autoplay="autoplay"
src="https://drive.google.com/uc?export=download&id=1WzxWSEduX37C_sz3DoPowajyFiyi7XQN">Your browser does not support the
audio
element.crossorigin="anonymous">
style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-7384059194066495"
data-ad-slot="7297264882">
#माणूस-
लेखक- डॉ.अशोक माळी.
"सर, राधानगरीजवळचा एक म्हातारा धनगर आलाय तुम्हांला भेटायला." सिस्टरनं आत येऊन सांगितलं.
"भेटायला की दाखवायला ?"
"भेटायला. दाखवायचं आहे का म्हणून विचारलं तर नाही म्हणाला. "
"होय काय ?... आश्चर्य आहे ! पाठवा त्यांना आत."
सिस्टर गेल्या आणि एक हडकुळा म्हातारा आत आला. खांद्यावर घोंगडं वगैरे टाकलेलं.
"बोला की आजोबा, काय म्हणताय?" मी विचारलं.
"तुम्ही खंडराजुरी सोडली होय?"
"सोडली असं नाही पण तिथला दवाखाना आता माझी बायको बघते आणि मी इथला मिरजेतला बघतो."
"तरीच !..... मी मेंढरं घेऊन परवा खालतं जाताना चवकशी केली पर तुमी न्हवता तथं. .....आज सकाळी परत येताना इचारलं तर डाक्टर मिरजेत असत्यात म्हणून कळलं."
"मेंढरं घेऊन परत निघालात काय?" मी विचारलं. कोकणातले बरेच धनगर पावसाळा सुरू झाला की पाऊस चुकवण्यासाठी आपले मेंढरांचे कळप घेऊन पूर्वेकडे जातात आणि पाऊस संपला किंवा परतीचा मान्सून सुरू झाला की परत कोकणात उतरतात. असे शेकडो कळप आमच्या गावावरून जाताना आम्ही वर्षानुवर्षं पाहत आलो आहोत.
"व्हय जी ! " म्हातारा बोलला, "तुमचं मागलं पैसं द्याचं होतं म्हणून आलो हिकडं."
"माझे पैसे ?.... कसले ?" मी विचारलं.
"धा वर्सामागं एकडाव मी असाच खालतं चाललो हुतो . मला बुळकांडी लागली हुती आणि तुमी मला सलामीच्या बारा बाटल्या लावल्या हुत्या बघा."
"होय काय ?"
"तुमी त्या टायमाला खंडराजुरीत ऱ्हात हुता. तुमचं लेकरु बारकं हुतं. मला हागवान लागली म्हणून माणसांनी मला उचलूनच आणलं हुतं दवाखान्यात. तुमी मग मला दोन तासात बारा बाटल्या चढवल्या हुत्या. तुमी तवा देव म्हणून गाठ पडला न्हायतर मढंच झालं असतं माझं."
मला आता आठवलं. "हां हां, आठवलं मामा !" मी म्हटलं.
"त्या टायमाला तुमचं हजार रूपय बिल झालं होतं आणि मी फकस्त पाचशेच दिलते तुमाला."
"होय काय?"
"तर वो !..... हे राह्यलेले पाचशे रूपय घ्या." त्यानं शंभर शंभरच्या पाच नोटा काढून दिल्या.
"खूप दिवस झाले. खरं तर मी तुम्हांला विसरूनही गेलो होतो. आता पैसे नसते दिले तरी चालले असते."
"असं कसं ? तुमी आमास्नी जगवावं आणि आमी तुमचं पैसं बुडवावं हे बरं दिसतंय का?"
"गेल्या दहा वर्षांत तुम्ही आलाच नाहीत होय या भागात ?"
"न्हाई जी ! हथनं गेल्यावर साथीचा का कसला आजार आला आणि निम्मीअर्धी मेंढरं मेली. मग बाकीची मेंढरं इकून टाकली आणि ह्यो खेळच मोडला. जीव ऱ्हाईना म्हणून औंदा पाचपंचीस मेंढरं केल्यात."
थोडा वेळ थांबून त्यानं विचारलं,"आक्कासाब चांगल्या हाईत नव्हं ?"
"ती होय ? ..आहे की, चांगली आहे." मी म्हटलं.
"चांगली हाय बिचारी !... मी आजारी हुतो तवा शिरा करून खायला घातला होता माऊलीनं." त्याचा आवाज भरून आला होता."लेकरू मोठं झालं अशील नव्हं ?"
"होय, नववीत आहे आता."
"हे त्येला द्या.." त्यानं शंभराची नोट काढून समोर धरली.
"हे कशाला ?"
"खायाला न्हाईतर खेळण्याला हुतील. आमची ताकत एवढीच. घ्या, नाराज करू नका म्हाताऱ्याला."
मी पैसे घेतले. नमस्कार करून तो निघून गेला आणि मला गदगदूनच आलं. आजच्या जगात अशीही माणसं असतात ?
© डॉ.अशोक माळी,
'अपूर्व' ,साईनंदन पार्क , मिरज
(आवडल्यास शेअर करतांना कृपया मुळ लेखकाच्या नावासहच शेअर करा ही विनंती.
0 टिप्पण्या