दिसणाऱ्या गोष्टी पेक्षा अदृश्य गोष्टीतच जास्त समावलेले असते ! Marathi audiostory mp3

सागराच्या अंतरंगात  

माणूस अज्ञात गोष्टींबाबत नेहमीच काहीतरी आखाडे बांधत गेला आणि निसर्ग आपल्याला चुकीचं ठरवित आलाय. खोल सागराच्या उदरामध्ये असलेल्या जीवांबाबतही अगदी हेच घडलं. अगदी १९व्या शतकापर्यंत शास्त्रज्ञ सुद्धा अतिखोल समुद्रात जीवसृष्टी नसेल असेच समजत होते आणि त्याला समर्थन देऊ शकतील अशी कारणंही त्यांच्याजवळ होती [आणि ती थोडीफ़ार पटण्यासारखीसुद्धा होती]. पण पुन्हा एकदा निसर्गाने माणसाला चुकीचं ठरविलं! याचा अर्थ असा नाही की शास्त्रज्ञांनी मांडलेले मुद्दे चुकीचे होते,पण निसर्गाने त्याची उत्तरं नक्कीच शोधली होती. पाहूयात ते मुद्दे आणि जीवसृष्टीनी त्यावर शोधलेले उपाय...

प्रकाश
अतीखोल समुद्रात कायम रात्र असते, अगदी मिट्ट काळोख. अशा ठीकाणी जगणे फ़ार अवघड बनते.विचार करा की तुम्ही अशा ठीकाणी रहाताय जिथे कधीच सुर्यप्रकाश पोहोचत नाही, प्रकाश नसताना काहीच न दिसल्याने हालचाल करणं अशक्य होईल आणि पर्यायाने अन्न शोधणं सुद्धा! पण अतिखोल समुद्रातील जीवांनी याची आपापल्या परीने उत्तरे शोधली. स्वयंप्रकाशीत रहाणे हा त्यातलाच एक. या प्रकारचे जीव स्वत:च्या शरीरातू काही रासायनिक अभिक्रीयांद्वारे कमी प्रतीचा प्रकाश निर्माण करतात [bioluminescence]. आता प्रकाश असला तरी तो काही फ़ारसा नसतो म्हणून मग इथल्या जीवांनी आपल्या डोळ्यांत बदल घडवून आणले, या जीवांचे डोळे [असल्यास :)] इतर जीवांपेक्षा कितीतरी मोठे असतात ज्यामुळे ते कमीत कमी प्रकाशात सुद्धा पाहू शकतात. अतीखोल समुद्रात प्रकाश शक्यतो नीळ्या आणि हिरव्या रंगात असतो. पण काही जीवांनी लाल प्रतीचा प्रकाश निर्माण करण्याची क्षमतासुद्धा विकसीत केली आहे, याचा वापर मुख्यत: शिकार आकर्षित करण्यासाठी केला जातो. हे जीव स्वयंप्रकाशाचा वापर आपल्या जोडीदाराला आकर्षित करण्यासाठीसुद्धा करतात. स्वयंप्रकाशाशिवाय विकसित झालेला आणखी एक पर्याय म्हणजे रासायनिक गंध ओळखण्याची क्षमता. या क्षमतेचा वापरसुद्धा भक्ष्य पकडणे, जोडीदारास आकर्षित करणे यासाठी केला जातो.

तापमान
समुद्राच्या उथळ पट्ट्यातील आणि उथळ ते खोल पट्ट्यातील तापमान यात आणि अतीखोल समुद्रातील तापमान यात कमालीचा फ़रक असतो. उथळ आणि उथळ ते खोल अशा पट्ट्यांमधे असलेल्या थंड व गरम पाण्याच्या प्रवाहांमुळे आणि अर्थातच सुर्यामुळे जागोजागी तापमानात बदल होतो. हा बदल जीवसृष्टीसाठी पोषकच ठरतो. पण अतीखोल समुद्रात मात्र सगळीकडे समान तापमान असते [२ ते ४ डीग्री], अपवाद फ़क्त hydrothermal vent communities चा [अतीखोल समुद्रातील ज्वालामुखी कींवा लाव्हा निघण्याची ठीकाणे]. पण इथल्या जीवांनी अशा वातावरणात जगण्याची सवय करुन घेतली आहे.

