निळू फुले यांच्याविषयी खूप गोष्टी वाचून होतो. ऐकून होतो. पण गोष्ट छोटी डोंगराएवढी सिनेमामुळे त्यांची भेट झाली. बऱ्याचदा मोठी माणसं भेटली की दुरून डोंगर साजरे या म्हणीचा प्रत्यय येतो. पण निळू फुले भेटले आणी हा डोंगर खरच भक्कम आहे याची जाणीव झाली.
गोष्ट छोटी डोंगराएवढी सिनेमात त्यांनी भूमिका करावी अशी मकरंद अनासपुरे आणि सयाजी शिंदे यांची इच्छा होती. निळूभाऊ तब्येतीमुळे नाही म्हणत होते. थकले होते त्या दिवसात. पण मकरंद आणी सयाजी यांनी त्यांना भेटून तयार केलं. शिरूरला सिनेमाचं शूटिंग सुरु होतं. निळूभाऊ आले नव्हते. मकरंद, नागेश भोसले आणी सयाजी होते. आसपासच्या गावातले लोक शूटिंगला यायचे. मकरंद, नागेश, सयाजी यांच्यासोबत फोटो काढायचे.
असे काही दिवस गेले आणि एक दिवस सकाळी निळूभाऊ शिरूरला आले. मी लांबूनच बघत होतो. एका झाडाखाली खुर्चीत शांतपणे बसलेले निळूभाऊ जसेच्या तसे डोळ्यासमोर आहेत.
ही गोष्ट सकाळची. दुपार व्हायला लागली तशी शूटिंगच्या ठिकाणी गाड्यांची गर्दी सुरु झाली.कुठून तरी आसपासच्या गावात बातमी गेली होती. निळू फुले आलेत. दुपारी माणसांची जत्रा झाली. जीपभरून लोक यायला लागले. निळूभाऊ आलेत, निळूभाऊ आलेत हेच गर्दीच्या तोंडी होतं. त्या दिवशी निळू फुले या माणसाची काय जादू आहे ती प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवली. गर्दी बघून सगळ्यांना घाम फुटला. आता या लोकांना आवरायचं कसं हा प्रश्न पडला होता. विश्वास बसणार नाही पण मकरंद अनासपुरे आणि सयाजी शिंदे स्वतः हातात दोरी घेऊन उभे होते. निळूभाऊपासून चार पाच फुटावर एक दोरी आडवी धरली. बाकी कुणाचं लोकांनी ऐकलं नसतं म्हणून स्वतः मकरंद आणि सयाजी हातात दोरी घेऊन उभे राहिले.
पण काही वेळाने लक्षात आलं की लोकांना आवरायची काही गरज नाही. दोरी बिरीची आवश्यकता नव्हती. भाऊ आजारी आहेत हे सगळ्यांना कळत होतं. लोक चार पाच फुटावरून पाया पडत होते. हात जोडत होते. भाऊचं लक्ष जावं म्हणून भर उन्हात उभे होते. भाऊ थकलेले असले तरी हात दाखवत होते. भाऊंचे हात एखाद्या महात्म्यासारखे वाटत होते.
त्या दोन तीन दिवसात सयाजी शिंदे स्वतः भाऊंना सेटवर आणायचे. हॉटेलवर सोडायचे. भाऊंना फुलासारखं जपायचं होतं त्यांना. भाऊंना आवडणारं शास्त्रीय संगीत गाडीत लावायचे. नंतर कळलं की ऐन उमेदीत भाऊंच्या एक दोन भेटीमुळे सयाजी शिंदे यांना खूप मोठा आत्मविश्वास मिळाला होता. कधीतरी ओळख पाळख नसताना भाऊ त्यांना आपुलकीने बोलले होते. वडिलांसारखं.
त्या दोन तीन दिवसात निळू फुले एवढ्या पुस्तकांबद्दल बोलले की आपण कणभरही वाचलेलं नाही याची आम्हाला जाणीव झाली. कितीतरी नवनव्या मराठी लेखकांचं लिखाण त्यांनी वाचलेलं होतं. असंख्य जागतिक सिनेमे पाहिलेले होते. आजकाल बळेच जागतिक सिनेमावर अभ्यासक असल्याचा आव आणत बोलणारे लोक पाहिले की भाऊंची हटकून आठवण येते. भाऊनी काहीच मिरवलं नाही. त्यांना कधी आपली अभ्यासू नट अशी प्रतिमा मिरवावी वाटली नाही. त्यांना आपण चांगले वाचक आहोत असं दाखवायची गरज वाटली नाही. ऑस्करचा कुठल्या वर्षीचा कुठला सिनेमा ते सुद्धा पाठ असणारे निळूभाऊ लोकांशी त्यांच्या भाषेत बोलत राहिले. सामाजिक बांधिलकी त्यांनी जास्त महत्वाची मानली.
