पाणी -दीपक तांबोळी
तिकीट काढून देवबा मुर्तिजापूरच्या स्टेशनमध्ये घामाघूम होत शिरला तेव्हा तीन वाजून गेले होते.मे महिन्याची ती दुपार.हवेत भयंकर उष्मा होता.अंगाची लाहीलाही होत होती.प्लँटफाँर्मवरच्या बाकावर त्याने नातवांना बसवलं.गर्मीमुळे त्यांचेही चेहरे सुकून गेले होते.पँसेंजर लेट झाली होती आणि तिला यायला अजून अर्धा तास अवकाश होता. थोडं पाणी प्यावं म्हणून त्याने पिशवीतली बाटली काढली तर ती रिकामी. ती ठेवून त्याने दुसरी बाटली काढली तर तीही रिकामीच.चमकून त्याने दहा वर्षाच्या नातीकडे पाहिलं तशी ती म्हणाली
"दादूने पिऊन टाकलं सगळं पाणी"
त्याने रागाने नातवाकडे पाहून विचारलं
"व्हय रं बेटा?"
नातवाने निरागसपणे मान डोलावली.त्याच्या चेहऱ्यावर केविलवाणे भाव उमटले.आजोबा आता मारतो की काय अशी भिती दाटून आली.देवबा त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून वरमला.त्याचा स्वतःचाच जीव तहानेने कासावीस होत होता.ही तर लहान मुलं होती.बसमध्ये देवबाचा डोळा लागलेला असतांना दोघांनी पाण्याचा थेंब न थेंब संपवून टाकला होता.त्यांच्यावर रागावून काहीच फायदा नव्हता.देवबाने रिकाम्या बाटल्या घेतल्या आणि तो प्लँटफाँर्मवर पाण्याचा शोध घेऊ लागला.पण एकाही नळाला थेंबभरही पाणी नव्हतं.त्याने समोरच्या प्लँटफाँर्मवर नजर टाकली.तिथल्या नळांना ही पाणी दिसत नव्हतं.स्टेशनमास्तरच्या आँफिससमोर उभ्या असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याला त्याने विचारलं
"बाबूजी पाणी हाये का कुठं?लेकरासाठी पाहिजे हुतं"
कर्मचाऱ्याने त्याला वरुन खाली बघितलं आणि म्हणाला
" बाबा मागल्या वर्षी पाणी पडलं होतं का?"
देवबाने नकारार्थी मान हलवली
" मंग कसं राहिन पाणी?आम्हांलेबी इथे प्यायले पाणी नाही. तुले कुठून दिवू?आमीबी बाहेरुन मागवतो.जाय त्या कँन्टीनमधी पाणी हाये" कँटीनकडे हात दाखवत तो म्हणाला.देवबा तिकडे गेला.
" बाबू पाणी हाये का?"
कँन्टीनमधल्या माणसाने पटकन फ्रिजमधून पाण्याची बाटली काढून त्याच्यासमोर ठेवली
"बीस रुपया"
" बीस रुपये?नाय.मले लेकरांसाठी थोडंसंच पाणी..."
त्या माणसाने ताबडतोब बाटली उचलून फ्रिजमध्ये ठेवली.
