जिहाले मस्कीं मकुन ब-रंजिश song review in mp3 marathi

 
🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼

जिहाले मस्कीं मकुन ब-रंजिश

🎤🪕🎸🪗🎺🎷🪘🥁🎹

मिथूनच्या ‘गुलामी’ या चित्रपटाला ३५ वर्षे झाली. सिनेमा कसा होता, किती चालला, यापेक्षाही या सिनेमातील एका गाण्याची चर्चा आजही तितकीच होत राहते ते म्हणजे ‘जिहाले मस्कीं मकुन ब रंजिश’ हे अप्रतिम सुंदर गीत. या गाण्याबद्दल यापूर्वीही चर्चा झाली असेलच. पण त्यावर आमचेही दोन शब्द…


कांही गाणी इतकी अवीट असतात की ती आपल्या ओठी कायमची रुळलेली असतात. ती कोणत्या सिनेमातील आहेत, कोणावर चित्रित झालेली आहेत याचा विचारही अनेकदा येत नाही. काही गाण्यांची चाल इतकी मनाला भावते की अनेकदा त्या गाण्याचे बोल काय आहेत हेही आपल्या लक्षात येत नाहीत. असेच एक ‘जिहाल-ए- मस्कीं’ हे गीत…


हे गीत आवडणाऱ्यांपैकी ९० टक्के लोकांना तरी याचे खरे शब्द काय आहेत याची माहिती नसते किंवा त्या शब्दांचा अर्थही माहिती असण्याची शक्यता नाही. तरी हे गीत प्रत्येकाच्या ओठी आहे. १९८५ सालच्या ‘गुलामी’ चित्रपटात मिथुन आणि अनिता राज यांच्यावर चित्रित झालेल्या गुलजार यांच्या रचनेला लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी दिलेली अनोखी चाल हे त्याचं वैशिष्ट्य. गानकोकिळा लता मंगेशकर यांनी कांहीसा लोकसंगीताचा बाज घेत एका वेगळ्याच ठसक्यात गात या गाण्याला चार चाँद लावले आहेत. शब्बीर कुमार यांच्या कारकिर्दीतील हे सर्वात लोकप्रिय गीत असावे…


मला अगदी आता-आतापर्यंत या गाण्याचे बोल ‘जिहाले मस्ती मुकन वरंदिश बहाले हिजडा’ असे काहीबाही ऐकू यायचे. साहजिकच, शब्दच इतके कठीण तर त्याचा अर्थ माहीत असणे कोसो दूर. माझ्या आवडीच्या गाण्यांपैकी हे एक. गुलजार यांनी या गीताच्या बाबतीत अनोखा प्रयोग केलेला आहे. या गाण्याचा मुखडा फारसी भाषेत आहे. तेराव्या-चौदाव्या शतकातील प्रसिद्ध हिंदी कवी अमीर खुसरो यांच्या गझलेवरून गुलजार यांनी तो उचलला असून त्यात अल्पसा बदल केलेला आहे.


खुसरो यांची गजल अशी आहे -


ज़िहाल-ए मिस्कीं मकुन तगाफ़ुल,

 दुराये नैना बनाये बतियां |

 कि ताब-ए-हिजरां नदारम ऐ जान,

 न लेहो काहे लगाये छतियां ||


आता यात आणखी गंमत म्हणजे खुसरो यांनीही या गजलेत वेगळा प्रयोग केलेला आहे. यातील एक ओळ फारसी भाषेत आणि दुसरी ओळ ब्रज (हिंदी) भाषेत आहे. खुसरो यांनी अलाउद्दीन खिलजीसह तब्बल सात सुल्तानांच्या सत्ता अनुभवल्या, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना स्थलांतर करावं लागलं. साहजिकच, त्यांच्या कवितांमध्ये त्या त्या ठिकाणची भाषा प्रतिबिंबित झाली. या गझलेतील फारसी शब्द गुलजारजींनी उचलले आणि गाण्याचा असा सुंदर मुखडा तयार झाला…


जि-हाले-मिस्कीन मकुन ब-रंजिश; ब-हाले-हिज्रां बेचारा दिल है

(माझ्याकडे अशा अनोळखी, परक्या नजरेने नको पाहूस. आधीच ते विरहामुळे पोळलेलं आहे. )


सुनाई देती है जिसकी धड़कन, तुम्हारा दिल या हमारा दिल है


(कातरवेळेची विरहयातना आणि त्यातच अनाहूतपणे वाढलेले हृदयाचे ठोके, नेमके कोणाच्या ह्रदयाचे आहेत? की दोन्ही हृदये सारखीच धडकत आहेत आणि त्याचा आवाज थेट या हृदयीचा त्या हृदयी पोहचत आहे ? )


वो आके पेहलू में ऐसे बैठे…

के शाम रंगीन हो गई है

ज़रा-ज़रा सी खिली तबीयत ज़रा सी ग़मगीन हो गई है


(तो असा माझ्या शेजारी येऊन बसला, की जणू ही सायंकाळच विविध रंगांत न्हाऊन निघाली आहे. अर्थात् त्यामुळे मन मोहरून तर गेलंय, पण का कुणास ठाऊक, जराशी हुरहुर, उदासीही दाटून आलीय..

(येथे ‘वो आके पहलूं में ऐसे बैठे’नंतर लताजींनी अशी तान घेतलीय..आहाहा..)


अजीब है दिल के दर्द यारों; न हों तो मुश्किल है जीना इस का

जो हों तो हर दर्द एक हीरा;

हर एक ग़म है नगीना इस का


(या हृदयाच्या जखमाही विचित्रच आहेत. त्या असल्या तरी त्रास आणि नसल्या तर जगणंच कठीण होऊन बसेल, नाही का? या जखमा असतील तर त्यातील प्रत्येक वेदना जणू काही एक एक अनमोल हिराच आणि या हृदयाचं प्रत्येक दु:ख म्हणजे किमती नगीनाच. )


कभी-कभी शाम ऐसे ढलती है… 

जैसे घूंघट उतर रहा है!


(ही सुंदर संध्याकाळ कधी कधी एखाद्या नव्या नवरीप्रमाणे भासते, जणू काही अलवारपणे आपला पदर ती डोईवरून खाली घेतेय…)


तुम्हारे सीनेसे उठता धुंआ हमारे दिलसे गुज़र रहा है!


(तिच्या मनातील भावना याच्या मनाच्या कप्प्यात पोहचल्यात. तुझ्या हृदयात लागलेल्या (प्रेमाच्या ) आगीचा धूर माझ्या हृदयातून आरपार जातोय. त्यामुळे त्या आगीची तीव्रता तितकीच माझ्या हृदयालाही जाणवतेय.)


ये शर्म है… या, हया है… क्या है? नज़र उठाते ही झुक गई है

 तुम्हारी पलकोंसे गिरके शबनम हमारी आंखोंमें रुक गई है !


(ती इतकी लाजून चूर झालीय की, पापण्या वर करताच लागलीच त्या आपोआप जमिनीकडे झुकल्यात. पण तुझ्या त्या पापण्यांतून पडलेले प्रेमाश्रूंचे तुषार जणू माझ्या डोळ्यांत येऊन थांबलेत…)



*हे वाचून झाल्यावर तुम्ही पुन्हा ते गाणं ऐकाल तेंव्हा मात्र ते खूप आत काळजात घुसतं.. आणि कलाकार नेमके काय ताकतीने भूमिका वटवतात ते कळत..*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या