एकदा फ्रान्समध्ये एक प्रसिद्ध वक्ता आपल्या सुंदर आणि विनोदी भाषणांमुळे खूप चर्चेत आला, त्याच्या व्याख्यानांना लोक तौबा गर्दी करीत. सुमारे तीन तासांच्या त्याच्या व्याख्यानादरम्यान लोक हसून हसून लोटपोट होत असत. त्याच्या कार्यक्रमांना फ्रांसभर भरपूर गर्दी होत असे. त्याच्या कार्यक्रमाचे तिकीट मिळणं ही लोकांना भाग्याचं वाटे.
एकदा फ्रान्सच्या राजधानीत एका प्रसिद्ध डॉक्टरकडे एक माणूस आला. तो डॉक्टरांना म्हणाला, " डॉक्टर, माझ्याकडे पैसा, आहे, सत्ता आणि संपत्तीही आहे, पण मनःस्वास्थ्य मात्र मी पूर्णपणे गमावून बसलो आहे.मला मनःस्वास्थ्याचा उपाय सांगा. डॉक्टरने त्याला औषधे लिहून दिली आणि विचारलं, "औषधे तर मी लिहून दिली आहेत, पण रोग मनाचा आहे, तेव्हा मनःस्वास्थ्य मिळविण्यासाठी तुम्ही असे कां करीत नाहीत की आपल्या येथे तो प्रसिद्ध वक्ता आहे, ज्याच्या भाषणामुळे लोक हसतात, आपली दुःख कांही काळासाठी कां होईना विसरतात. त्याच्या कार्य्रक्रमांना हजेरी लावा. त्याचा फायदा होईल." तेव्हा तो माणूस म्हणाला, "काय सांगू डॉक्टर, अहो मीच तो वक्ता."
म्हणजे मनःस्वास्थ्य मिळवणं सोपं नाही. मग ते कसं मिळू शकेल? कदाचित, ज्ञानेश्वरीत त्याचं उत्तर तुम्हाला सापडेल.
म. गांधी वधानंतर देशात आणि महाराष्ट्रात ब्राह्मणांविरुद्ध दंगली उसळल्या. सांगलीला ३ तासांत ब्राह्मणांची जवळपास सव्वाशे घरे जाळण्यात आली. त्यामध्ये तेव्हाचे तेथील सरकारी अधिकारी श्री. भावे यांचा जुना पिढीजाद वाडाही जाळून टाकण्यात आला. ते मोठे इंजिनीअर होते, सरकारी खात्यांत बडे अधिकारी होते. त्यांना सरकार दरबारी तेव्हा मानमरातब सुद्धा होता. वाडा उध्वस्त झाल्याने ते संतप्त होते, निराश होते. त्यांचे मनःस्वास्थ्य हरवले. त्यांच्यापाशी सत्ता होती, संपत्ती होती, अधिकार होता, सरकार दरबारी त्यांना प्रचंड मन होता, पण त्यांची मनःशांती या घटनेनंतर हरवली. त्यांनी नंतर पुन्हा जवळपास लाखभर रुपये खर्चून घर नव्याने उभे केले, पण त्या घरात त्यांना चैन पडत नव्हते. रात्रीची झोप उडून गेली होती. तेव्हा हरवलेले मनःस्वास्थ्य परत मिळावे, भरकटणाऱ्या मनाला आवर घालावा या हेतूने त्यांनी श्री ज्ञानेश्वरी वाचायला घेतली. त्यांनी ती एकदा वाचली. त्यातील बऱ्याचशा ओव्यांचा त्यांना नीट अर्थ लागला नाही, किंवा त्या त्यांना समजल्या नाहीत. त्यांनी त्या जागा पेन्सिलीने खुणा करून ठेवल्या. त्यानंतर त्यांनी तीच ज्ञानेश्वरी पुन्हा दुसऱ्यांदा वाचून काढली. ह्यावेळी मात्र हातात पेन्सिल न घेता त्यांनी रबर घेतले होते. दुसऱ्यांदा ज्ञानेश्वरी वाचतांना त्यांना त्यातील कांही ओव्यांचा अर्थ उमगला आणि आधीच्या ओव्यांचा अर्थ अधिक चांगल्या प्रकारे समजला. तेव्हा त्यांनी त्या पेन्सिलच्या खुणा पुसून टाकल्या. मग तिसऱ्यांदा वाचली, ती ही हाती रबर घेऊन. त्यावेळी त्यांना आणखी कांही ओव्यांचा अर्थ समजला आणि ज्ञानेश्वरी अधिक चांगल्या प्रकारे त्यांना समजली. मग त्या ओव्यांसमोरील पेन्सिलीच्या खुणा त्यांनी रबराने पुसून टाकल्या. असेच चौथ्यांदा, पाचव्यांदा झाले आणि हळू हळू त्यांना ज्ञानेश्वरीचे समग्र ज्ञान झाले. आपले घर जाळून टाकणाऱ्यांबद्दल आधी त्यांच्या मनात संताप होता. ज्ञानेश्वरीच्या वाचनानंतर त्याचे मन शांत झाले. आता आपले घर जाळणाऱ्या माणसांबद्दल त्यांच्या मनात असलेला राग संपला आणि त्यांना ते मनोमन धन्यवाद देऊ लागले. कारण त्यांच्या या कृतीमुळेच त्यांना ज्ञानेश्वरी वाचण्याची उपरती झाली.
ते म्हणतात, मी तर बांधकामामधील इंजिनिअर होतो. इंजिनिअर माणसाला सगळ्या शक्यतांची, संभाव्य धोक्यांची शक्यता लक्षात घेऊन योजनेची अधिकाधिक निर्दोष आखणी आणि अंमलबजावणी करायची असते. संत ज्ञानेश्वर हे मनाचे इंजिनिअर होते. मनाची जडणघडण लक्षात घेऊन मनात येणाऱ्या संभाव्य प्रश्नांची उत्तरं त्यांनी आधीच अंदाज बांधून देऊन ठेवलेली आहे.
संदर्भ: अमृत ज्ञानेश्वरी
लेखक: न्या. मु. राम केशव रानडे .
0 टिप्पण्या