पुण्याला निघाला होता विक्रांत, स्वतःच्या गाडीने. बॅटरीजचा व्यवसाय होता त्याचा... गाड्यांना, इन्व्हर्टर्सना, जनरेटर्सना लागणार्या बॅटरीजचा. एका कोरीअन कंपनीची, डिलरशीप होती त्याच्याकडे. आणि त्यामुळेच बेस जरी मुंबईत असला... तरी त्याला पुणे, नाशीक, कोल्हापुर, नागपुर वगैरे ठिकाणीही... सतत जा - ये करावी लागत असे. महाराष्ट्रातील अशा पाच - सहा महत्वाच्या शहरांतून, विक्रांतचं एक छोटं - मोठं युनिट उभं होतं. आणि प्रत्येक ठिकाणी, गरजेप्रमाणे स्टाफही होता. महिन्यातून ह्या काही ठिकाणी, किमान एकदा तरी चक्कर होतच असे विक्रांतची. पुणं, नाशीक जवळच असल्याने... तिथे तर दोन - तीन वेळाही, अगदीच आवश्यकता भासल्यास.
तर अशाच एका महत्वाच्या डिलसंबंधीत होणार्या मिटींगसाठी, विक्रांत आज पुण्याला निघालेला. जवळजवळ एखाद करोडचं काम होतं, एका फाॅरेन बँकेत... पर्चेझींग, इन्स्टाॅलेशन आणि सर्व्हिसींग पकडून. खुश होता त्यामुळे विक्रांत, आणि सुपर एक्साईटेडही. खोपोलीच्या अलीकडच्या फुडमाॅलला विक्रांतने, गाडी लेफ्टला घेतली. "जरा हलके होऊ, एक चहा पिऊ, सिगारेट मारु... आणि जाऊ पुढे" असा विचार करत. फ्रेश वगैरे होऊन विक्रांतने, डिस्पोजेबल ग्लासमधे चहा घेतला... नी बाहेर येत सिगारेट शिलगावली त्याने. पहिल्याच कशचा धूर बाहेर काढणार, तोच त्याचं लक्ष गेलं... त्याच्या अगदी बाजूला येऊन उभ्या राहिलेल्या एका वयस्कर बाईंकडे. अचानक तारांबळ उडत... धूर तोंडातच अडवावा लागल्याने, विक्रांतला ठसका लागला. आणि धूर आणिक जोरात बाहेर पडला. त्या जवळच उभ्या असलेल्या बाईंना, काहीच फरक पडला नव्हता धुराच्या वासाने वगैरे. त्यांनी शांतपणे हातातली एक चिठ्ठी, पुढ्यात केली विक्रांतच्या. 'घरकुल वृद्धाश्रम, खोपोली' असं लिहिलं होतं त्या कागदावर. योगायोगाने विक्रांतला माहिती होता तो पत्ता... अन् त्याने त्याप्रमाणे त्या बाईंना, गाईडही केलं. आणि अचानकच चपापला विक्रांत. पत्ता सांगतांना विक्रांतने, बर्याचवेळा बघितलं होतं त्या बाईंकडे. आणि आता त्याला, ओळख पटली होती त्यांची. मनातल्या मनातही मोठ्यानेच ओरडला विक्रांत... "ओ माय गाॅड... सबनिस मॅडम?".
आजीचा बटवा-रसोई गृप (फक्त लेडीज साठी) जॉईन होण्यासाठी खालील लिंक क्लिक करून मेसेज पाठवावा
विक्रांतने "ही बाई कटल्यावर उरलेली सिगारेट मारु"... असा विचार करत भले लपवून, तरी बोटांतच धरुन ठेवली होती सिगारेट. पण आता क्षणाचाही विलंब न करता, ती खाली टाकत बुटांनी विझवली त्याने. त्या बाई तोपर्यंत विक्रांतचे आभार मानत, वळून चालायलाही लागल्या होत्या. विक्रांतने एव्हाना गारेगार झालेल्या चहाचा घोट, घाईतच घेतला... आणि बाजूच्याच डस्टबीनमध्ये टाकला ग्लास. खिशातून हाॅल्सची गोळी काढत, ती तोंडात टाकली विक्रांतने. तोंडासमोर हात धरुन... दोनदा हवा बाहेर काढत त्याने, सिगारेटचा वास कमी झाल्याची खात्री केली. आणि तो जरासा धावतच, त्या चालू पडलेल्या बाईंच्या मागे जाऊन पोहोचला.
