बिंब प्रतिबिंब ...

 आज मातृदिन. त्यानिमित्ताने माय लेकीच्या अनोख्या नात्याचा वेध घेणारा हा लेख खास आपल्यासाठी.....


 बिंब प्रतिबिंब ...


लहानपणी अभ्यासात असणाऱ्या काही कविता आयुष्यभर लक्षात राहतात. कारण त्या कवितांमध्ये आपले भावविश्व व्यापून टाकण्याची शक्ती असते. कवी कृ ब निकुंब यांची ' घाल घाल पिंगा वाऱ्या ' ही अशीच एक कविता. या कवितेत सासरी गेलेली लेक आपल्या आईची आठवण करते आहे. आणि वाऱ्याला जणू आपले मनोगत सांगते आहे. ती म्हणते


घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात

माहेरी जा सुवासाची कर बरसात .


सासरी गेलेल्या आपल्या मुलीची आईला काळजी असते. म्हणून ती वाऱ्याला सांगते


सुखी आहे पोर सांग आईच्या कानात

आई, भाऊसाठी परी मन खंतावतं


पुढे या कवितेचं गाणं झालं.आणि सुमन कल्याणपूर यांच्या स्वरांनी शब्दांचं सोनं झालं. सुमन कल्याणपूर यांच्या गोड गळ्यातून सासरी गेलेल्या लेकीच्या भावना या गाण्यातून जणू मूर्तिमंत प्रकट होतात. आजही कधी ते गाणं ऐकलं की डोळे भरून येतात. मी जरी पुरुष असलो तरी अशा वेळी त्या गाण्यातली लेक माझ्या मनात शिरते आणि डोळ्यातील आसवांच्या रूपाने बाहेर पडते. वसंतराव देशपांडे यांनी गायिलेलं ' दाटून कंठ येतो ' ही असंच . अर्थात ती वडिलांची हृदयवेदना आहे. सासरी जाणाऱ्या मुलीसाठी.


बहिणाबाईंच्या कवितेतल्या काही काही ओळींना तर सुभाषितांचे मोल आले आहे. ' आधी हाताले चटका, तेव्हा मिळते भाकर ' किंवा ' माणसा माणसा कधी होशील माणूस ? ' अशाच एका कवितेत त्या सासरी गेलेल्या मुलीच्या भावना साध्या सोप्या शब्दात किती सुंदर वर्णन करतात. एक साधू भिक्षा मागत येतो. त्यावेळी सासरी असलेली मुलगी शेतावर काम करीत असते. ती त्या साधुजवळ आपल्या माहेरचं वर्णन करते. आपलं दुःख व्यक्त करते. त्यावेळी तिचे डोळे भरून येतात. तेव्हा तो साधू म्हणतो, ' एवढं तुझं आईवर प्रेम आहे तर तू माहेरी का जात नाहीस ? ' यावर ती फार सुंदर उत्तर देते


ऐक ऐक साधुबोवा, काय मी सांगते

लेकीच्या माहेरासाठी, माय सासरी नांदते.


जीव ओवाळून टाकावा अशा या ओळी . आईची नि माहेरची महती यापेक्षा अधिक चांगल्या शब्दात कोण सांगू शकेल ?


बहिणाबाईंच्या या कवितेत मी काही ओळींची भर टाकू इच्छितो. अशी कल्पना करू की तो साधू त्या लेकीला विचारतो आहे, की तू इथे का नांदतेस मग ? तेव्हा ती नक्कीच असं म्हणेल


ऐक एक साधुबोवा, काय मी सांगते

माहेरच्या नावासाठी, लेक सासरी नांदते.

लेक दुवा दोन्ही घरचा, सासर माहेर सांधते .


माय नि लेकीचं नातंच अनोखं. अनेकरंगी. अनेक पदर असलेलं. आई बिंब तर लेक प्रतिबिंब. खरं तर आईचं आपल्या साऱ्याच लेकरांवर खूप प्रेम. लेकरं आजारी पडली की आईचा जीव व्याकुळ होतो. ती त्यांची सेवाशुश्रूषा करताना तहानभूक सगळं विसरून जाते. पण जेव्हा आई आजारी पडते, तेव्हा लेकीचा जीव आईसाठी जास्त तुटतो. लेकाचा तुटत नाही असं नाही. पण मायलेकींची ओढच वेगळी. त्यांची माया, त्यांचे प्रेम अवघे विश्व व्यापून दशांगुळे उरते. प्रसंग पडला तर आईसाठी तिची ही लाडकी लेक आपल्या नवऱ्याला किंवा आईकडे लक्ष न देणाऱ्या आपल्या भावालाही चार शब्द सुनावते. ती दोन्ही घरं सांभाळते.


आज काळ बदलला आहे. मुलगा आणि मुलगी आपण समान मानतो आहोत. पण मध्यंतरीच्या काळात मुलगी झाली की घरातली मंडळी नाराज होत असत. पण आई ..? तिला आपली मुलगी प्रियच असायची. ती एका ओवीत म्हणते


लेका गं परीस, लेक कशियाने उणी

गुणांची लेकीबाई, हिरा नव्ह, हिरकणी.