लोक त्यांच्यावर प्रेम करतात. पण कधी कधी आपलं भान सुटतं. आपण त्यांना फक्त एका खलनायकी साचात बघतो. महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेतला एक महत्वाचा माणूस म्हणून त्यांच्याकडे बघायला पाहिजे. असे कृतीशील विचारवंत आपल्याकडे खूप कमी असतात. संघर्षाच्या दिवसात आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज परिसरात ते माळीकाम करायचे. त्यांनी लावलेली झाडं आहेत तिथं. त्यांनी घडवलेले, आधार दिलेले कार्यकर्ते आहेत महाराष्ट्रभर. हे सगळं माहित असलं पाहिजे. घरात खायला काही नसायचं. पण चळवळीत लोकांसाठी गोळा केलेल्या धान्याच्या पोत्याला त्यांनी घरातल्या लोकांना हात लावू दिला नाही. या गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे. खरतर निळू फुले यांचं मोठेपण नेमकं कशात आहे हे समजून घेतलं पाहिजे.
महाराष्ट्रात अभिनयाची आवड असलेल्या कुठल्याही माणसाला आपली कला दाखवायची म्हणजे एक गोष्ट हमखास सुचते. ती म्हणजे निळू फुलेंचा आवाज काढणे. निळू फुलेंचा आवाज काढला नाहीं असा एकही मिमिक्री आर्टिस्ट नाही. लोकांना हमखास ओळखू येईल असा आवाज म्हणजे निळू फुले. एवढी स्वतःची अस्सल शैली असलेले फार कमी अभिनेते या देशात झालेत.
निळूभाऊ ही त्यांची मराठी माणसाला प्रिय असलेली ओळख.
बारकाईने बघितलं तर एखाद्या अभिनेत्याला भाऊ म्हणून ओळखणं यातच निळूभाऊ यांच्याविषयी महाराष्ट्राला किती आपलेपण आहे याची जाणीव होते. अशी ओळख फारच कमी लोकांची असते. दादा, भाऊ ही नेत्यांची ओळख असते आपल्याकडे. पण महाराष्ट्राच्या वैचारिक, सामाजिक आणि कलावंत मंडळींनी निळू फुलेंना आपलं नेतृत्व प्रेमाने सोपवलं होतं. जरा खोलात शिरलं तर लक्षात येतं की निळू फुले यांच्याएवढी कट्टर वैचारिक भूमिका घेणारे नट फारच दुर्मिळ आहेत आपल्याकडे. डॉक्टर श्रीराम लागू अंधश्रद्धेविरोधातल्या लढ्यातले मोठे विचारवंत. आणि निळू फुले थेट समाजवादी विचारसरणीचे. उघड उघड अशी एखादी विचारसरणी स्वीकारण्याचं धाडस दाखवणारे अभिनेते. अशा गोष्टी फक्त निळूभाऊच करू शकत होते.
निळू फुले समाजवादी विचारसरणीचे होते ते काही त्यांना फक्त या विचारसरणीचं आकर्षण होतं म्हणून नाही. त्यांनी लहानपणापासून जातीची उतरंड अनुभवली होती. स्वातंत्र्याच्या आधी जन्मलेल्या निळूभाऊंना एका ठिकाणी आपण ज्या कपात चहा पिलो तो कप बाजूला ठेवला गेला याचा अनुभव आला. सत्यशोधक चळवळीतल्या शिक्षणासोबत सामाजिक भान पण वाढलं. राष्ट्रसेवा दलात काम करताना वैचारिक बैठक पक्की होत गेली. याचा परिणाम म्हणजे आयुष्यभर निळू फुले परिवर्तनवादी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना मदत करत राहिले. मार्गदर्शन आणि सल्ला नाही. आर्थिक मदत!
निळू फुले यांची ही बाजू फार कमी लोकांना ठाऊक आहे. श्रीराम लागू आणि निळू फुले यांनी परिवर्तनवादी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना मदत म्हणून लग्नाची बेडी या नाटकाचे प्रयोग केले होते. देश विदेशात. आणी त्याकाळी नाटकाच्या प्रयोगातून जमा झालेले ९६ लाख रुपये बँकेत फिक्स म्हणून ठेवले. या पैशाच्या व्याजातून दरवर्षी कायर्कर्त्यांना मानधन दिलं जायचं. महाराष्ट्रातील वैचारिक चळवळीला, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याला एवढ भरीव योगदान इतर कुठल्या कलाकाराने दिलं नसेल. विनोदाच्या नादात आपण निळू फुलेंची ओळख ‘ बाई वाड्यावर या ‘ या संवादाएवढीच करून ठेवलीय. पण रात्री अपरात्री एखाद्या कार्यकर्त्याचा अडचणीत असल्याचा फोन आला तरी त्याला तत्काळ मदत कशी मिळेल हे बघणारे निळू फुले, कुणा कार्यकर्त्याच्या घरावरचे पत्रे वादळात उडून गेले हे कळताच त्याला पैसे पाठवून देणारे निळू फुले आपल्याला माहित नसतात.
त्यांना पडद्यावरचा जबरदस्त खलनायक म्हणून आजही ओळखणे हे त्यांच्या अभिनयाचं यश आहे. पण त्यांच्या सामाजिक कामाची ओळख नसणे हे आपलं जागरूक नागरिक म्हणून अपयश आहे.
अरविंद जगताप
0 टिप्पण्या