना फोन लावून ही बातमी दिली.गेल्या तीन महिन्यात असंही कुणी मिलिंदशी बोललं नव्हतं.या निमित्ताने त्याच्याशी बोलता येणार होतं.पुजाने त्याला पहिला फोन लावला.

"हाय मिल्या कसा आहेस?तुझ्या पुरस्काराची बातमी वाचली.तुझं मनापासून अभिनंदन. पण का रे तू आम्हांला सांगितलं नाहिस तू हे काम करतोहेस म्हणून.आम्ही तर रिकामेच आहोत तुला मदत केली असती"

"पुजा अगं काँलेज सुटल्यापासून मी हे काम करतोय आणि मी तेव्हा तुम्हांला विचारलं देखील होतं की नोकरीला लागेपर्यंत गरीब मुलांना शिकवायला याल का म्हणून.पण तुम्ही सर्वजण म्हणालात की आम्हांला नोकरी मिळेपर्यंत लाईफ एंजाँय करायचंय म्हणून मी त्यानंतर काही बोललो नाही"

पुजाला ते सर्व आठवलं.त्यावेळी त्याच्या या समाजसेवी कल्पनेची सगळ्यांनी चांगलीच टर उडवली होती.

" तू नोकरी सोडलीस का रे मिलिंद?"तिने विषय बदलून विचारलं

" नाही गं.दुपारी तीन ते संध्याकाळी सातपर्यंत हाँटेलमध्ये फार गर्दी नसते.त्यावेळी या मुलांना शिकवतो"

"तुला काही पैसे मिळतात का शिकवण्याचे?"

मिलिंद हसला

"अगं कसले पैसे?ती कचरा विकून पोट भरणारी मुलं मला कुठून पैसे देणार.उलट त्यांच्या वह्या पुस्तकांचा खर्च मीच करतो"

पुजा जोरजोरात हसायला लागली

"मिल्या तू खरंच वेडा माणूस आहेस.काहीही करत असतोस.आयुष्य चांगलं एंजाँय करायचं सोडून कशाला या लष्कराच्या भाकरी भाजतोस"

"पुजा मला त्यात आनंद मिळतो म्हणून करतोय"


पुजाने फोन ठेवून दिला.

एकामागोमाग दिवस उलटत गेले.वर्ष उलटून गेलं तरी कुणालाच नोकरी मिळाली नव्हती.मुली घरकामात गुरफटलेल्या असल्यामुळे त्यांना कुणी काही बोलत नव्हतं.पण मुलांना मात्र आता आईवडील बोलायला लागले होते.आकाश,समीर,सुशांत बऱ्याचदा एकमेकांना भेटायचे.तिघांच्याही फँकल्टीज वेगवेगळ्या होत्या .तिघंही एकत्र बसून जाँबपोर्टलवर नोकऱ्या शोधायचे.कुठे व्हेकन्सी दिसली की त्यांना आनंद व्हायचा.फटाफट रिझ्युम पाठवले जायचे.पण बोलावणं कुठूनच यायचं नाही. क्वचित कधी लेखी परीक्षा असायच्या.त्या ते उत्साहाने द्यायचे.पण कुठेच काही क्लिक होत नव्हतं.नैराश्य आलं की मिलिंदला फोन करुन तो अजून हाँटेलमधलाच जाँब करतोय की त्याला इतर कुठे इंजीनियरची नोकरी मिळाली याची खात्री करुन घ्यायचे.मिलिंद त्यांच्यातला सर्वात हुशार मुलगा.त्यालाही अजून चांगली नोकरी मिळत नाहिये असं ते घरी सांगायचे.

दिड वर्ष झालं.आपल्या मुलींना आता नोकऱ्या मिळणं कठिण आहे हे पाहून तनुजा आणि रश्मीच्या आईवडिलांनी त्यांची लग्नं ठरवून टाकली.आता लग्नानंतरच नोकरीचं बघू असं म्हणून पुजा आणि नयनानेही कुठे अर्ज करणं सोडून दिलं.मुलांना मात्र तसं करणं शक्य नव्हतं.महत्प्रयासाने सुशांतला एका छोट्या कंपनीत नोकरी मिळाली. तीही फक्त पाच हजाराची.आकाश सिव्हिल इंजीनियर होता त्यालाही एका काँन्ट्रँक्टरकडे जाँब मिळाला पण पगार नियमित नव्हता.समीरने नोकरी मिळत नाही तोपर्यंत शिकून तरी घेऊया हा विचार करुन गेटची परीक्षा दिली होती.त्यात तो नापास झाल्यामुळे परत एकदा प्रयत्नाला लागला होता.


 दोन वर्ष उलटून गेले आणि एक दिवस मिलिंद चा आकाशला फोन आला.

" आकाश येत्या रविवारी हाँटेल सिल्व्हर पँलेसला पार्टी द्यायचा विचार आहे.जमेल का रे सगळ्यांचं?"

