#सख्या!!! sakhya | short Audio story

 #सख्या!!!


सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तरं देण्याआधी तिनी सगळ्यांचे डी.पी. बघायला सुरुवात केली... कुणी अमेरिकेत स्थायिक झाली होती.. तिथेच नोकरी करत होती... कुणी इथेच सरकारी नोकरीत!.. कुणाचं स्वतः च दुकान... कुणाचा ऑनलाइन बिजनेस... कुणी शिक्षिका... कुणाचे क्लासेस!... ती मात्र ' फक्त गृहिणी!!!'


काही जणी शाळेत अगदी बावळट होत्या... आता मात्र चांगल्याच मॉडर्न आणि सुंदर दिसत होत्या!.. तशी ती ही फार बदलली नव्हती पण फार तर फार चुडीदार किंवा लेगिंग - टॉप यापुढे मजल मारलीच नव्हती तिनी कधी!!..


कुणाचे नवऱ्या सोबत चे फोटो होते... कुणाचे मुलांसोबत!!... काहींची मुलं तर अगदी लहान होती.... "लग्न उशिरा झाली असावीत!" तिनी मनात विचार केला!.. तिचं मात्र ग्रॅज्युएशन होता होता लग्न झालेलं होतं!!... आणि वर्षभरात लेक पदरात!!... त्यामुळे करीयर वगैरे विषय कधी आलेच नाहीत डोक्यात!!...

ती एकीकडे हे सगळे विचार करत असताना... ग्रुप मध्ये गप्पांना ऊत आला होता!...


" रात्रीचे अकरा वाजले असताना या सगळ्या कश्या जाग्या राहू शकतात?... यांच्या घरचे काही म्हणत नसतील का यांना??"... एकीकडे हा विचार करत असतानाच तिचं लक्ष तिच्या घरच्यांकडे गेलं... सगळे आपापल्या खोल्यांमध्ये निघून गेले होते!.. आणि तरीही तिच्या मनात धाकधूक आणि थोडी गिल्ट मात्र होतीच!

शाळेत असताना हुशार मुलींचा एक ग्रुप होता.... ज्यांना कमी मार्क मिळायचे त्यांचा वेगळा ग्रुप होता... आणि तिच्यासारख्या मुली मात्र कधी या तर कधी त्या ग्रुप मध्ये येऊन जाऊन असायच्या!... तेव्हाही आपण अश्याच होतो!... असा मनात विचार आला... आणि कोणालाही उत्तर न देता सरळ फोन बंद करावासा वाटला!...

तिनी एकदा सहज गप्पांवरून नजर मारली. आणि " हाय" चा मेसेज पाठवला च!!


सगळ्या जणी तिच्यावर अक्षरशः तुटून पडल्या!!... कित्ती प्रश्न!!...कित्ती आठवणी!... सगळ्याजणी खूप खुश होत्या!... कितीतरी वेळा कितीतरी जणींनी तिला शोधायचा खूप प्रयत्न केला होता!... तिच्या शाळेत असतानाच्या कितीतरी गोष्टी ... कितीतरी सवयी जवळ जवळ सगळ्यांना लक्षात होत्या!...खूप चिडवा चिडवी झाली!.. बऱ्याच दिवसांनी शाळेतल्या नावानी कुणीतरी बोलावत होतं तिला!... ती मनातून कुठेतरी खूप सुखावली...नाही नाही म्हणता बराच उशीर झाला !

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या आपसूक फोन हातात आला... तिघी चौघी हजर होत्या!... त्यांच्याशी जुजबी गप्पा झाल्या!...कुणी बागेतल्या फुलाचे फोटो पाठवत होती... कोणी योगासनांचे... कोणी चहाच्या कपाचे... कोणी बनवलेल्या नाश्त्याचे... बाकी कसलीच चर्चा नाही!... कुठल्याही प्रकारची निगेटिव्हीटी नाही... आज का कुणास ठाऊक पण नेहमीपेक्षा जरा फ्रेश वाटत होतं!!... सकाळची काम सुरू होती... लेकीचा अभ्यास सुरू होता आणि तरीही मधून मधून मिनिटभर का होईना ती फोन बघत होती!... एकटीच हसत होती... काही टाईप करण्यात रमत होती... मुलीची शाळा संपल्या संपल्या तिनी वाढलेल्या ताटाचा फोटो काढून ग्रुप वर पाठवला.... त्यानंतरचा किती तरी वेळ कुणाकुणाला कुठल्या कुठल्या रेसिपी सांगण्यात गेला!!... 


