गुरूदक्षिणा ... Gurudakshina | Marathi Audiostory in mp3 Audiobook

 *"गुरूदक्षिणा"*


नयन...नयन नाव होतं त्याचं.

प्रचंड हुश्शार, सातवीत सगळ्या तुकड्यांमधे पहिला आलेला तो...आठवीत नेनेसरांच्या वर्गात.

हुश्शार मुलगा चांगलाच असायला हवा की नाही ? नयन नव्हता तसा. प्रचंड उपद्रवी, भांडखोर, ऊर्मट, एखाद्या डाॅनसारखा कुप्रसिद्ध, आपल्याच शिक्षकांना तोंडघशी  पाडणारा, शिक्षकांची व्यवस्थित  नक्कल करणारा, निगरगट्टासारखा मार खायचा, वर फिदीफिदी  हसायचा, १००% गाॅन केस, पोरं सोडा, शिक्षकसुद्धा वचकून असायचे त्याला. दुसरा कुणी असता, तर कधीच एल. सी. हातात मिळालं असतं..


*कारण एकच..त्याची हुशारी...☝*


स्काॅलरशीपच्या परीक्षेत सुद्धा जिल्ह्यात पहिला. 

शाळेला तो हवा होता आणि नकोही. 

१४ जून शाळेचा पहिला दिवस. 

नेनेसर 'आठवी अ' च्या वर्गावर निघालेले.


मोकाशी सर घाईघाईने आले.

" नेनेसर...बेस्ट लक 👍 पार्सल पाठवलंय तुमच्या वर्गात, नयन नावाचं. चांगला फोडून काढता जा त्याला. त्याशिवाय सुधारणार नाही तो..."


*नेनेसर कसनुसं हसले 😊*


पाच वर्षांची त्यांची सर्विस. एकही दिवस हातात छडी घेतली नाही कधी. ते काय फोडून काढणार ?


खरं तर नेनेसर स्वतः अतिशय हुशार.

शिकवण्याची पद्धतही वेगळी. 

पुस्तकाबरोबर पुस्तकाबाहेरचंही बरंच काही.


केमिस्ट्री  शिकवायचे. रिअॅक्शन लक्षात ठेवण्याचं, त्यांचं स्वतःचं भन्नाट टेक्निक होतं. खरं तर केमिस्ट्रीसारखा बोर विषय. जीव ओतून शिकवायचे. मजा यायची. चिडलेलं तर त्यांना कधी कुणी बघितलेलंच नव्हतं. मारणं तर दूर की बात, चांगल्याचं जाहीर कौतुक. कुणी चुकलं तर तास संपल्यावर थांबवत. हलकेच समजावून सांगत. जाहीर पंचनामा कधीच नाही.


*या सगळ्याची रिअॅक्शन काय ?*


नेने सर सगळ्यात पाॅप्युलर. त्यांच्या वर्गात कधीच गोंधळ नसायचा. पोरं मन लावून शिकायची. छान मार्कस् मिळवायची. वर्गातून ओरडण्याचा आवाज कधीच यायचा नाही. आलाच तर अधूनमधून हसण्याचा खिदळी आवाज, थोडक्यात काय ? 


नेनेसरांची त्यांच्या स्टुडन्टस्'शी व्यवस्थित केमिस्ट्री जुळायची.

पहिला दिवस.

पहिला तास.

अटेन्डन्स.

नयन दुसानीस.

नेनेसरांनी मान वर करून नयनला नीट बघितला.


हिरवे डोळे, 

डोक्यावर काटेरी केस साळींदरासारखे, 

निर्मळ चेहरा आणि ओठांवरचं छद्मी हास्य. 

कुठली तरी संधी मिळावी, म्हणून वाट पाहणारी बाॅडी लँग्वेज. चेहर्‍यावर हुशारीचं तेज. पण त्याला कोंदण मग्रुरीचं. नेनेसरांनी सहज वाचला त्याचा चेहरा. एक्स्ट्रा एनर्जी आहे या पोरात. निचरा होत नाहीये. हा चेहरा मास्क आहे. काहीतरी लपवणारा.