ते ऐकून आकाश उडालाच

" पार्टी आणि तू?काय चांगल्या कंपनीत नोकरीबिकरी लागली की काय तुला?"

"पार्टीला या सगळं सांगतो.बाकीच्यांनाही फोन करतोच आहे.संध्याकाळी बोलूच"

संध्याकाळी सगळे हाँटेलवर जमले.सगळ्यांच्या मनात हीच उत्सुकता होती की हा कंजूष मिलिंद पार्टी तरी कोणत्या आनंदाकरीता देतोय.याने लग्नबिग्नं तर ठरवलं नाही असाही संशय सगळ्याच्या मनात दाटून आला होता

सगळे बसून मसाला पापड खात असतांना पुजाने विचारलं

" मिल्या तुझी सायकल नाही दिसली रे आज"

" ती मी एका कचरा जमा करणाऱ्या मुलाला देऊन टाकली.त्याला बिचाऱ्याला कचऱ्याचं ओझं वाहून न्यायला खुप त्रास व्हायचा.आज मी बाईकने आलोय.अर्थात स्वतःच्या पैशाचं पेट्रोल टाकून"

सगळ्यांनी एकमेकांकडे पाहून मिलिंद वेडा असल्याचे इशारे केले.तेवढ्यात नयना बैचेन होऊन म्हणाली

"यार मिल्या सांग तरी का पार्टी देतोहेस ते.उत्सुकतेने माझं काळीज फुटून जाईल बघ आता"

मिलिंद गांभीर्याने म्हणाला

" ओके ओके.सांगतो.मित्रांनो माझा युपीएससीचा रिझल्ट लागला.मी कलेक्टर झालो"

"काय्यsssssss?तू कलेक्टर झालास?"

सगळे जोरात ओरडले आणि एकमेकांकडे आ वासून बघू लागले.सगळ्यांची बोलतीच बंद झाली

आकाश अगोदर भानावर आला

"मिल्या तू युपीएससीची कधी तयारी केलीस?आणि आम्हांला का नाही सांगितलंस?"

"आपलं काँलेज सुरु होतं तेव्हापासूनच मी अभ्यासाला सुरुवात केली होती.इंजीनियरींगमध्ये काही राम उरला नाहिये हे शिकत असतांनाच माझ्या लक्षात आलं होतं.पण क्लासेस लावून मला क्लासच्या फी चं ओझं वडिलांवर टाकायचं नव्हतं.त्याकरीता मग हाँटेलची नोकरी पटकन मिळाली म्हणून स्विकारली. त्या पगारात मग मी पुस्तकं मागवली आणि अभ्यास सुरु केला"

"अरे पण तू अभ्यास कधी करत होतास?नोकरी आणि ते कचरा वेचणाऱ्या मुलांना शिकवणं यामध्ये अभ्यासाला वेळ मिळायचा?"समीरने विचारलं

"माझा दिवस सकाळी चार पासून सुरु व्हायचा आणि अकराला संपायचा.सकाळी चार ते अकरा अभ्यास, अकरा ते दुपारी तीन हाँटेल,मग तीन ते सात मुलांना शिकवणं. हे शिकवतांनाही माझा बराच अभ्यास व्हायचा.सात ते अकरा परत हाँटेल.अकरा ते चार झोपणं.असं माझं रुटीन होतं.सायकल वापरत असल्यामुळे मी नेहमी फ्रेश असायचो.वेगळ्या व्यायामाची मला गरजच पडली नाही"

बसलेला धक्का अजून ओसरला नव्हता.तरीपण समीरने विचारलं

" मग आता कुठे पोस्टींग होणार आहे कलेक्टर साहेब?"

" अजून आँँर्डर यायच्या बाकी आहेत पण मी गडचिरोलीला प्रेफरन्स दिलाय.आदिवासी क्षेत्रात काम करायची माझी इच्छा आहे"

"शेवटी वेडेपणा केलाच ना!"नयना हसत म्हणाली

"अरे पुणे,मुंबई,कोल्हापूर सारखी सिटी मागून घेतली असती.हे काय गडचिरोली मागितलंस?"