आज तिला नेहमीपेक्षा जरा बरं... जरा वेगळं वाटत होतं एवढं मात्र नक्की!! 


मग रोजच कसले ना कसले चॅलेंज... कुणाला मदत म्हणून काही सल्ले... कधी कधी तर अगदी भेंड्यासुद्धा रंगत होत्या!..


ती चांगलीच रमत होती सगळ्यात!... 

आता गप्पांमध्ये कळत होतं... की इरून फिरून सगळ्यांनाअधून मधून कधीतरी तिच्यासारखं वाटतच असतं!..


संध्याकाळी ती तिच्या खोलीत बसून मेसेज बघत असताना अहो शेजारी येऊन बसले...


म्हणाले... " काय ग?... नक्की झालंय काय तुला?.. नेहमीपेक्षा उत्साहात असतेस..... सारखा मोबाईल घेऊन बघत असतेस?"


ती थोडी खजील झाली... म्हणली.. " काय झालं?... काही राहिलय का माझ्याकडून? " मनात एक शब्द चमकून गेला... "धांदरट!!"


तसे अहो म्हणाले, " अगं तसं नाही... सगळं व्यवस्थित आहे... सगळ्याच सगळं नीट करतेस च की तू!... पण तरीही थोडी अलिप्त... थोडी बुजल्यासरखी वाटायचीस कधीकधी... नक्की काय हरवलं होतं ते कळत नव्हतं!... पण ते जे काही होतं ते आता तुझं तुला मिळालं असं वाटतंय! "...


तिनी हासून फोन दाखवला... ग्रुप दाखवला... आणि म्हणाली... " आपण मोठे होत जातो ना... तसं वेगवेगळ्या कारणांनी आपलंच एक एक जग मागे सोडत जतो आपण!... आणि बरेचदा आपल्याला ते जाणवतच नाही!.. त्या जगात माणसं असतात... जागा असतात... आठवणी असतात!...


असच एक जग म्हणजे आपलं बालपण!... आणि खास करून शाळा!... 


लग्ना नंतर नवऱ्याच्या मित्रांच्या बायका मैत्रिणी बनतात...


मुलांच्या मित्र मैत्रिणींच्या आया मैत्रिणी बनतात... शेजारी पाजारी राहणाऱ्या मैत्रिणी असतात!.


पण या ज्या शाळेतल्या मैत्रिणी असतात ना... त्यांच्यासाठी तुम्ही कायम तश्याच शाळेतल्या सारख्या राहता... त्यांचा अजूनही तुमच्यावर तसाच हक्क असतो... त्या अजूनही तुमच्याशी तश्याच बोलू शकतात!... 


काल माझ्या मैत्रिणींना... माझ्यातल्या एका जगाला मी पुन्हा नव्याने भेटले... त्यासागळ्या अजूनही मला बिनधास्त काहीही म्हणू शकतात.... आणि मला ते आवडतय!!...."


"बेसिकली तुला व्हेंट आऊट होण्यासाठी जागा मिळाली आहे... हो ना??..." नवऱ्याने विचारलं...


तशी ती म्हणाली "हो... पण सास - बहू‌ आणि फॅमिली ड्रामा वगैरे टॉपिक ban आहेत बरका!..."


" बरं झालं सांगितलस ते... मी घाबरलो होतो ना!"... नवरा म्हणाला


तशी ती त्याच्याकडे बघून भुवया उडवत म्हणाली... " का?... घाबरण्यासारख काही केलं आहे का तुम्ही??"

तो एक क्षणभर गोंधळाला... तशी ती हसली.. मग दोघंही खळखळून हसले!!!...


नवरा निघून गेला तशी ती विचार करू लागली... " खरंच... बायकांचं होतं नाही असं... एका टप्प्यानंतर त्यांना बाकी कश्याही पेक्षा गरज असते ती एका सखीची!... जी मैत्रिणी पेक्षा थोडी पुढची कडी असते!... जी आजूबाजूची परिस्थिती कशीही असली तरी नवी दृष्टी मिळवायला मदत करते!... हात देऊन पुढे नेते!!... 

... आणि अचानक मला तोच खजिना मिळाला... या सख्यांच्या रूपात!!"



style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-7384059194066495"
data-ad-slot="7297264882">

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या