पिकलं पान... pikalele pan Audiostory mp3 marathi

 🪷 पिकलं पान.....

त्या दिवशी दुपारची गोष्ट.

मी नुकतीच दुपारचा चहा वगैरे घेऊन, छान फुरसतीत घरातच कुंड्यांमधून तयार केलेल्या माझ्या बागेतील झाडं निरखत कौतुकानी त्यांना गोंजारत होते.


झाडांच्या अध्येमध्ये दिसणारी पिवळी पानं माझ्या नजरेला पटकन बोचली. मी आतून कात्री घेऊन परत समोर आले तर

आई घरात शिरत होती.

खूप दिवसांनी आईला आलेली बघून मी जाम खुश झाले. तिला खुर्चीवर बसायला लावत मी म्हटलं... "आई गं, एवढं हातात घेतलेलं पूर्ण करून घेते पटकन, मग मस्त पैकी गप्पा मारत ऐसपैस बसू हं ! " 


मी हातातल्या कात्रीनी कुंडीतल्या झाडांची पिवळी पानं सपासप छाटत बोलत राहिले.

" बघ नं आई, इतकी छान घनदाट, हिरवीगार झालीयेत झाडं पण या पिवळ्या पानांमुळे झाडांची सारी शानच नाहीशी होतेय! म्हणून आज ठरवून , सगळी पिवळी पानं छाटून टाकण्याचा उद्योग चालवलाय मी! "

माझं वाक्य संपून दोन तीन मिनिटं झाली तरी, आई काहीच का बोलत नाही म्हणून मी मागे वळून पाहिलं तर, आई कसल्यातरी विचारात गढल्या सारखी, एकटक नजरेनी, कापून टाकलेल्या पिवळ्या पानांकडे बघत बसली होती. तिचे डोळे मात्र पाण्यानी काठोकाठ भरलेले दिसले. मला काहीच कळेना !


तेवढ्यात आई मनाशीच बोलल्या सारखी म्हणाली " खरंच, पिवळी पानं हिरव्यागार झाडांची सारी शोभाच नाहीशी करतात. तुमच्या हिरव्यागार बहरलेल्या सुंदर संसारात

आम्ही वृद्ध मंडळी पण पिवळ्या पानांसारखी

विशोभित दिसत असू, नाही गं? पण पिवळ्या पानांसारखं आम्हाला काढून टाकता येत नाही.

आपोआप गळून पडेल म्हणून वाट बघावी लागते एवढंच!"


" आई, काहीतरीच हं तुझं! उगाच नाही नाही ते विचार डोक्यात घेऊन, नाराजीचाच सूर तू आजकाल लावत असतेस. अगं पिवळी झालेली झाडांची पानं कापण्याची लहानशी गोष्ट ती काय, आणि तुझे विचार कुठल्या कुठे जाऊन पोहोचले बघ! आताशा तू खूपच बदललीस , हळवी झालीयेस . काय झालंय गं आई? "


मी हातातली कात्री तीथेच ठेवून, आईच्या जवळ जाऊन बसले. लहानपणी सारखा तिच्या बांगड्यांशी खेळ करत राहिले. पण आईचा मूड गेला तो गेलाच. मात्र तिच्या मनात प्रचंड उलथापालथ सुरू होती.खरं तर इतक्या लहानशा घटनेनी तिनं एवढं अस्वस्थ का व्हावं,

हाच विचार मनात मी करत होते. तोच स्वत: होऊनच तीपरत बोलायला लागली.

" अगं मी घरातून निघताना, असलं काही सुद्धा माझ्या मनात नव्हतं.पण तुला असं ते पिवळी पानं सपासप कापताना बघून सहजच माझ्या मनात विचार आला आणि लगेच तो बाहेर पडला सुद्धा ओठातून! बघ बेटा जरा तूच विचार कर... वाढत्या वयाबरोबर, आयुष्याच्या