"नयना खरा चँलेंजिंग जाँब तर तिथलाच आहे.आणि मला आवडतं गरीब आदिवासी लोकांसाठी काम करायला"

"ए तुला पगार किती असेल रे"आकाशने उत्सुकतेने विचारलं

"एक ते दिड लाखाच्या आसपास असेल असं वाटतंय.मिळाला की नक्की कळेल"

सगळ्यांचे डोळे विस्फारले. मुलांना त्याच्याबद्दल असुया वाटू लागली

" पगार तर पगार शिवाय गाडी ,बंगला,नोकरचाकर.मजा आहे बुवा.नशीबवान आहे आपला मिलिंद.यार कलेक्टर इज नाँट ए जोक" पुजा डोळे मोठे करत म्हणाली

मिलिंद हसला.मग चेहरा गंभीर करत म्हणाला

" पण मित्रांनो मी तुम्हांला खुप मिस करेन.आणि हो मी कलेक्टर झालो म्हणजे फार मोठा नाही झालो.सातवी आठवी नापास असलेले आमदार, खासदार आम्हांला त्यांच्या मागे फिरवतात,आमच्याशी नाही पटलं तर आमच्या बदल्या करतात.शेवटी आम्ही शासनाचे नोकरच असतो.तेव्हा बिनधास्त मला काँल करत जा.मी इथे आलो तर मला तुमच्या घराची दारं उघडी ठेवा"

त्याने तसं म्हंटल्यावर सगळ्यांना गहिवरुन आलं.सर्वांनी त्याच्या गळ्यात हात टाकले.

"मिल्या तू खरंच वेडा आहेस.अरे एक कलेक्टर आमच्या घरी येतोय म्हंटल्यावर आम्हांला त्याचा अभिमानच वाटेल ना?"आकाश रडत म्हणाला

" मिल्या तीन महिन्यांनी माझ्या लहान बहिणीचं लग्नं आहे.मी पत्रिका पाठवेनच.नक्की येशील बरं का?"सुशांत मिलींदचा हात हातात घेत म्हणाला

" अरे पिंकीचं लग्न ठरलं?अरे वा!कुठला आहे मुलगा?काय करतो?"

"मुलगा नाशिकच्या कलेक्टर आँफिसमध्ये क्लार्क आहे.तुझी कधी नाशिकला बदली झाली तर लक्ष ठेवशील रे बाबा माझ्या मेव्हण्याकडे" सुशांत म्हणाला तसे सगळे हसले.मग पार्टी चांगलीच रंगली.

दुसऱ्या दिवशी मिलींदचे फोटो वर्तमानपत्रात झळकत होते.तो भारतातून दुसरा आला होता ही गोष्ट काल त्याने पार्टीत कुणाला सांगितली नव्हती.एवढी अभिमानाची गोष्ट त्याने लपवून ठेवली याबद्दल मुलींना तो शिष्ट वाटला तर मुलांना निगर्वी.एका गोष्टीवर सगळ्यांचं एकमत झालं ते म्हणजे मिलिंद वेडा मुलगा आहे.आपण कलेक्टर झालो असतो तर सगळ्या गांवभर ढिंढोरा पीटला असता.यश सेलेब्रेट कसं करावं हे तर या मिलींदला समजतच नाही.

दिवस सरत गेले.चारही मुलींची लग्नं होऊन गेली.मिलिंद दोन लग्नांना आला पण दोन लग्नांना काही कारणास्तव येऊ शकला नाही.एम.ई.करुन समीर एका काँलेजला दहा हजार पगारावर अस्थायी प्राध्यापक म्हणून नोकरी करु लागला.आकाशला काँट्रँक्टरकडे नियमित पगार मिळत नसल्याने त्याने कंटाळून तो जाँब सोडला आणि मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर स्वतःच छोटेमोठे काँन्ट्रँक्ट घेऊ लागला.सुशांत आहे त्याच कंपनीत प्राँडक्शन मँनेजर झाला मात्र पगार त्यालाही चांगला नव्हता.

मिलींदचे दोनतीन वेळा पेपरमध्ये फोटो येऊन गेले.सर्वसामान्यांचा कलेक्टर, शासनाची गाडी असुनही सायकलीवर फिरणारा कलेक्टर ,आदिवासींसाठी कल्याणकारी योजना राबवणारा धडाकेबाज कलेक्टर अशी बरीच प्रशंसा त्याची होत होती.ग्रुपमधले सगळे त्या बातम्या वाचायचे आणि सोडून द्यायचे.वेडा म्हणता म्हणता मिलिंद त्यांच्या कितीतरी पुढे निघून गेला होता याची असुया त्यांच्या मनात होतीच.


एकदिवस एक सनसनाटी बातमी आली की सुशांतची बहिण पिंकी आपल्या सहा महिन्याच्या मुलीसह नवऱ्याला कायमचं सोडून माहेरी आली होती.सगळ्यांना खुप मोठा धक्का बसला.विशेष म्हणजे पिंकी दिसायला सुंदर होती.वागायला लाघवी होती.तिच्या तुलनेत तिचा नवरा दिसायला सर्वसाधारण पण संशयखोर आणि शिघ्रकोपी होता.तो पिंकीला कुठेही जाऊ द्यायचा नाही. तिला कुणाशी बोलू द्यायचा नाही. अगदी तिला दुधवाल्याशी आणि भाजीवाल्याशीही बोलायची त्याने बंदी घातली होती.हाँटेलमध्ये गेलं तर हाँटेलमधले लोक पिंकीकडेच पहातात असा त्याला संशय यायचा.मोबाईल वर बोलण्यावरुनही त्याने पिंकीशी बऱ्याचदा भांडण करुन तिला मारहाण केली होती.ती पदवीधर असल्यामुळे तिला नोकरीच्या संधी घरबसल्या चालून आल्या होत्या पण त्याने तिला कुठेही जाऊ दिलं नाही.त्याचा विक्रुतपणा इतका वाढला की पिंकीला झालेली मुलगी आपली नसून दुसऱ्याची आहे या भ्रमातून त्याने पिंकीला बऱ्याचदा मारहाण केली.एक दिवस त्याने तिच्या मुलीलाच मारुन टाकायचा प्रयत्न केला तेव्हा मात्र पिंकी तिथून पळून आली.