"खुल्ला नही है पानी.बाहर जाओ,हाँटलमें मिल जायेगा"
जिन्याने देवबा बाहेर आला.रोडावरच्या हाँटेलमध्ये त्याने बाटली दाखवत पाणी मागितलं
" बाबा चाय पिना है तो पिलो.पानी नही मिलेगा.बोतल दे दू?बीस रुपयेकी है"
देवबाने नकारार्थी मान हलवली आणि तो दुसऱ्या हाँटेलवर गेला.तिथून तिसऱ्या.चहाच्या टपऱ्याही त्याने सोडल्या नाहीत.पण कुणीच त्याला पाणी दिलं नाही. बाटली विकत घ्यावी का असा प्रश्न त्याला पडला.पण त्यासाठी वीस रुपये खर्च करणं त्याच्या जीवावर येत होतं.शेतकरी माणूस.दोन एकरची कोरडवाहू शेती.शेजारच्या शेतातल्या विहिरीचं पाणी विकत घेऊन तो आपली शेती करायचा.मागच्या वर्षी पावसाने डोळे वटारले,नद्यानाल्यातलं,जमीनीतलं पाणी सुकलं तशी ती विहिरही कोरडी पडली.अर्थात देवबाला हे नवीन नव्हतं.असं झालं की तो दुसऱ्याच्या शेतावर जाऊन मजुरी करायचा.त्यातून पदरी दोन मुली ,मुलगा नाही. कष्टाची आणि काटकसरीची देवबाला आणि त्याच्या बायकोला कायमची सवय जडली होती.मुलींच्या लग्नाचं त्याच्याही डोक्यावर कर्ज होतंच.पण मुली सासरी सुखाने नांदताहेत हीच त्याच्यासाठी समाधानाची बाब होती.शाळांना सुट्या लागल्या तसं भुसावळला रहाणाऱ्या धाकट्या मुलीने आपल्या मुलांना देवबाकडे सोडलं होतं.मुलांना गावात करमेनासं झालं म्हणून देवबा त्यांना भुसावळला सोडायला चालला होता.खरं तर देवबालाही त्यांनी रहावं असं वाटत नव्हतं.पाण्याचा प्रश्न बिकट झालेला.दहादहा दिवस पाण्याचा टँकर गावात यायचा नाही. आला की त्यावर मरणाची गर्दी व्हायची.दोन चार हंडे मिळाले की टँकर संपून जायचा.तेच मिळालेलं पाणी जपून वापरावं लागायचं.त्यातून नातवंडं दिवसभर पाणी मागत रहायची.मग देवबा सायकलवरुन
आठ किलोमिटरवरच्या ओळखीच्या शेतकऱ्याकडून पाणी आणायचा.पण आता त्याचं वय झालं होतं.तेवढ्या श्रमाने तो प्रचंड थकून जायचा
तो रिकाम्या बाटल्या घेऊन स्टेशनवर परतला.तहानेने त्याचाही जीव कासावीस झाला होता.नातवांजवळ तो आला तसं नातीने त्याला विचारलं
"आबा पाणी नाही मिळालं?दादू परत पाणीपाणी करतोय.मला पण तहान लागलीये"
नातवाचा रडवेला चेहरा पाहून पाणी कुठून तरी आणावंच लागेल या विचाराने देवबा उठला.तेवढ्यात त्याची नजर थोड्याच अंतरावर बसलेल्या कुटुंबाकडे गेली.साताठ जणांच्या घोळक्यात एक मोठा वीस लिटरचा जार त्याला दिसला.पण त्या लोकांच्या कपड्यावरुन ते मोठ्या घरातील लोक आहेत हे देवबाला कळलं.कुठल्यातरी एक्स्प्रेस गाडीची वाट बघत असावेत.त्यांना पाणी मागणं देवबाला उचित वाटेना.ते नाहीच म्हणणार हे नक्की होतं.सध्या कोण कुणाला पाणी देतंय त्यातून देवबा असा फाटका माणूस.समोर उभं तरी करतील की नाही देव जाणे.