कळेल... 


दुसर्‍या दिवसापासून नयन फाॅर्मात, उपद्व्याप सुरू. नेनेसरांनी लेक्चर संपल्यावर थांबवला त्याला.


"घरी कोण कोण  असतं ?"

'वडील , भाऊ , आजी..'

" आई ? "

' हो, आईही आहे '

नयनचं नजर चोरणारं ऊत्तर नेनेसरांनी समजून घेतलं.


"तू सुधारला नाहीस तर तुझं नाही , 

माझं फेल्युअर असेल ते.

एक डील करू यात.

दिवसभरात तू चुकलास तर त्याची शिक्षा मी भोगेन.


तू एखादी चांगली गोष्ट केलीस तर ,

शाळेच्या नोटीसबोर्डवर तसं लिहून ठेवेन."

तसं रूटीनच सुरू झालं.

नयननं वर्गात कचरा केला.

नेनेसरांनी झाडू घेवून साफ केला.

नयननं बोर्डवर नेनेसरांचं ड्राॅईंग  काढलं..

नेनेसरांनी ते पुसलं नाही.

शाळेच्या नोटीसबोर्डवर लिहलं.

"नयन ऊत्तम चित्र काढतो. मधल्या सुट्टीत सगळ्यांनी, आठवी अ च्या वर्गात जाऊन बघावे."


मधल्या सुट्टीत सगळी झुंबड वर्गात. 

नयनला थोडीशी लाज वाटली. 

आंतरशालेय वक्तृत्वस्पर्धा.

नयनला पहिलं प्राईझ. 


पुन्हा नोटीसबोर्डवर नयनचं कौतुक.

नयननं एक नवीनच सुरू केलंय.

नेनेसर फळ्यावर लिहण्यासाठी वळले की,

नयन गडगडाटी हसायचा.

सगळ्यांना माहिती होतं, कोण हसतंय ते..नेनेसर काहीच झालं नसल्यासारखे पुढे शिकवीत राहिले.


नेमका प्रिन्सीपलसरांचा राऊंड. 

त्यांच्या कानावर हे हसणं गेलं.

ते वर्गात शिरले.

"नेनेसर तुम्हाला ऐकू येत नाहीये का ?

अशानं शाळेत डिसीप्लीन राहील का ?

कोण आहे तो शोधून काढा.

आणि घेऊन या माझ्याकडे.

रेस्टिकेट करतो त्याला."


"नको सर...

माझे सगळे स्टुडन्टस् चांगलेच आहेत. 

*"आय विल मॅनेज सर..."*

"काय मॅनेज करताय ?

तुमची स्ट्रॅटेजी बदला...

नाहीतर तुम्हालाच सरळ खालच्या वर्गावर टाकतो."

प्रिन्सीपलसर ताडताड निघून गेले.

मान खाली घालून नेनेसरांनी ऐकून घेतलं.


नयन हादरला. त्याचे हिरवे डोळे दाटून आले. तास संपल्यावर टीचर्स  रूममधे. सरांच्या पायावर डोकं ठेवून  ढसाढसा रडला. सरांनी पाठीवर हात फिरवून म्हणलं.

"मला माहित्येय, तुझं दुःख काय आहे ते.

माझी आईही, मी चार वर्षाचा असतानाच गेली.

तुझ्यासारखाच जगावर सूड ऊगवायचो मी.

ऊशीरा कळलं, मी चुकत होतो.

नयनला चांगल्या गोष्टींसाठी लोकांनी लक्षात ठेवावं , 

असं मला मनापासून वाटतं.

अजून एक ऐकशील.

तुझी नवीन आई तेवढीच प्रेमळ आहे.