सुशांतचे वडिल ह्रदयरोगी होते.मुलीची ही वाताहत झालेली पाहून त्यांना हार्ट अटँक आला.सुशांत आणि त्याच्या मित्रमंडळीने वेळेवर धावपळ केल्याने ते वाचले.

पिंकीच्या प्रश्नावर तोडगा काढावा याकरीता सुशांतने सगळ्या मित्रमंडळीशी चर्चा केली.खुप काथ्याकूट झाल्यानंतर आकाशने त्याला मिलींदशी बोलायचा मार्ग सुचवला.नाशिकच्या कलेक्टरशी बोलून मिलिंद पिंकीच्या नवऱ्याला ठिकाणावर आणू शकतो असं त्याचं मत होतं.सुशांतलाही ते पटलं.त्याने मिलिंदला फोन लावला पण मिलिंदच्या सेक्रेटरीने साहेब बिझी असल्याचं सांगितलं.दोनतीन दिवस सुशांतने प्रयत्न केला पण कधी 'साहेब दोऱ्यावर आहेत','साहेब मिटिंगमध्ये आहेत' तर कधी ' साहेब खासदारांसोबत आहेत,मंत्र्यासोबत आहेत" अशी उत्तरं मिळत होती.कंटाळून शेवटी सुशांतने फोन करणंच बंद केलं.आपला मित्र हा आपला राहिला नाही याची जाणीव त्याला झाली होती.

पाचव्या दिवशी रात्री दहा वाजता त्याला अनोळखी नंबरवरुन फोन आला.

" हँलो सुशांत ना?"

"हो.आपण?"

"अरे सुशांत मी मिलिंद बोलतोय.तू तीनचार दिवसापासून फोन करतोय हे मला कळलं.पण तो आँफिशियल नंबर आहे.आणि मी खरंच बिझी होतो.साँरी यार.तुझा गैरसमज झाला असेल.बरं हा माझा पर्सनल नंबर आहे हा सेव्ह करुन घे आणि रात्री दहानंतरच फोन लाव.बरं बोल काय चाललंय?काही प्राँब्लेम तर नाही ना?"

सुशांतने मग त्याला पिंकीची सर्व कहाणी सांगितली.वडिलांना हार्ट अटँक आल्याचं सांगितलं आणि पिंकीच्या प्रकरणात त्याची मदत मागितली.ते ऐकल्यावर मिलिंद म्हणाला

" सुशांत मी नाशिकच्या कलेक्टरशी बोलतो आणि एस.पी.साहेबांनाही सांगतो.मात्र पिंकीने एक तक्रार पोलिस स्टेशनला करणं गरजेचं आहे म्हणजे आपण सगळ्या यंत्रणेला हलवू शकतो.पण मला काय वाटतं सुशांत,तो माणूस जर इतका विक्रुत आणि क्रुर आहे तर त्याच्यासोबत पिंकी किती दिवस संसार करु शकेल?.तू पिंकीला विचारलंस तर तीसुद्धा मला वाटतं नाहिच म्हणेल"

"हो तीसुद्धा नाहीच म्हणतेय.पण तिचा घटस्फोट झाला तर वडिलांना फार मोठा धक्का बसेल ते जिवंत रहातील की नाही तीच मला शंका वाटतेय. शिवाय माझ्या लग्नाचेही प्रयत्न सुरु आहेत.माझं लग्न जुळायलाही त्यामुळे अडचणी निर्माण होतील.माझी एक लहान बहिणही आहे ती मोठी झाली की तिलाही तोच प्राँब्लेम येऊ शकतो.म्हणून मला वाटतं तिचा संसार परत सुरळीत सुरु व्हावा. तुझ्या ओळखीने जर तो होऊ शकला तर बरं होईल"

" तू म्हणतोस तेही बरोबर आहे.ठिक आहे मी बोलतो कलेक्टर साहेबांशी.पिंकीचा संसार सुरळीत व्हावा असं मलाही वाटतं पण नवराबायकोचे संबंध फार नाजूक आणि क्लिष्ट असतात सुशांत. कितीही मोठ्या माणसाने 