"आबा पाणी पाहिजे" नातवाने त्याच्या हाताला स्पर्श करुन सांगितलं.त्याने नातवाकडे पाहिलं तर तोही त्या जारकडे बोट दाखवत होता.आता हिंमत दाखवावीच लागणार होती.त्याने एक बाटली पिशवीत टाकली आणि एक बाटली घेऊन तो तिकडे गेला.ती माणसं काहीतरी इंग्रजीयुक्त मराठीत बोलत होती.देवबाला तिथून पळून जावंसं वाटू लागलं.तो घुटमळला आणि परत नातवांकडे जायला निघाला.पण पाणी तर नेणं आवश्यकच होतं.काय करावं त्याला सुचेना
"काय बाबा काय पाहिजे?"कुणीतरी विचारलं
" दादा जरा पाणी पाहिजे हुतं.लेकरं लय तहानलीयेत"
तो एका माणसाला म्हणाला.तसे सगळेजण एकमेकांकडे बघायला लागले.त्यांचंही बरोबरच होतं.अशा भयंकर उष्म्यात आपलं पाणी दुसऱ्याला देणं म्हणजे स्वतःवर नामुष्की ओढवून घेण्यासारखंच होतं.
" अरे तिथे कँटीनमध्ये लागो तितक्या पाण्याच्या बाटल्या मिळतात.तिथून घ्या ना" एक बाई म्हणाली
" बाबा हे पाणी आमचं स्पेशल पाणी आहे.उकळून थंड केलेलं.ते आम्हांलाच पुरणार नाही. तुम्हांला कसं देणार?"
एक माणूस म्हणाला तसा अवघडून देवबा परत जाण्यासाठी वळला.
" थांबा बाबा"
देवबाने पाहिलं मध्यभागी बसलेला एक शेठजीसारखा माणूस त्याच्याकडेच बघत होता.देवबा थांबला तसा तो इतरांकडे बघत तो म्हणाला
"अरे पाणी विकत घेण्यासारखी बाबांची परीस्थिती असती तर ते आपल्याकडे पाणी मागायला आले असते का?आणि तहानलेल्याला पाणी पाजण्याइतकं पुण्य दुसरं नाही. बाबा किती जण आहात तुम्ही?"
"तीन जण"तीन बोटं दाखवत देवबा म्हणाला.त्या माणसाने खिशातून शंभरची नोट काढून एका तरुण मुलाला दिली आणि म्हणाला
"जा.बाबांना त्या कँटीनमधून तीन पाण्याच्या बाटल्या घेऊन दे"
देवबाच्या आनंदाला पारावार उरला नाही.आंधळा मागतो एक देव देतो दोन अशी त्याची मनःस्थिती झाली. तो त्या तरुण मुलासोबत कँटीनकडे गेला.मुलाने थंड पाण्याच्या तीन बाटल्या त्याला विकत घेऊन दिल्या.
" दादा लय उपकार झाले"
देवबा म्हणाला तसा तो मुलगा समाधानाने आनंदाने हसला. देवबा नातवांकडे आला.थंड पाण्याची बाटली पाहून नातवंडही आनंदली.त्यांनी झडप घालूनच बाटली हिसकावून घेतली आणि तोंडाला लावली.देवबानेही दुसरी बाटली उघडली आणि आपला कासावीस झालेला जीव शांत केला.
crossorigin="anonymous">
style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-7384059194066495"
data-ad-slot="7297264882">
पँसेंजर आली.प्रचंड गर्दी होती पण दाटीवाटीने का होईना देवबा आणि त्याच्या नातवांना बसायला जागा मिळाली.खिडकीतून उतरतीचं ऊन अंगावर येत होतं.छताचा पंखा आवाज करत गरम हवा फेकत होता.दोनतीन स्टेशन्स गेली असावीत देवबाला परत तहान लागल्यासारखं वाटू लागलं.या बाटलीतल्या पाण्याने तहान शमत नाही वारंवार लागते हे त्याच्या लक्षात आलं.आता विहिरीचं पाणी प्यायलो असतो तर दोन तास तरी तहान लागली नसती.त्याने मनाला आवर घातला.असं जर वारंवार पाणी प्यायलो तर भुसावळ येण्याच्या आधीच पाणी संपेल आणि मग ते विकत घेण्याशिवाय पर्याय रहाणार नाही हे त्याला पक्कं ठाऊक होतं.आणि पाण्यासाठी पैसे खर्च करण्याइतका तो नक्कीच श्रीमंत नव्हता.त्याच्याकडे आता फक्त दोनशे रुपये होते.भुसावळला उतरलं की मुलीच्या घरी नेण्यासाठी काहीतरी खाऊ घेणं,तिच्या घरापर्यंत रिक्षाला लागणारं भाडं,भुसावळ ते मुर्तिजापूर पँसेंजरचं भाडं,मुर्तिजापूरहून त्याच्या गावाला लागणारं एस.टी.चं भाडं यात ते दोनशे रुपये संपून जाणार होते.देवबा स्वाभिमानी होता .जावयाकडे कधीच त्याने एक रुपयाही मागितला नव्हता आणि आताही त्याच्यापुढे हात पसरणं त्याला कधीच आवडलं नसतं.