दाब
अतीखोल समुद्रातील जीवसृष्टीमध्ये वातावरणीय दाब हा खुप महत्वाचा घटक ठरतो. समुद्रसपाटीवर हा दाब १atm इतका असतो समुद्रसपाटीपासुन वर हा दाब कमी होत जातो, तर खाली वाढत जातो. समुद्रात दर १० मी. खोलीवर दाब १atm ने वाढतो. अतीखोल समुद्राची पातळी ७०० ते १०,००० मीटर इतकी मानली गेली आहे, या भागात वातावरणीय दाब कमीत कमी २० ते जास्तीत जास्त १०००atm इतका असतो एकुण सरासरी ३०० ते ६००atm, म्हणजे प्रती वर्ग सें.मी. वर ३०९.९७ ते ६१९.९५ कीलो वजना इतका भार! पण जीवसृष्टीने अनुकुलनाद्वारे यावरही मात केली. या भागात रहाणा-या जीवांमध्ये कुठल्याही प्रकारची पोकळी नसते अगदी पोहोण्यासाठी लागणारे swim bladders सुद्धा. तसेच ह्या जीवांचे अवयव फ़ार मऊ आणि लवचिक असतात, अगदी हाडेसुद्धा. त्यामुळे अतीदाबाखाली अवयवांची मोडतोड होण्याचा धोका कमी होतो. पण मग अशा जीवांना परीक्षणांसाठी जमीनीवर आणणे खुप जिकीरीचे होऊन बसते, कारण कमी दाबामुळे अवयव प्रसरण पावून फ़ुटण्याची शक्यता असते.

प्राणवायू
अतीखोल समुद्राचा थंड आणि काळाकुट्ट प्रदेश प्राणवायूच्याबाबतीतसुद्धा प्रतिकूल आहे. सागराच्या पृष्ठभागाकडून या भागात प्राणवायू तेव्हाच प्रवाहित होतो, जेव्हा सागराच्या काही भागात पृष्ठभागाकडील तापमान कमी होते.प्राणवायू प्रवाहित करणारे हे पाणी बहूधा ध्रूवीय प्रदेशा कडील असते. पण प्राणवायूच्या बाबतीत हा भाग सर्वात गरीब नक्कीच नाही. समुद्रात ५००-१००० मी. खोलीचा भाग प्राणवायूच्या बाबतीत सर्वात प्रतिकूल आहे. अतीखोल समुद्रातील प्राणवायूचे कमी असलेले प्रमाण मात्र जीवसृष्टीसाठी अडथळा ठरत नाही. कारण या भागात रहाणा-या जीवांची संख्या त्यामानाने कमी आहे, आणि त्यातही बरेचसे जीव प्राणवायूची कमी गरज असणारे किंवा काही तर प्राणवायूची गरज नसणारे आहेत.

अन्न
अन्न आणि प्रकाश अशा दोन्ही गोष्टींचे दुर्भिक्ष्य असलेल्या या प्रदेशात जीवांनी अन्न मिळवण्याच्या काही रंजक पद्धती विकसीत केल्यात. या भागात मिळणारे अन्न म्हणजे, समुद्राच्या वरच्या भागातून खाली येणारे आणि ब-याचदा विघटीत होत असलेले वनस्पतींचे अवशेष कींवा कोण्या जीवाने केलेल्या शिकारीचे उरलेले तुकडे. एखाद्या मोठ्या प्राण्याच्या मृत्यूनंतर (उदा. देवमासा) खाली येणारे शरीर म्हणजे पर्वणीच! असे प्रसंग वारंवार येत नसल्याने मग सगळेच जीव त्यावर तुटून पडतात आणि जितके घेता येईल तेवढे खाऊन घेतात, यासाठी त्यांच्यामध्ये मोठे आणि गरजेनुसार आणखी मोठे होवू शकणारे पोट असते. लॅम्प्रे किंवा हॅम्पफीश सारखे मासे तर भक्ष्याच्या आत शिरुन त्याला आतून बाहेर खातात. भक्ष्य पकडण्यासाठी सुध्दा इथले जीव नामी क्लृप्त्या वापरतात, शिकारीसाठी वणवण भटकण्यात शक्ती वाया घालवण्यापेक्षा भक्ष्य आपल्याकडे आकर्षित करण्याकडे त्यांचा कल असतो.

आता हे सर्वांनाच माहिती आहे की अतीखोल समुद्रात देखील जीवसृष्टी आहे. तर मग याच जीवसृष्टीतील एक जीव आपण पुढच्या post मध्ये पाहू.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या