बनारस आणि मराठे !
दिल्ली हादरवून सोडल्यानंतर उत्तर भारतात मराठ्यांची चांगलीच जरब बसली होती. मध्य भारतात एक प्रमुख शक्ती केंद्र म्हणून मराठा साम्राज्य उदयास आला होता. आधुनिक बनारस ही मराठ्यांचीच देण आहे. बनारस हे शहर अनेकदा आक्रमकांकडून तोडलं गेलं आणि पुनर्स्थापित केलं गेलं. मात्र बनारसला त्याचं हिंदू स्वरूप आणि त्याच्या प्राचीन संस्कृतीची ओळख मराठ्यांनीच मिळवून दिली. १७-१८व्या शतकातील काही काळ काशी किंवा बनारस मराठ्यांच्या नियंत्रणाखाली होता. याठिकाणी सिंधिया (शिंदे), होळकर, भोसले आणि पेशवा कुटुंबियांच्या सरदारांनी, राजांनी बनारसच्या गंगा घाटांचा निर्मिती आणि इतर घाटांचा जीर्णोद्धार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच याठिकाणी अनेक मंदिरं आणि धर्मशाळासुद्धा मराठ्यांनी बांधल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक काशी स्थित गागा भटांनीच केला होता. तसेच आग्राच्या कैदेतून सुटका झाल्यानंतर महाराज काही दिवस काशीमध्ये वास्तव्यास होते, असाही उल्लेख आढळतो.
नागपूरच्या शाही मराठा घराण्याने येथील दरभंगा घाटाची निर्मिती केली होती. या घाटावर १८व्या शतकातील मराठा वास्तुकलेचं उत्तम उदाहरण तुम्ही पाहू शकता. तसेच येथील सिंधिया घाट, बाजीराव घाट, राजा ग्वालीयर घाट, मणिकर्णिका घाट, राजा घाट, अहिल्या घाट इ. घाट मराठ्यांनीच बांधले आहेत. गंगा घाटांवरील सर्वात प्रसिद्ध घाटांपैकी एक असलेला दशाश्वमेध घाटसुद्धा पेशवा नानासाहेब यांच्या आदेशानुसार सदाशिव नाईक या मराठा सरदाराने १७३५ मध्ये बांधले. नारायण भट पैठणकर नावाचे पंडित काशीमध्ये होते, त्यांनी याठिकाणी दुर्गा घाट, ब्रह्म घाट, विलोचन घाट हे तीन घाट बांधले होते. मुंशी घाट हा नागपूरच्या भोसले घराण्याचे अर्थमंत्री श्रीधर नारायण मुंशी यांनी १९१२ ते १९२४ दरम्यान बांधला होता. १९व्या शतकाच्या सुरुवातीला मराठा राणी बायजाबाई सिंधिया (शिंदे) यांनी गाय घाट आणि सिंधिया घाट बांधून घेतला.
बनारसला स्वतःच्या पायावर उभं करण्याचं खरं श्रेय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जातं. औरंगजेबाने बाटवलेलं काशी विश्वनाथ मंदिर अहिल्याबाईंनी पुनर्स्थापित केलं, तसेच अनेक मोडकळीस आलेल्या घाटांचा जीर्णोद्धारही केला, अनेक मंदिरे बांधली. पंचगंगा घाटावर असलेला दीपस्तंभदेखील अहिल्याबाईंनी बांधला आहे. त्यांनी दिलेल्या योगदानामुळे येथील एका घाटाला अहिल्या घाट असे नाव दिलं गेलं. झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हणजेच मणिकर्णिका तांबे यांचा जन्मदेखील बनारसचाच आहे.
मराठ्यांनी कधीही बनारसवर थेट राज्य करण्याचं ठरवलं नाही. त्यांनी काशी, अयोध्या, मथुरा असे अनेक प्रमुख तीर्थक्षेत्र आक्रमाकांकडून वाचवण्यासाठीच लढा दिला. मध्य भारत मराठ्यांच्या नियंत्रणाखाली आल्यानंतर या क्षेत्रांवर हल्ला करण्याची धमक कोणामध्येही उरली नाही!
जयोस्तु मराठा!🚩
0 टिप्पण्या