"अं... मॅडम... सबनिस मॅडम"
त्या बाईंनी वळतच... प्रश्नार्थक नजरेने पाहिलं विक्रांतकडे. पण अजिबातच ओळख न पटल्याचं, त्यांच्या डोळ्यांतून दिसत होतं.
"नमस्कार मॅडम... तुम्ही मला नाही ओळखणार... मे बी... मी... मी... विक्रांत... नाईन्टी फाईव्ह बॅचचा... रावसाहेब पागनिस हायस्कूल"
आता त्या बाईंच्या चेहर्यावरच्या प्रश्नचिन्हांच्या, दोनेक आठ्या निवळल्या होत्या. व्यक्तीशः ओळख पटली नसली तरी, आपला माजी विद्यार्थी... ह्यातलं किंचितसं कौतुक मिश्रीत सुख, त्यांच्या चेहर्यावर तरळलंच.
"अरे... हो का?... छान अरे छान... आनंद झाला हो तुला भेटून"
"थँक्यू मॅडम... पण... मॅडम हा पत्ता... आय मीन हा वृद्धाश्रमाचा पत्ता?"
सबनिसबाईंच्या चेहर्यावर, खिन्नता पसरली क्षणार्धात. पदराच्या टोकाने त्यांनी तोंड आणि मान टिपत, इकडे तिकडे बघत... विक्रांतचा तो प्रश्न टाळला.
"मॅडम... तिथे त्या शेडखाली खुर्च्या आहेत... आपण तिथे जाऊन बसूया का जरा?... तुम्ही दमल्यासारख्या वाटताय... जरा चहा - पाणी करा, नी मग निघा"
"बरं... चल"
विक्रांत सबनिसबाईंना थेट न पकडता, त्यांच्या चालीने चालू लागला. अशा बेताने की त्या कूठे अडखळल्याच, तर हा लगेच त्यांना सावरु शकेल. अखेर त्या शेडखालील खुर्च्यांवर, येऊन बसले दोघे. विक्रांतने सर्वात आधी, बिसलरीची नाॅर्मल बाटली मागवली. स्वतः ग्लासात पाणी ओतून त्याने तो ग्लास, सबनिस मॅडमच्या पुढ्यात नेला. सबनिसबाईंनी घटाघट पाणी प्यायलं... पुन्हा पदराच्या टोकाने तोंड पुसलं... आणि किंचितसा कृतार्थ भाव डोळ्यांत आणून, त्या मंदशा हसल्या. विक्रांतने त्यांना विचारुन, फिल्टर काॅफीची आॅर्डर दिली.
"मॅडम... तुमची काही हरकत नसेल तर आता सांगाल का, की तो घरकुल वृद्धाश्रमाचा पत्ता तुम्ही का विचारत होता?"