तिन्हीसांजेला मी कदाचित हळवी झालेही असेन, पण शांतपणे विचार केलास तर तुलाही माझं म्हणणं पटेल बघ! कुणी मुद्दाम नाही गं करत, पण आपोआप, नकळताच आम्हा वृद्धांना किंचित का होईना वेगळी वागणुक वाटेला येतेच बघ! ' आमच्या घरी नं वृद्ध, वयस्कर मंडळी आहेत' असं कुणी म्हटलं तर त्यात आदर, प्रेम जाणवतं, पण आधीच परावलंबी विद्रुप वृद्ध व्यक्तींना कुणी, 'म्हातारे, बुढ्ढे, थेरडे' असले शब्द वापरले की मन अगदी खोलवर घायाळ होऊन जातं बघ! जितकी जास्त वर्ष जगणार तितका जास्त हा अनुभव येणार आणि मनाचा हळवेपणा जास्त वाढणार! " आई बोलता बोलता किंचित थांबली म्हणून मी बोलायचा प्रयत्न केला.


" आई, असं काय गं आज? वेगळेच विचार डोक्यात घेऊन तू पार अस्वस्थ झालीयेस ?

काही घडलंय का वेगळं विशेष?" नाही गं, असं काहीच नाही. आज उगाच बोलावंसं वाटलं झालं! घरात आपण अडगळीपेक्षा 'नकोसे 'आहोत, ही भावना मनात जागी होणं किती दु:खदायक असतं?


दिवसेंदिवस वृद्धाश्रम सुद्धा किती बोकाळलेत बघ की! बरं, त्याला तरी वृद्धाश्रम का गं म्हणायचं? "

" आई, अगं असं काय ? आपला काही संबंध आहे का त्याच्याशी?" मी खरंच काय बोलावं न समजून काहीतरीच बोलले होते, हे मलाही जाणवलं. आईनी तिचं बोलणं पुढे सुरू ठेवलं. अगदी अनाथाश्रमा सारखाच वृद्धाश्रम हा शब्द ही केविलवाणा वाटतो, पोरका वाटतो.


त्या निष्पाप मुलांना निदान, त्यांचे आई-वडील कोण आहेत याची जाणीव तरी नसते. इथे मात्र कित्येकदा सारी नातीगोती असूनही केवळ 'घरात नको' म्हणून हकालपट्टी झालेली असते, ते बघून जीव दुखतो. असं बघ बेटा, आजकाल अगदी लहान मुलांपासून सगळ्यांचे नाही का, निरनिराळे क्लब निघालेत? ते तुमचे,

रोटरी, जेसीज, लेडिज क्लब, शिवाय फुलापानांसाठीचे गार्डन क्लब, सगळे नावाजलेले आहेत. 


तसंच एखादं गोंडस नाव द्यावं अशा वृद्धाश्रमांना गं !" खरंय आई तुझं! किती छान विचार मांडते आहेस तू आज!" मी म्हणाले. अगं कसलं काय, सहज मनात आलं तेवढंच!

खरं तर ' ओल्ड इज गोल्ड ' ही म्हण आम्हा वृद्धांसाठी किती सार्थ आहे बघ नं ! ओल्ड चा अर्थ वयस्क , वृद्ध असा घ्यायचा आणि गोल्ड चा अर्थ सोनं असा न घेता, सोन्यासारखा पिवळा असा घ्यायचा. मग याच न्यायानं जर 

वृद्धाश्रमाला ' गोल्डन क्लब ' असं नाव दिलं तर कानांनाही ऐकायला किती चांगलं वाटेल? सर्व वृद्धांचा अर्थात पिवळ्या पानांचा तो 'गोल्डन क्लब' हो नं?

आईच्या विचारांचं मला सकौतुक आश्चर्य वाटत होतं. इतके दिवस वाटायचं, इतर सर्वांच्या आई सारखीच आपली पण आई आहे. प्रेमळ, शांत, कामसू, हसतमुखानं सारं सहन करणारी! पण आज मात्र तिच्या विचारांनी मी अगदी भारावून गेले होते. आईचा सुरकुतलेला हात कुरवाळत मी म्हणाले.....


"हे मात्र खरंय हं आई! वृद्धाश्रमाला 'गोल्डन क्लब' म्हणण्याची तुझी कल्पना आणि त्या मागची भावना एकदम झकास आहे बरं का! पण घरातल्या वृद्धांची काय किंवा पिकल्या पानांची काय, गरजच नसते असं मात्र अजिबात नाहीये हं! बाळंतपणात नाही का, विड्याच्या पिकल्या पानांना, औषधी गुणांच्या दृष्टीनं किती महत्त्व आहे? आणि केवड्याच्या कणसाची पिवळी धम्म पानं किती छान सुगंध पसरवत चक्क गणपतीच्या मस्तकावर विराजमान होतात? आई, तसंच घरातलंही आहे गं! कित्येक महत्त्वाच्या गोष्टीत, घरातील वृद्धांचा सल्ला, अतिशय गरजेचा असतो बघ.