 मध्यस्थी केली तरी ते पुर्ववत होतीलच याची काहिच शाश्वती नसते.तरी बघूया आपण प्रयत्न करु"

मिलिंदने फोन ठेवला.कलेक्टर असूनही तो आपल्याशी सविस्तर बोलला याचं सुशांतला समाधान वाटलं

दोनच दिवसांनी सुशांतला मिलिंदचा फोन आला

" सुशांत मी नाशिकच्या कलेक्टरशी बोललो.खरं तर स्टाफच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करायला ते तयार नव्हते.कलेक्टरसारख्या जबाबदार व्यक्तीला ते योग्यही दिसत नाही. पण मी विनंती केल्यावर त्यांनी तुझ्या मेव्हण्याला बोलावून घेतलं होतं.पण तो काही ऐकायलाच तयार नव्हता.उलट पिंकीबद्दलच त्याने त्यांना उलटसुलट सांगितलं.ती चरीत्रहिन आहे असंही तो म्हणाला.विशेष म्हणजे त्याने पिंकीला घटस्फोटाची नोटिसही पाठवलीये.ती नोटिस तुला आज उद्याकडे मिळेल.आपले समजवण्याचे सगळे मार्ग त्याने बंद करुन टाकले आहेत.मी तुला एक चांगला वकील देतो.नोटिस मिळाली की त्याला तू जाऊन भेट.तो तुला चांगलं मार्गदर्शन करेल आणि फीसुध्दा कमी घेईल""

ते ऐकून सुशांतच्या पायाखालची जमीन सरकली.जे होऊ द्यायचं नव्हतं तेच घडत होतं.

ती नोटीस त्याला दुसऱ्या दिवशीच मिळाली.त्यात पिंकीच्या नवऱ्याने पिंकीवर खोटेनाटे आरोप केले होते.तिला चरीत्रहिन ठरवलं होतं आणि घटस्फोटाची मागणी केली होती.पिंकीला त्याने नोटिसीबद्दल सांगितलं.तिलाही घटस्फोट हवाच होता पण नवऱ्याने केलेले घाणेरडे आरोप तिला मान्य नव्हते.त्या नोटिसीबद्दल घरात चकार शब्द न काढता सुशांत मिलींदने सांगितलेल्या वकीलाला जाऊन भेटला.मिलींदने पाठवल्याचं सांगितलं

" हो.मिलींदचा मला फोन आला होता.मिलींद माझ्या मानलेल्या बहिणीचा मुलगा.फार हुशार आणि चांगला मुलगा.कधीकधी जग ज्याला वेडेपणा म्हणतं अशा गोष्टी करत असतो पण त्याची तत्वं नंतर आपल्याला पटतात"

"हो खरंय"

"तुमची केस त्याने सांगितलीय मला.तुम्ही काही काळजी करु नका पण आपली गाठ एका विक्रुत माणसाशी हे विसरु नका.कोर्टात तो काहिही बोलू शकतो.तुमच्या बहिणीला आतापासून निगरगट्ट व्हायला सांगा"

सुशांतने मान डोलावली

सहा महिन्यांनी केस बोर्डावर आली.पुढचं एक वर्ष सुशांत आणि पिंकीसाठी खुप धावपळीचं,त्रासाचं गेलं.पिंकीच्या नवऱ्याकडे कसलेही पुरावे नव्हतेच.शिवाय पिंकीची मुलगी आपली नसल्याचा त्याचा दावा डि.एन.ए.टेस्टमुळे खोटा पडला.शेवटी घटस्फोट मान्य होऊन पिंकीला दहा लाख रुपये आणि महिन्याला दहा हजार रुपये पोटगी कोर्टाने मंजूर केली.

पिंकीच्या आयुष्यातला एक अध्याय संपला होता.मात्र फक्त बावीस वर्षाच्या पिंकीसाठी पुढचं आयुष्य कठीण होतं.एका लग्नाने पोळलेली पिंकी दुसऱ्या लग्नासाठी तयार होणं कठीण होतं.


त्याच दिवाळीत मिलींद घरी आला तेव्हा सुशांतला भेटायला आला

" पिंकीचं व्यवस्थित झालं ना सगळं?"त्याने सुशांतला विचारलं

" तुझ्या वकिलांनी खुप मदत केली.त्यामुळे फारशी अडचण आली नाही"

"पुढे काय करायचं ठरवलंय पिंकीने?तिच्यासमोर अख्खं आयुष्य पडलंय.एखादा योग्य मुलगा शोधून लग्न लावून टाक तिचं"

"आमच्या समाजात घटस्फोटीत मुलीचं लग्न होणं फार कठीण असतं मिलिंद. त्यातून तिला मुलगी आहे.त्या मुलीसकट तिला स्विकारणारा मुलगा हवा.तसा मिळणं जास्तच कठिण. शिवाय पिंकी मुलीला आमच्याकडे ठेवायलाही नाही म्हणते"

