मी जर महाभारत काळात जन्माला आलो ..

 मी जर महाभारत काळात जन्माला आलो ..... तर माझा समावेश कौरवांच्या पार्टीतच झाला असता....


कारण ..


श्रीकृष्णाची कधी प्रत्यक्षात गाठ पडलीच तर मी त्याला एकमेव प्रश्न हा विचारेन की ...


” देवाधिदेवा... भगवतगीता अर्जुनाला सांगण्याऐवजी, दुर्योधनाला आणी दु:शासनाला सांगितली असतीस् तर हे महाविनाशी युध्द टाळता आले असते ना ?


 इतका मोठा संहार झाला नसता. तू असे का केले नाहीस ? 

भग्वद्गीतेचे  हे दिव्य ज्ञान कौरवांना झाले असते तर महाभारत हे युद्धाच्या तत्त्वज्ञानाऐवजी बंधुभावाच्या, प्रेमाच्या तत्त्वज्ञानाची शिकवण देणारे झाले नसते का ?”


सध्यातरी कृष्णाने प्रत्यक्ष दर्शन देणे शक्य नव्हते. त्यामुळे  इंटरनेटच्या जंजाळात मी हा प्रश्न प्रसूत केला. बघताबघता हा प्रश्न प्रचंड व्हायरल झाला. फेसबुक, whatsapp, quora, युट्युब सगळीकडे या प्रश्नाने धुमाकूळ घातला. आणि अखेरीस ईतके ट्रॅफिक ओसंड्ल्यामुळे प्रत्यक्ष श्रीकृष्णाला त्याची दखल घ्यावी लागली, आणी....


एके दिवशी मला श्रीकृष्णाचा video कॉल आला.....


अक्षयकुमार आणि परेश रावलचा OMG बघितलेला असल्यामुळे श्रीकृष्ण अगदी साध्या वेशभूषेत येणार हे मला अगोदरच ठावूक होते........


थेट स्वर्गातून पृथ्वीवर कॉल लावलेला असल्यामुळे खुप डेटा खर्च होत असणार, त्यामुळे श्रीकृष्णाने थेट मुद्द्यालाच हात घातला.....


“ वत्सा , कशाला ईतके अवघड प्रश्न नेटवर टाकतोस ? सगळे ट्रॅफिक जाम झाले ना....”


“ देवा , हा आखिल मानवजातीच्या मार्गदर्शक धर्मग्रंथाचा प्रश्न आहे. तुम्ही हे युद्ध टाळण्यासाठी हे ज्ञान कौरवांना दिले असते तर युध्दचं झाले ....


हा प्रश्न इंटरनेटच्या  ट्रॅफिकपेक्षा कितीतरी महत्वाचा नाही का ?”


*“मला उपदेश करू नकोस ”*.......... श्रीकृष्णांचा एकदम बदललेला स्वर ऐकून मी भांबावलो.


“ देवा , माझी काय बिशाद तुम्हाला उपदेश करण्याची.... " मी गयावया केली.


“ वत्सा ...अरे तुला नाही म्हणालो.”

........मला हायसे वाटले.


“ मला उपदेश करू नका ........  असे दुर्योधन मला म्हणाला होता.


....तुला काय वाटते ? मी हे युध्द टाळण्यासाठी  दुर्योधनाकडे गेलो नसेन..... ? 


भग्वद्गीतेमधील न्याय-अन्याय, नैतिकतेच्या गोष्टी त्याला सांगितल्या नसतील ?”


“ काय सांगताय देवा ? दुर्योधनाला प्रत्यक्ष तुम्ही गीतेचे ज्ञान सांगून देखील त्याला ते कळाले नाही ? 

तो सरळसरळ तुम्हाला उपदेश  करू नका म्हणाला ?”


“ वत्सा , अगदी असेच घडले बघ. दुर्योधन म्हणाला .....  

मला चांगले वाईट, पाप पुण्य, नैतिक अनैतिक या सगळ्याचे ज्ञान आहे. सद्वर्तन आणी दु:वर्तन यातील फरकही मी जाणतो, त्याचा उपदेश मला करू नका." 


“ वत्सा , पाप काय आहे हे दुर्योधनच काय तुम्ही सुद्धा जाणता........


पण त्यापासून दूर रहाणे तुम्हालाही जमत नाही. अनैतिकता म्हणजे काय हे दुर्योधन ही अन् तुम्ही ही ओळखता, पण टाळत नाही...


तुमच्यासाठी चांगले काय आहे आणि वाईट काय आहे हे तुम्ही जाणता , पण तुम्ही वाईटाचीच निवड करता. दुर्योधनाने स्वत:च्या वर्तनाची अगतिकता सांगून बदल नाकारला, त्याने स्वत:चा 'नाकर्तेपणा' ढालीसारखा वापरला”.

.

आता मात्र मला दुर्योधनाच्या जागी माझा चेहरा दिसायला लागला .


“ मला उपदेश करू नका“...... वडिलांना उद्देशून हे वाक्य मी शंभरवेळा उच्चारले असेन.


मित्रांबरोबर उनाडक्या करणे चुकीचे होते हे मला माहिती होते, पण मी त्याचीच निवड करीत होतो. आणि वडिलांना “ उपदेश करू नका” असे सांगत होतो. 


सकाळी लवकर उठून व्यायामाला जाणे माझ्या फायद्याचे होते हे मला ठावूक होते. पण अंथरुणात लोळत पडणे हे माझे वर्तन होते, आणी “लवकर उठत जा” असे सांगणाऱ्या  आईला “उपदेश करू नकोस” असे सांगणारा "दुर्योधन" मीचं होतो.


“तंबाखू खाऊ नका, दारू पिऊ नका , मांसाहार करू नका", हे उपदेश आम्हाला ऐकायचे नाहीत. त्यामुळे शरीराचे नुकसान होते हे आम्हाला ठाऊक आहेत, पण त्याची अंमलबजावणी आम्हाला करायची नाही, कारण आम्ही 'दुर्योधन' आहोत, आम्ही कौरव आहोत.


अर्जुन आणि दुर्योधनात हाच फरक होता की , दुर्योधनाने कळत असूनही स्वत:चे वर्तन बदलले नाही आणि अर्जुनाने स्वत:चे वर्तन श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून बदलले..... 


संस्कार, प्रकृती, राग, श्रेय, प्रिय, प्रतिक्रिया, कर्म, विषय ....याबद्दलच्या संकल्पना जाणून घ्या.


कधीतरी स्वत:च्या आतल्या श्रीकृष्णाला प्रश्न विचारा ...... 


तरच भगवद्गीता वर्तनात येईल..... वाचण्याची इच्छा होईल आणी ही

इच्छा जेंव्हा होईल तेव्हाच होईल सूर्योदय.


सध्यातरी मी कौरव नंबर "१०१" आहे ....


.. आणी तुम्ही?


*🙏🌹❤️ ❤️🌹🙏*


    *हरे कृष्ण*( जसी आली तसी पोस्ट पाठवत आहे. मननीय व चिंतनीय!🙏🙏)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या