"आबा पाणी" नातू म्हणाला तशी पिशवीतून एक बाटली काढून त्याच्या हातात देत तो म्हणाला
" दादू आता घोट घोट पाणी पी रे भाऊ.नंतर कुठंच पाणी मिळणार नाही"
नातवाने मान डोलावली आणि बाटली तोंडाला लावली.घोट घोट कसलं घटाघटा पाणी पिऊन त्याने ती अर्धी संपवली.त्याचं झाल्यावर नातीने उरलीसुरली बाटलीही संपवून टाकली.देवबाने कपाळावर हात मारुन घेतला.खरं म्हणजे त्यांना पाणी पितांना पाहून त्यालासुध्दा पाणी प्यायची तिव्र इच्छा होत होती.पण कसंबसं त्याने इच्छेला दाबून टाकलं.
शेगांव आलं तसा कचोरीवाला डब्यात शिरला."गरम कचोरी,दसमें तीन,दसमे तीन" त्याच्या सोबतच कचोऱ्यांचा खमंग वास डब्यात शिरला.पोरं आता भुकेली झाली असतील त्यांना कचोरी घेऊन द्यावी का? असा विचार त्याच्या मनात आला खरा पण आपल्याजवळ फक्त दोनशे रुपये आहेत याच्या जाणीवेने तो चुप बसला.
" आबा मले कचोरी "नात म्हणाली.आता नातू चुप थोडीच बसणार होता.
"आबा मलेबी कचोरी"
कचोरीवाला आला तसं देवबाने त्याच्याकडून दहा रुपये देऊन तीन कचोऱ्या घेतल्या .तीनही कचोऱ्या त्याने नातीच्या हातात दिल्या.तिने एक भावाला देऊन एक स्वतःकरता ठेवली आणि तिसरी कचोरी देवबासमोर धरली.
"आबा कचोरी" तिचा समजुतदारपणा पाहून देवबाला हसू आलं.त्याने तिच्या डोक्यावरुन प्रेमाने हात फिरवला.
" दादूला देजो बेटा.नाहीतर तुम्ही दोघं अर्धीअर्धी खाऊन घेजा" कचोरी परत करत देवबा म्हणाला.पोरांनी कचोऱ्या खाल्ल्या आणि शेवटच्या बाटलीतलं पाणी अर्ध संपवून टाकलं.नाही म्हणता देवबानेच पाणी अर्ध असतांना त्यांच्या हातातून बाटली हिसकावून घेतली.
गाडीने नांदूरा सोडलं तसा देवबा बसल्याबसल्या पेंगायला लागला.खुमगांव बुर्ती गेलं तशी त्याला कसल्याशा आवाजाने जाग आली.एका लहान पोराचा तो रडण्याचा आवाज होता.त्याने डोळे उघडून पाहिलं तर एका भिकारणीच्या कडेवरचं पोरगं किंचाळत होतं.
"देरे दादा थोडं पाणी,पोरगं लई कावरंबावरं झालंय तहानेनं.देरे दादा,देवं माय.लई पुण्य मिळेल दादा"
भिकारीण गयावया करत होती.लोकांसमोर हात पसरत होती.
