━━━━━━━━━━━━━━━━━━━━
वेळेनुसार बदल घडवा, तरच टिकाल
कहाणी HMT ची
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
'HMT वॉच फॅक्टरी’ हा भारतातील पहिला घड्याळांचा कारखाना बंगलोर येथे २८ जानेवारी १९६१ रोजी सुरू झाला.
आज आई बाबांनी मोबाईल फोन घेऊन दिल्यावर मुलांना जो आनंद मिळतो, तो आम्ही लहान असताना आम्हाला मनगटी घड्याळ घेऊन दिल्यावर मिळायचा. तेव्हा मुलं अकरावीत म्हणजे SSC च्या वर्गात गेल्यावर त्यांना घड्याळ घेऊन दिले जायचे. नंतर काही वर्षांनी SSC ची परीक्षा दहावीत होऊ लागली आणि मुलांना घड्याळ दहावीत गेल्यावर मिळू लागले. त्याचे कारण होते त्यावेळी असलेले SSC परीक्षेचे महत्त्व. मुलांनी चांगले मार्क मिळवायचे तर पेपर पूर्ण लिहून व्हायला हवा आणि तोही ठरवून दिलेल्या वेळेत. त्यासाठी घड्याळ लावून पेपर लिहायचा सराव व्हावा म्हणून घड्याळ SSC चे वर्ष सुरु व्हायच्या अगोदरच खरेदी व्हायचे. माझे पहिले घड्याळ होते हेन्रि सॅन्डोज, जे १९६८ मध्ये मी ११वी च्या वर्गात गेल्यावर घेतले गेले.
हेन्रि सॅन्डोज हा त्यावेळी मनगटी घड्याळाचा प्रसिद्ध ब्रँड होता. हे घड्याळ स्वित्झरलँड या देशात बनविले जाई. हेन्रि फ्रेडरिक सॅन्डोज या गृहस्थाने ही घड्याळाची कंपनी १८९० मध्ये स्थापन केली. स्वित्झरलँड हा देश आजही मनगटी घड्याळांच्या उत्पादनात अग्रेसर आहे. कंपनी सुरु झाल्यावर काही वर्षातच म्हणजे जवळ जवळ १०० वर्षांपूर्वी ही कंपनी दिवसाला २५०० घड्याळे बनवित असे, या वरून कंपनीची लोकप्रियता ध्यानात यावी. हेन्रि सॅन्डोज एवढाच आणखी एक ब्रँड त्या वेळी लोकप्रिय होता आणि तो होता फॉवर लुबा, हे घड्याळ सुध्दा स्विस (स्वित्झरलँड) बनावटीचे होते.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीस खरं तर मनगटी घड्याळ हा प्रकार स्त्रियांनी वापरण्यासाठी होता. पुरुष तेव्हा पॉकेट घड्याळ वापरायचे. Wristwatch चा पुरुषांकडून वापर पहिले महायुद्ध सुरु झाल्यावर सैन्य दलाकडून झाला, कारण लढताना त्यांना त्यांचे दोन्ही हात मोकळे हवे होते.
भारतात घड्याळांच्या क्षेत्रात क्रांती घडून आली ती HMT घड्याळांच्या आगमनानंतर. HMT म्हणजे Hindusthan Machine Tools कंपनी. सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजे भारत सरकारच्या मालकीची ही कंपनी १९५३ मध्ये सुरु झाली. सुरुवातीस ही कंपनी मशीन टूल्सच बनवायची. पण नंतर तिने मनगटी घड्याळ, ट्रॅक्टर आणि प्रिंटिंग मशीनच्या उत्पादन क्षेत्रात उडी घेतली.
HMT च्या घड्याळ उत्पादन विभागाची सुरुवात १९६१ मध्ये जपानच्या Citizen Watch Co. च्या सहकार्याने झाले. घड्याळाच्या पहिल्या बॅच चे वितरण देशाचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते झाले. देशातील कामगारा मध्ये वक्तशीरपणा रुजविण्यासाठी त्यांना कमी किमतीत घड्याळे उपलब्ध करून द्यावी हा HMT घड्याळांच्या निर्मिती मागील उद्देश होता. HMT ची घड्याळे खरोखर स्वस्त आणि टिकाऊ होती. १९७० च्या दशकात HMT घड्याळांना एवढी जबरदस्त मागणी होती की HMT च्या काही मॉडेल करिता चक्क वेटिंग लिस्ट असायची. HMT ने १९६१ ते २०१४ या जवळपास ५० वर्षाच्या कालावधीत १००० हुन जास्त मॉडेल बाजारात आणली आणि १० कोटी हुन जास्त घड्याळांची निर्मिती केली. HMT चा मुख्य कारखाना बंगळुरू येथे होता, या शिवाय तुमसर, जम्मू काश्मीर, नैनिताल जवळ राणीबाग येथेही कंपनीचे कारखाने होते.