तिला एक संधी दे..

कदाचित तुझ्या सख्ख्या आईची जागा ,

ती घेवू शकणार नाही..

पण तिचा सख्खा मुलगा तू नक्की होवू शकशील..."

त्या दिवसापासून नयन पार बदलून गेला.


हुश्शार, हवाहवासा, आपला नयन सगळ्यांचा लाडका, अगदी त्याच्या नवीन आईचाही. नयन नववीत गेला..

तरीही नेनेसरांचा लाडका विद्यार्थीच राहिला. 

नेनेसरांना भेटल्याशिवाय रहायचा नाही.


बघता बघता नयन दहावीत..

दहावीत शाळेतून पहिला.

नेनेसर खूष.

शाळा खूष.

आयआयटीच्या तयारीसाठी त्याला,  

पुण्याला ठेवला त्याच्या बाबांनी..

पुढे तो आयआयटी खरगपूरला गेला...


आज किती तरी दिवसांनी नेनेसर वाचू शकत होते. बहुधा तीन वर्षांनंतर. ती नकोशी आठवण.


शाळेच्या टेंपोमधनं नेनेसर, केमिस्ट्री लॅबसाठी मटेरियल घेवून येत होते. टेम्पोला झालेला अॅक्सीडेंट. फुटलेल्या काॅन्सन्ट्रेटेड अॅसीडच्या बाटल्या. तो अॅक्सीडेन्ट नेनेसरांचे डोळे घेवून गेला.


सगळीकडे अंधार, नेनेसरांना सवय झालेली.

"काही हरकत नाही. तीस वर्षे का होईना, जग बघितलंय मी. किती तरी लोक जन्मापासून अंधाराशी दोस्ती करून जगत आहेत."

तरीही..

नेनेसर काठी घेवून शाळेत यायचे.

मस्त शिकवायचे.

कुणीतरी स्टुडन्ट ते सांगतील तसं, फळ्यावर लिहायचे.

केमिस्ट्री शिकवायला, नेनेसरांना डोळ्यांची गरजच नव्हती.

शाळा नेनेसरांना सोडूच शकत नव्हती.

कालच नेनेसरांचं आॅपरेशन झालं.

कुणीतरी डोनर नेनेसरांना आपले डोळे देवून गेला. आज सकाळीच डोळ्यांवरची पट्टी काढली आणि हे पत्र...


*कितीतरी दिवसांनी नेनेसर अक्षरं वाचत होते.*

"....आणखी काय लिहू सर ?

तुम्ही जगाकडे बघायची खरी दृष्टी दिलीत. हा ज्ञानदीप कधी विझता कामा नये. सेकंड ईयरलाच कळलं, मला कॅन्सर आहे. एक वर्ष हाताशी... सर थर्ड ईयरला टाॅप करण्यासाठीच अभ्यास केला.

रिझल्ट लागेल तेव्हा मी नसेन.

माझे "डोळे" वाचतील तो रिझल्ट.

भरपूर छळलंय तुम्हाला सर...

पहिल्यांदा चांगलं काही करण्याची संधी मिळत्येय.

सोडणार नाही.

अशीच वाट दाखवत रहा..

न विझता...

*माझी ही गुरूदक्षिणा स्वीकारावी सर..."*

पुढचं वाचवेना. अक्षरानं ओळख सांगितलेली. नेनेसरांनी पटकन् आरसा मागितला. आरशात बघितलं. त्यांचे नवीन हिरवे डोळे पाझरत होते. 


*नवीन डोळ्यांनी एकच प्रश्न केला...*

*"आता तरी नयनला, लोक लक्षात ठेवतील ना सर ?"*


सरांनी आठवणीने डोळे मिटले. 

नयनचा हसरा चेहरा स्पष्ट दिसू लागला. 



*गुरू शिष्याच्या नात्याची एक हृदयस्पर्शी कथा* ❤

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या