देवबाने समोरच्या प्रवाशांकडे पाहिलं,कुणीच पाणी द्यायला तयार दिसेना.उलट लोक आपापल्या बाटल्या लपवत होते.आणि तेही चुकीचं नव्हतं.या प्रचंड उष्म्यात पाण्याचं दुर्भिक्ष्य असतांना कोणं त्या भिकारणीला पाणी देणार होतं?
" बाबा दे रे पाणी पोऱ्याले" ती भिकारीण देवबाकडे पहात म्हणाली.देवबाला त्या पोराचं रडणं सहन होईना.न रहावून त्याने पिशवीतली बाटली काढली.पण हाय रे दैवा.बाटली खिडकीतून येणाऱ्या उन्हाने गरम झाली होती.ते गरम पाणी द्यायला देवबाला बरं वाटेना. तेवढ्यात "पानी बोतल"चा आवाज डब्यात घुमला.आणि पुढच्याच क्षणाला पाणी बोतलवाला समोर उभा राहिला.
"कित्येकी है बोतल?"देवबाने विचारलं
" पच्चीसकी"
"बाहर तो बीस की मिलती"
" स्टेशनपे मिलती होगी,गाडीमें पच्चीसकी है.दू?"
देवबा अडखळला.पंचवीस रुपये जास्तच होते.पाणी विकणाऱ्याचा त्याला संताप आला.भिकारणीने त्याच्याकडे मोठ्या आशेने पाहिलं.तिच्याकडेवरचं पोरगं रडतच होतं.भिकारणीच्या उजव्या बाजुला त्याच्या नातीच्याच वयाची पोरगी उभी होती.तहानेने तिचाही चेहरा कासावीस झालेला दिसत होता.त्याने निर्णय घेतला.
" दो.एक दो"खिशातून शंभरची नोट काढून त्याने पाणीवाल्याला दिली.पाणी वाल्याने एक बाटली काढून भिकारणीच्या हातात दिली.तिने झाकण उघडून कडेवरच्या पोराच्या तोंडाला लावली.तहानलेलं पोरगं घटाघटा पाणी पिऊ लागलं.देवबाच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू पसरलं.
" आबा आपल्यालेबी बाटली घेजो" नात म्हणाली तसा देवबा पाणीवाल्याला म्हणाला
"और एक बोतल दे दो"
भिकारणीच्या कडेवरच्या पोराने अर्ध्याच्या वर बाटली संपवली मगच ते शांत झालं.मग तिच्या पोरीने बाटली घेतली आणि उरलंसुरलं पाणी पिऊन टाकलं.
" अजून एक बोटल दे रे बाबा.मलेबी लई तहान लागलीये"
देवबाने विचार केला आणि पाणीवाल्याला अजून एक बाटली भिकारणीला द्यायला सांगितली
" बाबा कहाँ जा रहे हो"पाणीवाल्याने देवबाला विचारलं
"भुसावल"
"तो और एक ले लो ना.भुसावल आठ बजे पहुचेगी गाडी.साथमे बच्चे है,एक बोतलसे थोडेही काम चलेगा!"
तो बरोबर म्हणतोय हे देवबाच्या लक्षात आलं पण फक्त पाण्यासाठी शंभर रुपये खर्च करायचं त्याला मानवत नव्हतं.पण पुढे पाणी नाही मिळालं तर?
"दे दू बाबा?"
देवबाला काय उत्तर द्यावं ते कळेना.
" हां देऊन टाका"नात मध्येच म्हणाली तशी देवबाच्या उत्तराची वाट न बघता पाणीवाल्याने बाटली देवबाच्या नातीच्या हातात दिली आणि तो निघून गेला.देवबाने खिशातून पैसे काढून पाहिले.फक्त नव्वद रुपये उरले होते.पुढच्या खर्चाचं गणित कसं सोडवावं हे त्याला कळेना.पण तेवढ्यात त्याला भिकारणीच्या पोराचा पाणी पिऊन त्रुप्त झालेला चेहरा आठवला आणि त्याच्या मनातली रुखरुख कमी झाली.