"तिथे भरती व्हायला चाललीये मी... वर्षभराकरता... बहूतेकतरी"
"व्हाॅट?... तुम्ही तिथे भरती होताय?... का मॅडम?... आणि हे वर्षभराचं लाॅजिक नाही कळलं"
"हे गेल्यानंतर जाणवायला लागलं रे, की तीनशे पासष्ट दिवसांचं वर्ष असतं. कारण अगदी एकेक दिवस जाणवायला लागला होता. मला दोन मुलं, दोघेही आपल्याच शाळेतले... तुला कदाचित माहितही असतील. तर हे गेल्यावर ह्यांच्या बँक बॅलन्स नी थोड्याफार असलेल्या इस्टेटीसोबच, माझीही वाटणी झाली अर्धी अर्धी. वर्ष - वर्षभर दोन्ही लेकांकडे आळीपाळीने. फारच वाईट वाटलं रे. पण म्हंटलं... ठिकच आहे की, दोन्ही ठिकाणी आपला वावर राहिल. दोन्ही ठिकाणच्या आपल्या माणसांना, आपली किंमत राहिल. त्यामुळे मनाची तयारी केली मी. आणि बरे चाललेले दिवस... दोन्ही लेकांचा, सुनांचा आणि नातवंडांचाही सहवास लाभत होता मला. आणि... आणि धाकट्याकडची मुदत संपून मी थोरल्याकडे जाणारच होते की, माझा थोरला लेक कार्डिअॅक अरेस्टने अचानकच गेला. दुःखाचा डोंगर कोसळला रे माझ्यावर, पण तरीही मी तगून राहिले होते. पण त्या दुःखाच्या वजनाखाली मी पुर्णतः दबून गेले, जेव्हा माझ्या मोठ्या सुनेने मला यापुढे सांभाळण्यास स्पष्ट नकार दिला. आणि त्या पेक्षाही क्लेषदायक पुढची परिस्थीती होती... जेव्हा माझ्या धाकट्या मुलानेही असमर्थता दर्शवली, मला कायमचं सांभाळून घेण्यासाठी. कारण... निदान वर्षभराकरता का होईना, पण त्याला नी त्याच्या बायकोला प्रायव्हसी हवी होती म्हणे. म्हणूनच आता पुढील वर्षभराकरीता तरी, माझी ह्या वृद्धाश्रमात सोय करण्यात आलीये. त्यानंतर जायचं परत लेकाकडे, आलाच न्यायला तर. प्रचंड व्यथित करणारी गोष्ट आहे ही. ज्या लेकांना जिवापाड जपलं, त्यांच्या पंखात बळ येईपर्यंत. त्यांचीच घरटी आज लहान आणि मनं कोती ठरलीयेत, ह्या थकल्या पाखराला निवारा देण्यासाठी. आणि तुला माहितीये... ह्याच माझ्या धाकट्या लेकाला तर, कित्येकवेळा मी माझ्या पदराखली घेत वाचवलंय"
"हो... आय नो धीस व्हेरी वेल मॅडम"
"म्हणजे?... हाऊ डू यू नो धीस?
"यतिन सबनिस... तुमचा धाकटा लेक... सेम बॅच मॅडम... नाईन्टी फाईव्ह... माझाच क्लासमेट"
"ओ... दॅट मिन्स... तू ओळखतोस त्याला?"
"आॅफकोर्स येस्स मॅडम... पण तुम्ही नाही ओळखलंयत मला अजूनही. कदाचीत... कदाचित ही माझ्या भुवईच्या जरा वर असलेली खूण बघून, तुम्हाला आठवेल काही"
हे बोलता बोलताच... विक्रांतने कपाळावर रुळत असलेले त्याचे केस, एका हाताने बाजूला सारत पकडून ठेवले. एक बोटभर लांब असा, ठळक व्रण होता कपाळावर त्याच्या. सबनिसबाईंनी तो बघितला. डोळे बारीक करत, काही आठवायचा प्रयत्न करु लागल्या त्या. आणि अचानक डोळे ताठरले त्यांचे... घशात आवंढा दाटून आला... हातांना हलकासा कंप सुटला. विक्रांतला समजलं की, मॅडमना ओळख पटलीये आपली.