तर एका लोकगीतात आपल्या आईबद्दल बोलताना लेक म्हणते


गणगोतांमधी सये, माझी माऊली अधिक

माझी मायबाई, शुद्ध गंगेचं उदक.


किती सुंदर ओळी आहेत या लोकगीतातल्या. कित्येक पी एच डी अशा ओळींवरून ओवाळून टाकाव्या. पुस्तकी पांडित्य असलेल्या लोकांपेक्षा अशिक्षित स्त्रियांनी या लोकगीतांतून केवढा विलक्षण ठेवा आपल्या हाती दिला आहे. वरच्या ओळीत लेक म्हणते की सगळ्या नात्यांपेक्षा माझी आई मला अधिक प्रिय आहे. कशी आहे ती ? ' शुद्ध गंगेचं उदक ' यापेक्षा सुदंर उपमा कोणती असू शकेल ? गंगेसारखी पवित्र, निर्मळ ,शुद्ध.


अशी ही गंगेसारखी निर्मळ असलेली आई आपला वारसा आपल्या मुलीला देते. तिच्यामध्ये ती आपले प्रतिबिंब पाहते . आपण संसारात असताना जो त्रास भोगला, कष्ट भोगले ते आपल्या लेकीच्या वाट्याला येऊ नये म्हणून किती प्रयत्नशील असते. आपल्या जगण्यातला सारा शहाणपणा, समजूतदारपणा, क्षमा, संस्कार सारे सारे आपल्या लेकीला भरभरून देत असते. तिच्या मनात एकच भावना असते की माझी लेक सासरी सुखात राहावी, तिने आपल्या आयुष्यात प्रगती करावी. दोन्ही कुळांचे नाव काढावे.


आई ही कुठलीही असो. ती मानव असो की प्राणी. आपल्या पिलांवर तिचा खूप जीव असतो. ती देशातली असो की परदेशातली. पुलंच्या ' अपूर्वाई ' मध्ये ते इंग्लंडमधल्या एका आईचं उदाहरण सांगतात. तिची मुलगी एअर होस्टेस असते. पण त्या आईला आपल्या मुलीच्या लग्नाची काळजी लागून राहिलेली असते. म्हणून पुलं म्हणतात, ' पुण्यातली शांताबाई असो की इंग्लंडमधली जेन. आई ती आईच. '


सासरी गेलेल्या मुलीचं हळवं स्थान म्हणजे आई. कुठे खुट्ट झालं तरी ' आई आई. ' खरं तर आता तीही आई झालेली असते. पण आईसाठी तिचं मन अजूनही माहेरच्या वाटेनं धाव घेत असतं. अक्षयतृतीयेला ग्रामीण भाषेत आखाजी म्हणतात. या आखाजी आणि दिवाळीला लेकीला माहेरची आस असते. भाऊ, वहिनीची सुद्धा तिला आठवण येत असते .' साधी माणसं ' या चित्रपटातलं गीत किती सुंदर आहे. माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जात. या गाण्यात ' धावत माहेरच्या वाटेनं मन जातं ' हे शब्द तिला माहेरची किती ओढ लागली ते सांगतात.


बऱ्याचदा आई आणि लेक या चांगल्या मैत्रिणी असतात. आईनं लेकीजवळ आपलं मन व्यक्त करावं नि माहेरी आलेल्या लेकीनं आपल्या भावना आईजवळ व्यक्त कराव्यात. त्यांच्याएवढी भावनिक जवळीक कोणत्याच नात्यात नसते. हे नातं नाजूक आहे, रेशमी आहे. पण या नात्याची वीण घट्ट आहे. कधी न तुटणारी. माहेरी मन धाव घेत असलं तरी संसाराच्या जबाबदाऱ्या तिला अडवतात. पण संधी मिळेल तेव्हा माहेरच्या ओढीनं लेक धावत येते. लेक माहेरावरून परत जाताना ती खूप काही घेऊन जाते. ती घेऊन जाते आनंद, समाधान, तृप्ततेची भावना. या गोष्टी दाखवता येत नाहीत. पण लेकीच्या चेहऱ्यावर प्रकट होतात. जणू मूठभर मांस चढतं .


पण सतत सावलीत वाढणारं रोपटं हे ऊनपावसाच्या झळा सहन करू शकत नाही. म्हणून या नात्याच्या मर्यादा आणि ताकद ज्यांनी ओळखली त्या मायलेकी आयुष्यात सगळ्या प्रसंगांना तोंड द्यायला तयार होतात. सगळ्या प्रसंगांना तोंड देण्याची तयारी असलेली लेक आयुष्यात काही कर्तृत्व करून दाखवू शकते. असे आहे मायलेकींच्या नात्याचे वेगळेपण. पण मायलेकींच्या नात्याचा हा गोफ अधिक विशाल करता येऊ शकेल. आईच्या मायेला पारख्या झालेल्या समाजातील एखाद्या लेकीला आईची माया देता येईल. सुनेची आई होता येईल. . आणिआईसाठी आसुसलेल्या लेकींना आपल्या सासूमध्ये किंवा ज्यांना आधाराची गरज आहे अशा स्त्रियांमध्ये आपल्या आईला पाहता येऊ शकेल. आज समाजाची ही गरज आहे.



style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-7384059194066495"
data-ad-slot="7297264882">

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या