" मग आता काय करणार?तिला कुठेतरी नोकरीला लावून टाक म्हणजे तिचं आयुष्य थोडं सोपं होईल.कमवायला लागली की तिचा आत्मविश्वास वाढेल"

" तुझं म्हणणं ठिक आहे मिलिंद पण आजकाल नोकऱ्या मिळतात कुठे?माझंच बघ ना मी इंजीनियर असून पंचवीस हजारावर नोकरी करतोय"

तेवढ्यात पिंकी चहा घेऊन आली.तिच्या कडेवर तिची मुलगीही होती.तिच्या मुलीला पाहून मिलींद उभा राहिला आणि मुलीला घेण्यासाठी हात पुढे केले.गंमत म्हणजे मुलगी पटकन त्याच्याकडे गेली.

"अरे वा मोठी गोड मुलगी आहे" तिच्या गालाचा मुका घेत मिलिंद म्हणाला.मग तिला आपल्या मांडीवर घेऊन तो तिच्याशी गप्पा मारु लागला.तिला खेळवू लागला.तिची मुलगी खळखळून हसत होती.मिलिंद तिला कुणी परका आहे असं वाटतच नसावं कारण मिलिंद सुशांतशी बोलत असतांना ती त्याच्या गळ्यात हात टाकून बसत होती.ते द्रुश्य पाहून पिंकीला गहिवरुन आलं.तिच्या नवऱ्याने कधीच त्या मुलीचे असे लाड केले नव्हते.एका जिल्ह्याचा कलेक्टर इतक्या सहजपणे आपल्या मुलीशी खेळतोय यावर तिचा विश्वास बसत नव्हता.

" चल मी निघतो.उद्या लगेच गडचिरोलीला जायचंय.काका काकू आत आहेत का?मी भेटून घेतो त्यांना" मिलिंद म्हणाला.मग तो पिंकीच्या मुलीला तिच्याजवळ देऊ लागला पण ती आईकडे जाईना.शेवटी पिंकीने मुलीला जबरदस्ती ओढून घेतलं.मिलींद आत जाऊन सुशांतच्या आईवडिलांना भेटून आला.तो गेल्यावर पिंकी सुशांतला म्हणाली

"किती साधा आहे ना मिलिंद.तो कलेक्टर आहे असं थोडंसंही वाटत नव्हतं"

"साधा?वेडा आहे नुसता!शासनाची गाडी मिळत असुनही वेडा आपल्या बाईकने फिरतो.मी त्याच्या जागी असतो तर रुबाबात फिरलो असतो"


घटस्फोटीत मुलगी घरात असली की समाजालाच काय आईवडिलांनाही नकोशी असते.सुशांतच्या आईवडिलांचंही तसंच झालं.मुलीच्या धक्कयाने ते वारंवार आजारी पडू लागले.सुशांतला स्थळं येत होती पण घरात असलेली घटस्फोटीत बहिण मुलींना नको होती.त्यामुळे मुलींकडूनच सुशांतला नकार येत होते.पिंकीला ही गोष्ट कळत होती.तिने मुलीला घेऊन वेगळं रहायचीही तयारी दर्शवली पण पिंकीसारख्या सुंदर मुलीने असं एकटं रहाणं किती धोक्याचं आहे हे तो जाणून होता.शिवाय त्याचं बहिणीवर प्रेम होतंच.

आकाश आणि समीरची लग्नं ठरली.आता ग्रुपमध्ये सुशांत आणि मिलिंदच लग्नाचे राहिले होते.मिलिंदला चांगलीचांगली स्थळं येत होती पण गडचिरोलीत असेपर्यंत तो लग्न करणार नव्हता.सहासात महिन्यांनी त्याची कुठंतरी बदली होणारच होती त्यानंतरच तो निर्णय घेणार होता.


एक दिवस सुशांच्या वडिलांना परत एकदा हार्ट अटँक आला.सुशांतने धावपळ करुन त्यांना दवाखान्यात अँडमीट केलं.त्यांची तातडीने एंजोप्लास्टी करावी लागली.समीरने ही गोष्ट मिलिंदला कळवली.त्याने लगेच एक लाखाचा चेक पाठवून दिला.

तीनचार दिवसांनी मिलींदचा सुशांतला फोन आला.

"कशी आहे काकांची तब्येत?"त्याने विचारलं

"बरी आहे.डाँक्टरांनी त्यांना टेंशन घ्यायला नाही सांगितलंय पण ते काही ऐकत नाही"

"बरं.त्यांच्याजवळ दे फोन"सुशांतने वडिलांना फोन दिला

" कसं वाटतंय काका आता?"