१९८० ते १९९० या कालावधीत आणखी दोन भारतीय कंपन्या मनगटी घड्याळांच्या बाजारात सक्रिय होत्या. त्यापैकी एक होती Allwyn, जी Seiko या जपानी कंपनीच्या सहकार्याने घड्याळे बनवत होती आणि दुसरी होती Timstar, जी Fontemelion या फ्रेंच कंपनीच्या सहकार्याने घड्याळे बनवित होती.
HMT घड्याळ हे भारतीय अस्मितेचे प्रतिक होते, ते आत्मनिर्भर भारताचे मानचिन्ह होते. त्याकाळी भारतात विकल्या जाणाऱ्या १० घड्याळा पैकी ९ घड्याळे HMT ची असायची. HMT च्या बहुसंख्य मॉडेल ची नावे जनता, अमर, आदर्श, अजित, आकाश, दीपक, कांचन, सोना, विजय, विकास, झलक अशी खास भारतीय होती. सैन्य दलातील जवानांसाठी सैनिक आणि पायलट अशी मॉडेल होती. HMT ने खास अंध बांधवांसाठी ब्रेल घड्याळे सुध्दा बनविली. अनेक कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीत २५ वर्षे नोकरी झाल्यावर किंवा कर्मचारी सेवानिवृत्त होताना त्यांना HMT ची घड्याळे भेटवस्तू म्हणुन देत. या घड्याळांच्या डायलवर भेट देणाऱ्या कंपनीचे ही नाव लिहिलेले असे.
HMT ची तेव्हा 'Time Keepers of the Nation' अशी ओळख होती, परंतु काळाबरोबर कंपनी बदलू शकली नाही. HMT ची घड्याळे ही ‘ देश की धडकन' होती, पण बदलत्या काळाबरोबर लोकांची बदलती मानसिकता जाणून घेण्यात कंपनी कमी पडली.
सन १९८० नंतर quartz घड्याळे बाजारात आली. त्यापूर्वीची घड्याळे mechanical असत, की जी clockwork यंत्रणेचा वापर करून बनविलेली असत. या घड्याळांत mainspring असे की जी ठराविक काळाने गुंडाळावी लागे आणि त्यासाठी घड्याळाला रोज चावी द्यावी लागायची. बाजारात नवीन आलेल्या quartz घड्याळात ही कटकट नव्हती.
Quartz घड्याळे electronically चालत आणि ती चालू राहण्यासाठी छोटी बटनाच्या आकाराची बॅटरी वापरली जात असे. Mechanical घडयाळे कधी हळू तर कधी वेगात चालत, त्यामुळे त्यांनी दर्शविलेल्या वेळेत अचूकता नसे. ही घड्याळे वरचेवर बिघडत आणि त्यांची वारंवार दुरुस्ती करून घ्यावी लागे. नवीन quartz घड्याळात हा त्रास नव्हता आणि त्यामुळेच लोकांचा कल mechanical घड्याळा ऐवजी quartz घड्याळे विकत घेण्याकडे वळू लागला.
खरेतर HMT ने १९८१ मध्ये भारतीय बनावटीचे पहिले quartz घड्याळ बनविले होते, परंतु HMT ने ते आवश्यक त्या आक्रमकतेने बाजारात आणले नाही. त्याच वेळी म्हणजे १९८४ मध्ये टाटा उद्योग समुहाने टायटन वॉच ही नवीन कंपनी सुरु केली. मुख्य म्हणजे Titan ची घड्याळे quartz या प्रकारातील होती. Titan ची घडयाळे ही HMT च्या तुलनेत अधिक सुबक आणि आकर्षक होती. लोकांच्या मनातील घड्याळा संदर्भातील कल्पना सुद्धा तोपर्यंत बदलू लागल्या होत्या. घड्याळाच्या functionality पेक्षा त्याचे fashion accessory म्हणून महत्व वाढू लागले होते.
जेव्हा HMT ने आपले लक्ष mechanical घड्याळांवरून quartz घड्याळांकडे वळविले तो पर्यंत खुप उशीर झाला होता. १९८६ साली प्रत्यक्ष उत्पादन सुरु झालेल्या Titan ने फक्त ४-५ वर्षात भारतीय घड्याळांच्या बाजारात, HMT ला बाजूला सारून आपले स्थान पक्के केले होते.