कडू गोड अशा अनेक अनुभवांनी माणूस वृद्धत्वाला पोहोचतो अन् हेच अनुभव दुसऱ्या पिढीला ठेचा लागू नयेत, म्हणून कामात येतात, हो नं? त्याहीपेक्षा कुणी तरी आपल्या पेक्षा मोठं घरात आहे, या कल्पनेनीच इतरांना आपलं लहानपण जपता येतं. नमस्कारासाठी

वाकायला, आशिर्वादाचा हात डोक्यावर ठेवायला, लहानाचं कौतुक करायला घरातले वृद्ध घरातच असायला हवेत नं आई? नाही ते विचार तू डोक्यात नको हं घेऊस !"


आईच्या हातावरील एक एक सुरकुती, बोटांनी मिटवून बघण्याचा वेडा चाळा करत मी आईची

समजूत घालून बघितली. तिचं कितपत समाधान झालं, कुणास ठाऊक! पण तिचा मूड मात्र ठीकठाक झाला. डिंकाच्या आणि मेथीच्या लाडवांचा डबा माझ्या हातात ठेवत, तिनं म्हटलं, "सध्या थंडी भरपूर आहे, पंधरा दिवसात संपवून टाका बरं का गं!"


मी ही तिच्या समोरच एक लाडू खायला घेत म्हटलं,

" आई, जेव्हा पासून तुझ्या हातचे हे लाडू खातेय, तेव्हा पासून त्याची चव अगदी सारखीच कशी गं?"

" अगं साऱ्या मेव्या सोबत, आईची तीच माया पण त्यात असते नं, मग चव कशी बदलणार बाळा?"

आम्ही दोघीही मनापासून हसलो. नाश्ता, चहा घेताना मग वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या. आईचा मूड चांगला झाला याचंच मला मनापासून समाधान वाटलं.आई घरी जायला निघाली. कुंडीतल्या झाडांना तिच्या सुरकुतल्या हातांनी हलकेच गोंजारलं, अगदी मला गोंजारावं तसं! झाडांची कापून टाकलेली पिवळी पानं हळूवारपणे ओंजळीत धरून, क्षणभर कपाळावर टेकवली आणि सोबतच्या पिशवीत घालत म्हणाली, "घरी गेल्यावर यांना विहिरीत शिरवून टाकेन" डोळे तुडुंबले होते तिचे.


मी ऑटोरिक्षा पर्यंत आईच्या सोबत निघाले. आईने नेहमी सारखाच निरोप घेतला. "ये बरं का गं घरी! मुलांना घेऊन निवांतपणे ये रहायला आणि हो 'गोल्डन क्लबचा' विचार असू दे बरं का मनात!" एवढं म्हणेस्तोवर रिक्षा निघाली. निरोपाचा हात हलवत, रिक्षा नजरेआड होईपर्यंत मी बघत राहिले. ऑटो दूर दूर जात होती. परत येताना मी आईच्या बोलण्या वागण्याचाच विचार करत होते. चार दिवसांनी आई एकाएकीच गेली. झाडाची पिवळी पानं गळून पडावीत, तितकी सहज!

आता मात्र मी सतत विचार करते, " हिरव्यागार झाडांची शान पिवळ्या पानांमुळे नाहीशी नाही होत, उलट भरल्या घरात वयोवृद्ध व्यक्ती, नमस्कार करायला वाकल्यावर आशीर्वाद द्यायला असाव्यात, तशी ही पिवळी पानं मला वाटायला लागली आहेत."


तेव्हा पासून झाडांवरची पिवळी पानं छाटणं मी पार सोडून दिलंय आणि आईचं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी ' गोल्डन क्लब' चा विचार मात्र मनात पक्का केलाय!


*मीनाक्षी मोहरील,*

*सुनील इनामदार.*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या