"बरं वाटतंय साहेब.पण जीवाचं काही खरं उरलं नाही आता"

"अहो काका मला साहेब नका म्हणू.मी तुमच्या मुलासारखा आहे"

"नाही नाही. एवढे मोठे कलेक्टर तुम्ही.तुम्हांला साहेब म्हणावंच लागेल"

" बरं.कसलं टेंशन घेताय काका?"

"तरणीताठी पोर घरात बसलीये.अख्खं आयुष्य पडलंय तिचं.लग्न कर म्हंटलं तर नाही म्हणते.कसं होणार तिचं देव जाणे"

"काही काळजी करु नका हेही दिवस जातील"

"एकेक दिवस काढणं मुश्कील झालंय साहेब"

"काही तरी मार्ग निघेल काका.प्रत्येक समस्येला उपाय असतोच.धीर धरा.सगळं चांगलं होईल.द्या सुशांतला फोन"

त्यांनी सुशांतला फोन दिल्यावर मिलींद त्याला म्हणाला

"पिंकीच्या प्रश्नावर आपण एक दिवस चर्चा करु.तो प्रश्न मार्गी लावलाच पाहिजे"

"मलाही तेच वाटतंय रे पण काही सुचतच नाही"

"तिच्या लग्नासाठी तू काही स्थळं बघितलीत का?"

"ती तर लग्नच करायचं नाही म्हणतेय.पण मी तिचं नाव एका विवाह संस्थेत नोंदवलंय.दोन तीन घटस्फोटीतांची स्थळं आली होती पण अगदीच टुकार होती.मी परस्पर नकार कळवला"

"ओके.चल नंतर बोलतो तुझ्याशी.उद्या ग्रुहमंत्री येताहेत.त्यांच्या दौऱ्याची तयारी करायची आहे"असं म्हणून त्याने फोन ठेवला.


एक महिना उलटला पण मिलिंदचा फोन आला नाही. आकाश आणि समीरशी सुशांतचं बोलणं व्हायचं पण वैयक्तीक विषयांवर बोलणं सुशांत टाळत होता.तसंही दोघांचीही लग्नं ठरल्यामुळे दोघंही वेगळ्याच धुंदीत होते.त्यांना त्या धुंदीतून बाहेर काढायची सुशांतची इच्छा नव्हती.

एके रात्री त्याने स्वतःहूनच मिलिंदला फोन लावला.नशीब की मिलिंदनेच तो फोन उचलला.इकडच्या तिकडच्या थोड्या गप्पा झाल्यावर मिलिंदने त्याला विचारलं

" पिंकीचं कसं चालू आहे?तिच्या लग्नाचं किंवा नोकरीचं जमलं का कुठे?"

"नाही ना रे.तीच तर काळजी लागून राहिलीय.तुझ्या बघण्यात,तुमच्या स्टाफमध्ये एखादा घटस्फोटीत असेल तर सांगशील.दुसऱ्या जातीचाही चालेल.फक्त नोकरी चांगली पाहिजे आणि वयात फार अंतर नको"

थोडा वेळ शांतता पसरली.मग मिलिंद म्हणाला

"सुशांत एक प्रश्न विचारतो.रागवू नकोस. पिंकीबद्दल फक्त सहानुभूती आहे म्हणून विचारतोय.मी पिंकीशी लग्न केलेलं चालेल का रे तुला?"

तो प्रश्न ऐकून सुशांत गडबडला.नंतर त्याला त्या अनपेक्षित प्रश्नाने एकदम धक्का बसला.असा प्रश्न मिलिंद विचारेल असं स्वप्नातही त्याला कधी वाटलं नव्हतं.त्याला काय उत्तर द्यावं ते कळेना म्हणून त्याने परत विचारलं

" मिलिंद तू पिंकीशी लग्न केलेलं मला चालेल का हेच विचारतोहेस ना?"

"हो सुशांत आणि मी पुर्ण भानावर आहे.गेल्या महिन्याभरापासून मी तोच विचार करतोय.अर्थात माझ्या मनात पिंकीबद्दल तशी भावना कधीही नव्हती आणि अजूनही नाही. पण ज्या मनःस्थितीतून पिंकी आणि तुम्ही घरातले सर्वचजण जात आहात ते पाहून मला हा मार्ग सुचला.मी शांतपणे विचार केलाय.माझे आईवडिलही तयार आहेत.तू स्वतः शांतपणे विचार कर.पिंकीलाही विचार.घरातही या इश्यूवर चर्चा करा.मगच काय तो निर्णय घ्या.आणि हो तुम्ही नकार दिला तरी मला वाईट वाटणार नाही की मला रागही येणार नाही कारण आपल्या जाती वेगळ्या आपले संस्कार वेगळे,विचार वेगळे आहेत.आय अश्यूर यू आपली मैत्री कायम राहिल"

सुशांत अजून त्या धक्कयातून सावरला नव्हता

"ते ठिक आहे मिलिंद पण एवढा मोठा त्याग तू का करतोहेस?तुमच्या समाजात खुप छान छान उच्चशिक्षित हायफाय मुली असतांना आणि तू एवढ्या मोठ्या पदावर असतांना तुझ्यासारख्या हँडसम मुलाने पिंकीसारख्या घटस्फोटीत आणि एका मुलीची आई असलेल्या बाईशी लग्न का करावं?"