मलकापूर गेलं.गाडीतली गर्दी आता कमी झाली होती.सहा वाजत आले होते.जीवाची लाहीलाही करणारा उष्मा आता कमी झाला होता.देवबा विचार करत होता.आता नव्वद रुपयात काहीच होणार नव्हतं.जावयाकडे पैसे मागावेच लागणार होते.जावई श्रीमंत नसला तरी देवबाला पाचशे रुपये सहज देऊ शकला असता.' ठिक आहे मनाला पटत नसलं तरी मागू.आजपर्यंत कधी मागितले नव्हते आता मागू.पोरीला शरमल्यासारखं होईल.तिला समजावून सांगता येईल.आणि आपण तर फक्त उसने मागणार आहोत.घरी गेलो की पाठवून देऊ परत ते पैसे.पण आज जे मनाला समाधान मिळालं ते काय कमी होतं?'
"बाबा हे घे तुह्ये पैसे"
त्याने चमकून वर पाहिलं.मघाची भिकारीण समोर उभी होती.तिच्या समोर पसरलेल्या हातात एक,दोन,पाच रुपयाची नाणी होती.देवबा आश्चर्याने तिच्याकडे बघतच राहिला.भिकाऱ्याने दिलेली भिक सन्मानाने परत करावी हे तो आयुष्यात पहिल्यांदाच बघत होता.
" नको नको.राहू दे"
" बाबा तुबी काय पैसेवाला दिसत नाही. पण तुले माणुसकी हाये.घे.भीक मागून जमा केलेत"
देवबाला काय करावं सुचेना.पन्नास रुपये घेऊनही त्याला पैसे मागावेच लागणार होते.पण त्याच्यासारख्या फाटक्या शेतकऱ्याला ते पन्नास रुपयेही कमी नव्हते.त्याची नजर आता समोर बसलेल्या आपल्या नातवाकडे गेली आणि तो भिकारणीला म्हणाला
" राहू दे बेटा.नातवांना पाणी पाजण्याचे कुणी पैसे घेतं का?"
" लय मोठ्या मनाचा हाये बाबा तू.देव भलं करो तुह्यं"
ती निघून गेली तसा देवबा हसला.भिकाऱ्याच्या आशिर्वादाने तो मालामाल होणार नाही हे त्यालाही माहित होतं.पण त्या आशिर्वादामागची खरी भावना त्याच्या ह्रदयाला भिडली होती.
रात्री आठ वाजता तो भुसावळला उतरला.स्टेशनच्या बाहेर येऊन त्याने मुलीसाठी पन्नास रुपयाचं फरसाण घेतलं.तिच्या घरी जाण्यासाठी त्याने रिक्षा थांबवली.रिक्षावाल्याला पत्ता सांगितला
" चाळीस रुपये"रिक्षावाला म्हणाला
देवबा हसला.थोड्याच वेळात तो कफल्लक होणार होता.पण का कुणास ठाऊक त्याला काळजी वाटत नव्हती.दिवसभरातल्या माणुसकी आणि क्रुतज्ञेच्या प्रसंगांनी त्याचं मन भरुन गेलं होतं
© दीपक तांबोळी
9503011250
(ही कथा माझ्या " गिफ्ट-भेट ह्रदयस्पर्शी कथांची " या पुस्तकातील आहे.नावासह शेअर करायला हरकत नाही.माझ्या पुस्तकांच्या अधिक माहितीसाठी क्रुपया वरील क्रमांकावर संपर्क साधावा.किंवा माझ्या फेसबुक पेजला भेट द्यावी)
0 टिप्पण्या