"अबोल Attachment"
माझ्या आई-बाबांनी एकमेकांना त्यांच्या नावाने कधीच हाक मारली नाही... निदान आमच्यासमोर, चार चौघात तरी नाहीच.
त्यावेळी यांना एकमेकांजवळ बसून अगदी प्रेमाचं तर सोडाच, पण कधी साधं कुजबुजतांनाही ऐकल्याचं आठवणीत नाही.
बाबा आईसाठी साडी घेऊन येत असत नवी, तेव्हा तिला जवळ बोलावून, प्रेमाने तिच्या हातात ती साडी देणं, हा प्रकार नसे, तर पिशवी टेबलावर ठेऊन बाहेरुनच ओरडून सांगत असत "अगं हे बघ जरा बरंय का?"
आणि आईला ते बरं नाही, तर कायम अप्रतिमच वाटत असे...! बदला बदलीचा प्रश्न कधीच ऊद्भवला नाही.
बाबा आईवर ओरडायचे... चिडायचे... अगदी आमच्यासमोर तिला बोलायचे.
पण आईने चुकून कधी 'अरे' ला 'कारे' केल्याचं पुसटसही स्मरणात नाही.
तसं करणं चुकीचं आहे, असं माझं अजिबात म्हणणं नाहीये. पण त्याकाळातही बाई नोकरी करत असे...
कदाचित घरच्या परिस्थितीमुळेही, असेल, पण...
"मीही कमावते... मीही खुप दमते... मग मीच एकटीने का म्हणून करायची ही राब राब?" हे वाक्य त्या पिढीतील कुठल्याही बाईने, तिच्या नव-याला ऐकवलं नसेल... कधीच.
राग यायचा बाबांचा... एक wicked thought यायचा खुप लहान असतांना मनात की, सुट्टीच्या दिवशी दुपारचं जेऊन मस्त घोरत पडलेल्या बाबांच्या ऊघड्या राहिलेल्या तोंडात भांडंभर पाणी ओतावं नी पळून जावं...
पण हा विचार मी त्या कधीच न घेतलेल्या भांड्यातील पाण्याच्या घोटाबरोबरच गिळत असे.
पण जसं वय वाढू लागलं तसं बाबांचंही घरातलं contribution कळू लागलं...
एक भक्कम अस्तित्व त्यांचं, आम्हा सगळ्यांना निर्धास्त करत असे, यात काडीमात्र शंका नाही.
या माझ्या बाबांना आईच्या आजारपणांत... दोन-एक मोठ्या आँपरेशन्स दरम्यान मी दिवस रात्र तिच्यासाठी झटतांना पाहिलंय... तिच्या उशाशी जागतांना पाहिलय, एखाद्या क्षणी हतबल... हळवं होऊन डोळ्यांची ओली किनार रुमालात लपवतांना पाहिलंय.
गोवंडीला झालेली आईची बदली जीवाचा आटापीटा करुन, महिन्याभराच्या आत विक्रोळीला आणून ठेवल्याचंही पाहिलंय.
माहेराला गिरगावात आलेल्या आईला नी आम्हाला, दिवसाआड आँफिसमधुन येऊन... भेटुन... फक्त डोळ्यांवाटे तीची चौकशी करुन... आधी डोंबिवली नी मग मुलुंडला अपरात्री परततांना पाहिलय.
आताशा आई बाबांवर ओरडते... आणि बाबांची गोगलगाय होते... पण आईचा राग येत नाही... ऊलट मजा वाटते,फिरलेली चक्र पाहून. कारण, *मला माहित असतं, की, 'हे तिचं ओरडणं म्हणजे स्वतःआधी बाबांसाठी जगणं असतं.*'
बाबांची औषधं... पथ्य-पाणी ही तीची priority झालीये अगदी स्वतःची, वितभर वरुन बोटभर झालेली खळगी भरण्याही आधीची.
'बाबांनी कमरेला पट्टा बांधलाय/ नाही बांधलाय,' याला ती 'आपण गळ्यात मंगळसुत्र घातलय/ नाही घातलय', या गोष्टीईतकच महत्व देते.
रात्री झोपतांनाही मंगळसुत्र गळ्यातुन न काढणारी ती, बाबांनी पट्टा काढलाय की नाही हे आवर्जुन बघते.
*आमच्या पिढीच्या उघड... उथळ... दिखाऊ प्रेमापेक्षा, ह्या पिढीचा अव्यक्त... अबोल... खोल जिव्हाळा*, हे अनाकलनीय सत्य आहे माझ्यासाठी... अगदी निर्विवादपणे.
आयुष्यभर एकमेकांशी चार घटकाभरही निवांत होऊन न बोललेली ही पिढी, एव्हढी घट्ट एकमेकांशी कशी राहू शकते?
एकमेकांना कधी चोरटा स्पर्श ही न करणारी ती पीढी, फक्त डोळ्यांतून साठलेल्या प्रेमावर एव्हढा लांबचा पल्ला एकत्रीत कसा गाठू शकते?? हे मला सतावणारे गहन प्रश्न होते... आहेत... राहतील.
ह्या त्यांच्या अबोल 'Attachment' ला खरंच माझं साष्टांग दंडवत आहे............
------🙏🙏🙏
पत्रकार विकास शहा , दैनिक लोकमत , शिराळा ( सांगली )
0 टिप्पण्या