"कारण मला लोकांची दुःखं बघवत नाहीत सुशांत. सगळ्यांनी आनंदात रहावं असं वाटत रहातं.मी माझ्यापरीने दुसऱ्यांची दुःखं कमी करण्याचा प्रयत्न करत असतो.त्यात कधी यशस्वी होतो कधी होत नाही. पण प्रयत्न तर करायलाच हवेत ना?"

"ठिक आहे.मी पिंकीशी आणि आईवडिलांशी चर्चा करुन तुला कळवतो"

"आरामात कळव.मला घाई नाही.असंही दोन अडिच महिन्यांनी माझी कुठंतरी बदली झाल्यावरच मी लग्न करणार आहे"


तीन महिन्यानंतर विवाह नोंदणी कार्यालयात सर्वजण जमले होते.नयना,पुजा खास या लग्नासाठी मुंबईहून आल्या होत्या.रश्मी आणि तनुजा यांचं सासर गावातलंच असल्यामुळे त्याही हजर होत्या.आकाश, समीर आपल्या बायकांसोबत उपस्थित होते.प्रिती उर्फ पिंकी नववधूच्या वेशात खुप सुंदर दिसत होती.मिलिंदच्या परीवारासोबत सुशांतचा परीवारही हजर होता.त्यांच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वहात होता.कपाळावर लाल टिळा लावलेला मिलिंद अतिशय देखणा दिसत होता.त्याच्या देखण्या चेहऱ्यामागच्या सुंदर मनाचा विचार करुन पिंकीला वारंवार गहिवरुन येत होतं.तिच्या दोन वर्षाच्या गोड मुलीला आपल्या आईच्या लग्नाला उपस्थित रहाण्याचा मान मिळाला होता.मिलिंद आणि पिंकीने रजिस्टर वर सह्या केल्या.एकमेकांच्या गळ्यात हार घातले.सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.दोघांचे फोटो निघू लागले.आतापर्यंत सुशांतजवळ असलेली पिंकीची मुलगी आईकडे जाण्यासाठी उतावीळ झाली तसं मिलिंदने तिला कडेवर घेऊन फोटो काढायला सांगितला.

"चला आता पेढे खाऊ घाला"कुणीतरी ओरडलं तसं सुशांतने पेढ्यांचा बाँक्स उघडून पेढे वाटायला सुरुवात केली.आँफिसमध्ये गर्दी व्हायला लागली म्हणून काहीजण आँफिस बाहेर जाऊन थांबले.

"दादा शेजारच्या आँफीसमध्येही देऊन या ना.ते केव्हाची वाट बघताहेत"आँफिसचा कारकून सुशांतला म्हणाला

" बरं बरं.देतो "

सुशांत शेजारच्या आँफिसमध्ये पेढे वाटून बाहेर आला

" हा मिलिंद पण ना वेडा माणूस आहे"

सुशांत थबकला. आवाज त्याच्या ओळखीचा वाटला.बाजुच्या भिंतीआडून कुणीतरी बोलत होतं.समीर.नक्की समीरचा आवाज होता

" एवढा चांगल्या घरातला कलेक्टर झालेला माणूस.मोठमोठ्या घरातल्या एक काय शेकडो तरुण सुंदर पोरी लग्नाला तयार असतांना लग्न कुणाशी केलं तर एका मुलीची आई असलेल्या घटस्फोटीत बाईशी.मी तर कधीच तयार झालो नसतो"

" नाहितरी सुरुवातीपासून तो वेडाच आहे.जे दुसरे कधीच करत नाही ते तो करत असतो" हा रश्मीचा आवाज होता.सुशांत तिथे थांबला नाही पण त्याचे डोळे भरुन आले होते.पिंकी त्याची बहिण नसती तर तोही कदाचित हेच म्हंटला असता.

तो बाहेर आला.बाहेरच्या प्रांगणात त्याचा तोच वेडा मित्र त्याच्या लाडक्या बहिणीच्या जवळ उभा राहून फोटो काढून घेत होता.सुशांतला रहावलं नाही पुढे जाऊन त्याने आपल्या मित्राला घट्ट मिठी मारली आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून हमसून हमसून रडू लागला.


© दीपक तांबोळी

  9503011250

(ही कथा माझ्या "अशी माणसं अशा गोष्टी " या पुस्तकातील आहे.कोणतेही बदल न करता शेअर करण्यास हरकत नाही. माझ्या पुस्तकांच्या अधिक माहितीसाठी क्रुपया वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या