"हो मॅडम... मीच तो... विक्रांत... विक्रांत नाडकर्णी. ज्याचं दहावीत असतांना एकदा एका आॅफ पिरियडमध्ये, यतिनशी वर्गातच भांडण झालं होतं. आणि तुम्ही वर्गात आलेलात. मी तुमच्याकडे आमच्या बाई म्हणून आलो होतो, पण तुम्ही मात्र एक आई म्हणून आला होतात. झाल्या प्रकाराची अजिबात शहानिशा न करता, तुम्ही माझ्या जोराची मुस्काटात मारलीत. त्या अचानक प्रहाराने मला भोवळच आली, आणि फिरत मी धाडकन खाली जे पडलो... ते टेबलाखालच्या लाकडी प्लॅटफार्मच्या धारदार टोकावरच. खूप रक्त गेलं, बेशुद्ध पडलो होतो मी. मला हाॅस्पिटलमध्ये नेण्यात आलं... पंधरा टाके पडले होते, भुवईच्या जरा वर. थोडक्यात डोळा बचावलेला माझा. तुम्हाला एका आठवड्याकरता, सस्पेंड केलं होतं शाळेतून. पण माझी मात्र पुढली तीन वर्ष, वाया गेली होती. मी नव्हतो बसू शकलो मग बोर्ड एक्झॅमला, त्या तीन वर्षांकरता. शरिरावरचा घाव भरला होता काही महिन्यांत, पण काॅन्फिडन्स मात्र पार खचून गेला होता. खूप घाबरायचो मी, किंचाळत उठायचो. सोळाव्या वर्षी पुन्हा सुरुवात झालेली अंथरुणातच... मग चाईल्ड सायकाॅलाॅजिस्टची बरिचशी सेशन्स करावी लागली होती मला, जवळपास अडिचेक वर्ष. खूप त्रास सहन करावा लागला होता मला, आणि माझ्याहूनही जास्त माझ्या आई - बाबांना"
हे ऐकून आता, रडू आवरणं अशक्य झालं होतं सबनिसबाईंना. त्यांनी विक्रांतकडे बघत, त्याला हात जोडले.
"तोंड नाहीये अजिबातच माफी मागायला. त्यातून वेळ निघून गेलीये पश्चाताप करायची, आणि वयही गेलंय निघून प्रायश्चित्त भोगायचं. पण तरीही जमल्यास मला माफ..."
विक्रांतने सबनिसबाईंचे जोडलेले हात... आपल्या हातात धरले, आणि त्यांना थांबवत बोलला तो...
"माफी मागू नका मॅडम. पण... पण वेळ आणि वय दोन्ही आहे हातात तुमच्या, पश्चातापासाठी आणि प्रायश्चित्तासाठीही"
"म्हणजे?... मला नाही समजलं"
"माझे बाबा पाच वर्षांपुर्वी गेले मॅडम, आणि आई मागल्या वर्षीच. दोघांनीही खूप म्हणजे खूपच, तळतळाट केला होता तुमचा. तुम्ही गुन्हेगारच होता त्यांच्यासाठी, त्यांच्या एकुलत्या एका मुलाच्या गुन्हेगार. पण तुम्हाला शिक्षा मात्र देऊ शकले नव्हते ते. त्यामुळे आता माझ्याबरोबर माझ्या घरी येऊन, तुम्ही तुमची शिक्षा भोगू शकता"
"ती कशी काय?"
"माझ्या घरी कायमचं राहून. अगदी प्रत्येक वर्षाचे तिनशे पासष्ट दिवस... आई - बाबांच्या पाठी पोरकं झालेल्या त्यांच्या मुलावर, सुनेवर, नातवंडावर त्यांच्यासारखंच प्रेम करुन"
"----------"
"हो मॅडम.... माझं घर असतांना, तुम्हाला कुठल्याही घरकुलात जायची गरज नाही. मी खूप मोठं बिझनेस डिल करायला पुण्याला निघालोय, ज्यामुळे अधिक सधन होईन मी. पण हे फॅमिली डिल माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे, कारण ह्यामुळे अधिक संपन्न होईन मी. त्यामुळे इथूनच मागे परतुया आपण. डोळ्यांना दिसणार्या... क्षितिजापर्यंत पसरलेल्या समुद्राच्या पृष्ठभागापेक्षाही, त्याची न दिसणारी तरीही जाणवणारी तळापर्यंतची खोली माझ्यासाठी जास्त महत्वाची आहे. याल मॅडम माझ्याबरोबर माझ्या घरी? त्यावेळी माझं काहीही न ऐकून घेता... तुमच्या मुलाला 'साथ' दिलीत, त्याची आई म्हणून. आता इतकं ऐकल्यावर तरी मला द्याल 'साथ', माझी आई बनून?"
सबनिसबाईंचा बांध फुटून, त्या हमसून हमसून रडत होत्या आता. आणि विक्रांतही त्यांना हवं तेवढं रडून देत... त्यांच्या कटू आठवणींच्या भुतकाळाचा निचरा करण्यास, सबनिसबाईंना मोलाची 'साथ' देत होता.
---सचिन श. देशपांडे
0 टिप्पण्या