निंदेचं फळ !
एकदा काय झालं, की एका राजानं आपल्या राज्यामध्ये अशी दवंडी पिटवली की राजा उद्यापासून रोज शंभर आंधळ्या लोकांना खीर खाऊ घालणार आहे.
झालं, दुसऱ्या दिवसापासून राज्यातले शंभर आंधळे लोक राजाकडे येऊन रोज जेवून जाऊ लागले. एक दिवशी असं झालं की खीरीच्या दुधामध्ये एका सापानं तोंड घातलं आणि दुधामध्ये त्यानं आपलं विष ओकून टाकलं. त्यामुळे त्यादिवशी खीर खाणारे 100 आंधळे लोक मरण पावले.
या घटनेमुळे राजा खूप दुःखी झाला. आपल्याला आता शंभर लोकांच्या हत्येचं पाप लागणार या विचाराने तो वेडाच झाला.
दुःखाने वेडा झालेला राजा आपलं राज्य सोडून जंगलाकडे निघाला. तिथं आपण घोर तपश्चर्या करावी जेणेकरून तपस्येमुळे आपल्याला या पापातून मुक्ती मिळेल असा विचार राजानं केला.
जंगलाकडे जाताना वाटेत त्याला एक गांव लागलं. राजानं गांवातल्या चावडीवर बसलेल्या लोकांना विचारणा केली की मला आज रात्रीला गांवात मुक्काम करण्यासाठी आपल्या गावामध्ये परमेश्वराची भक्ति करणारं एखादं कुटुंब आहे का?
चावडीवर बसलेले लोक म्हणाले की या गावात दोघं बहिण भाऊ राहतात ते ईश्वराचे निस्सिम भक्त आहेत. हे ऐकून राजा रात्रभर मुक्काम करण्यासाठी त्यांच्या घरी गेला.
सकाळी जेव्हा राजा झोपून उठला तेव्हा बहिण देवाच्या नामस्मरणात तल्लीन झाली होती. असं आज पहिल्यांदाच घडत होतं. आजवरचा तिचा नियम असा होता की दिवस उजाडण्याआधीच उठून नामस्मरण करावं आणि नामस्मरण आटोपल्यावर लगेच सकाळच्या न्याहारीच्या तयारीला लागावं.
परंतु त्या दिवशी ती खूप वेळ पर्यंत नामस्मरणच करीत बसली होती.
जेव्हा बहीण नामस्मरण आटोपून उठली तेव्हा तिचा भाऊ तिला म्हणाला, "ताई तू आज खूप उशिरा पर्यंत नामस्मरण करीत होतीस. अगं आपल्या घरी आज एक यात्रेकरु आलेला आहे. त्याला न्याहारी करून दूर जायचं आहे, म्हणून तू आज नामस्मरण लवकर आटोपायला हवं होतंस."
यावर ती म्हणाली, "दादा आज स्वर्गात एक समस्या निर्माण झाली होती. यमराजाला एका गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये महत्त्वाचा निर्णय घ्यायचा होता आणि त्याबद्दल यमराज काय निर्णय घेणार आहेत या उत्सुकतेपोटी मी तिथं थोडं अधिक काळ थांबली होती. म्हणूनच आज नामस्मरणातून मोकळं व्हायला मला नेहमीपेक्षा अधिक वेळ लागला.
"असं विशेष काय घडलं?" दादांनं विचारलं. तेव्हा बहिण उत्तरली की अरे एका राज्याचा राजा शंभर आंधळ्या लोकांना रोज खीर खाऊ घालत असे. पण सर्पदंशामुळे त्या खीरीत काल विष मिसळल्या गेलं आणि ही विषमिश्रीत खीर प्यायल्यामुळे काल ही खीर पिणारी 100 आंधळी माणसं मरण पावली. तेव्हा या 100 माणसांच्या मृत्यूचे पाप कोणाच्या माथी लावावं, राजाला की विषारी फुत्कार सोडणाऱ्या त्या सापाला की मग ती खीर भांड्यात तशीच उघडी टाकून देणाऱ्या आचाऱ्याला, याबाबत यमराजाचा गोंधळ उडाला आहे."
इकडे राजा हे सारं ऐकत होताच. बहिण भावात सुरू असलेलं हे संभाषण आपल्याशीच संबंधित आहे हे लक्षात आल्यावर राजाला ती पुढे काय सांगते हे ऐकण्यात विलक्षण रस वाटू लागला. म्हणून त्यांनं त्या मुलीला उत्सुकतेनं विचारलं, "मग पुढे काय झालं? यमराजानं काय निर्णय घेतला?"
"अजून पर्यंत तरी कसलाही निर्णय झालेला नाही." ती म्हणाली.
राजानं तिला विचारलं, "मी तुमच्या घरी आणखीन एका रात्रीपुरता राहू का?"
दोघा बहीणभावंडांनी राजाच्या म्हणण्याला आनंदाने रुकार दिला.
राजा दुसऱ्या दिवशी तिथंच थांबला. परंतु गावाच्या चावडीवर बसलेले लोक त्या दिवशी दिवसभर हाच विषय चघळीत बसले होते. ते म्हणत होते की काल जो माणूस आपल्या गावात केवळ एक रात्रभर मुक्काम करण्यासाठी आला होता आणि 'तुमच्या गावांमध्ये इश्वराची भक्ती करणारं कुणी कुटुंब आहे का' ही चौकशी तो आपल्यापाशी करीत होता, त्या माणसाच्या त्या तथाकथित भक्तीचं नाटक आता आपल्या समोर उघड झालेलं आहे. त्या घरात एक रात्र राहून दुसऱ्या दिवशी जाण्याच्या गोष्टी करणारा तो माणूस! त्या घरातील तरूण स्त्रीला बघून बहुधा त्याची नियत बिघडली. म्हणून तो त्या सुंदर आणि तरुण मुलीच्या घरी एकतर कायमचा मुक्काम तरी ठोकेल किंवा मग तो तिला घेऊन पळून तरी जाईल.
दिवसभर गांवाच्या चावडीवर त्या राजाची निंदानालस्ती होत राहीली.
दुसऱ्या दिवशी पहाटे ती मुलगी पुन्हा एकदा नामस्मरणात रंगली आणि रोजच्या ठरलेल्या वेळी तीनं आपलं नामस्मरण आटोपलं.
तिचं नामस्मरण आटोपल्यावर राजानं तिला विचारलं "बेटा, आंधळ्या माणसांच्या हत्येचे पातक शेवटी कोणाला लागलं मग?"
ती म्हणाली, "ते पाप तर आमच्या गावातल्या चावडीवर बसणाऱ्या लोकांनीच परस्पर आपसात वाटून घेतलं आहे."
निंदा करणं किती नुकसानकारक आहे पहा. निंदक नेहमी दुसऱ्यांची पापं आपल्या डोक्यावर वाहून नेत असतो आणि त्यांच्या द्वारे केल्या गेलेल्या पापकर्मांची फळं त्यालाच भोगावी लागतात. म्हणून आपण दुसऱ्या ची निंदा करणे सर्वथा टाळलं पाहिजे.
चावढीवर बसल्यानंतर कुणाची सुध्दा निंदा करू नये प्रत्यकाने हे पथ्य पाळावे
0 टिप्पण्या