१९८९-९० पासून HMT तोट्यात जाऊ लागली आणि त्यानंतर ती कधीच सावरू शकली नाही. कदाचित HMT ला या गर्तेतून बाहेर पडणे शक्य झाले असते, परंतु सार्वजनिक क्षेत्रातल्या दप्तर दिरंगाई मूळे ते होऊ शकले नाही. शेवटी २०१४ मध्ये भारत सरकारने ही कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला आणि एका युगाचा अस्त झाला.
Quartz घड्याळे लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच १९९० च्या सुमारास डिजिटल घड्याळांचा उदय झाला. या घड्याळात वेळ दाखविण्यासाठी तास काटा, मिनिट काटा आणि सेकंद काटा असे काटे नव्हते, तर घड्याळाच्या डायल वर वेळ दर्शविणारे अंक दिसत. या घड्याळांच्या उत्पादनात Casio ही जपानी कंपनी आघाडीवर होती. ही घड्याळे प्लास्टिक च्या case मध्ये असत आणि त्याचा पट्टा सुद्धा प्लास्टिकचाच असे. त्यावेळेस लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारची, आकाराची आणि रंगांची घड्याळे बाजारात उपलब्ध होती आणि ती किमतीलाही अतिशय स्वस्त होती.
आज मनगटी घड्याळांच्या भारतातील बाजारपेठेत Titan ही सर्वात लोकप्रिय कंपनी असून तिचा हिस्सा हा एकूण विक्रीच्या ६०% पेक्षा अधिक आहे. Titan घड्याळांचे Fastrack, Sonata, Raga, Octane, Xylys असे अनेक ब्रँड आज उपलब्ध आहेत. युरोपिय बाजारपेठेत शिरकाव करण्यासाठी Titan ने २०११ मध्ये Favre Leuba ही स्विस कंपनी विकत घेतली. आज Titan ची घड्याळे यूरोपसह अनेक देशात निर्यात केली जातात.
मोबाईल फोनच्या वाढत्या वापरामुळे घड्याळाचा वेळ दाखविणे हा उपयोग आजतरी बाद झालेला आहे. आज आपल्या हातात मोबाईल फोन सतत असतो आणि त्यामुळे वेळ कळण्यासाठी आपल्याला घड्याळाची आवश्यकता भासत नाही. शिवाय मोबाईल मध्ये alarm, reminder या सारख्या अधिकच्या सुविधा असल्यामुळे आपले जीवन अधिक सुखकर झाले आहे.
आजच तुमच्या आमच्या मोबाईल मध्ये घड्याळ, कॅल्क्युलेटर, कॉम्प्युटर, कॅमेरा, यासारखी अनेक गॅजेट तर Internet, WhatsApp, YouTube, Google Maps या सारखी विविध सॉफ्टवेअर आणि अँप समाविष्ट होऊन तो स्मार्टफोन बनला आहे. लवकरच हा स्मार्टफोन घड्याळात समाविष्ट होऊन तो आपल्या मनगटावर स्मार्टवॉच म्हणुन विराजमान झालला असेल. त्याची सुरुवात अगोदरच झाली आहे.
आज बाजारात Apple, Microsoft, Google, Sony, Samsung, LG, Motorola या सारख्या अनेक कंपन्यांची स्मार्टवॉच उपलब्ध आहेत. Apple कंपनीने अलीकडे बाजारात आणलेल्या Applewatch तर तुमच्या हृदयाचे ठोके मोजते. तुम्ही फार वेळ एकाच जागी बसून राहिलात तर तुम्हाला व्यायाम करण्यासाठी आठवण करून देते. तुमच्या आजूबाजूला गोंगाट वाढत असेल तर त्याचे decibal मध्ये मोजमाप करून आपल्याला काळजी घ्यायला सुचविते, घराबाहेर पडल्यावर दिशा दिग्दर्शन करते आणि घराबाहेर असताना सुद्धा तुमच्या स्मार्टहोम मधील लाईट, फ्रिज, एसी, टीव्ही या गॅजेट ना कंट्रोल करते.
काळाबरोबर बदलत जाणारी माणसे आणि संस्थाच आजच्या स्पर्धेच्या युगात टिकू शकतात असे म्हटले जात असेल, तर मग काळ दर्शविणारी घड्याळे न बदलून तरी कसे चालेल?
संदर्भ : इंटरनेट/सुधीर परब
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
0 टिप्पण्या