द लास्ट राईड....The Last Ride Marathi Audiostory mp3

 द लास्ट राईड....
















विक्रम रिसेप्शनला जाण्यासाठी तयार होत होता... एकीकडे ओला बुक करत होता. दोन दिवस सतत पाऊस असल्यामुळे ओला मिळायला देखील वेळ लागत होता.. फायनली ओला झाली बुक. ओ टी पी नंबर, गाडी नंबर वगैरे डिटेल्स मिळाले. ड्राइवर पोचायला सात मिनिट तरी लागणार होतीच. तेवढ्या वेळात बिल्डिंग खाली उतरू मग फोन करू कॅबवाल्याला असं म्हणत तो रोडवर आला..


रस्त्यावर पाऊस धो धो कोसळत होता. एका हातात छत्री सावरत त्याने ड्राइवरला कॉल करून पाहिलं पण लागत नव्हता..रोडवर रहदारी तूरळक दिसत होती. इतक्यात एक पांढरी गाडी येताना दिसली. विक्रमने बुक केलेलीच गाडी होती ती.


विक्रम चटकन छत्री मिटून गाडीत मागे बसला. एवढ्या वेळात देखील तो एका साईडने भिजलाच.


गाडीत बसल्यावर त्याने स्वतः ओ टी पी नंबर दिला ड्रायवरला. पण ड्रायवरने ऐकून न ऐकल्या सारखं केलं.


काका तुमच्याकडे गुगल पे आहे ना? कारण माझ्याकडे दोन हजारची नोट आहे. सुट्टे पैसे नाही अजिबात, विक्रमने आधीच क्लिअर करायचं म्हणून विचारलं.


काका : असू दे बेटा.. आज माझा हा शेवटचा दिवस आहे गाडी चालवायचा. आज मी कुणाकडून पैसे नाही घेणार.


विक्रम : ओ थँक्स काका..


खूप पाऊस आहे ना काल पासून... थोडं सावकाश पोचलं तरी चालणार आहे हं मला... गाडी उगाच पळवू नका.


काका : काळजी नको करुस बेटा. मी तुला जिथे पोचवायचं तीथे व्यवस्थित पोचवीन.


विक्रम : काका तुम्ही सीट बेल्ट नाही लावलाय?


काका : अरे नेमका आजच तुटलाय.


विक्रमचं लक्ष जातं.. काकांच्या हातावरचं घड्याळ देखील बंद पडलेलं असतं. पण तो काही विचारत नाही त्याबद्दल.


काहीतरी बोलायचं म्हणून तो काकांना विचारतो.. तुमच्या घरी कोण कोण असतं काका?


काकांचा आवाज थोडा कातर झाल्यासारखा होतो. माझ्या घरी माझी बायको आणि दोन मुलं आहेत. पण आता ती मला कधीच नाही भेटणार..


नक्कीच काही तरी वाईट घडलं असणार त्यांच्या घरी... विक्रम अंदाज बांधतो. म्हणून पुढे काही विचारायचं टाळतो..


मध्ये मध्ये विक्रम एकसारखं फोन चेक करत असतो. पण गाडीत बसल्यापासून त्याला अजिबात नेटवर्क मिळत नाही.


थोड्याच वेळात त्याचा स्टॉप येतो. काका गाडी साईडला लावतात.


पावसाचा जोर कायम असतो. अगदी दहा फुटावरील गोष्ट दिसत नसते.


विक्रम परत एकदा काकांना पेमेंटबद्दल विचारतो. पण काका पैसे न घेण्याबद्दल ठाम असतात.


एवढ्या लांबवर त्यांनी आपल्याला पावसात आणून सोडलं शिवाय पैसे देखील नको म्हणतात, म्हणून तो बळेबळेच त्यांना आपलं घड्याळ काढून देतो. काकांचा नकार चालूच असतो पण शेवटी विक्रमच्या आग्रहाखातर ते घड्याळ ठेवून घेतात. आणि गाडी घेऊन निघून जातात.


इतक्यात विक्रमचा मोबाईल वाजतो. अरेच्या गाडीतून उतरलो आणि लगेच नेटवर्क आलं ... आश्चर्य करत तो फोन उचलतो.


ओला कंपनीकडून सॉरी बोलायला कॉल येतो. पलीकडून ऑपरेटर बोलत असते.. सॉरी सर.. पण तुम्ही बुक केलेल्या गाडीचा अपघात झाला हायवेवर. गाडीचा पार चुराडा झाला. ड्रायवर देखील ऑन द स्पॉट खल्लास झाला. आम्ही तुम्हाला कधीपासून ट्राय करतोय सर.. पण तुमचा नंबर लागतच नव्हता... अजून देखील तुम्ही सांगत असाल तर आम्ही वेगळी कॅब अरेंज करून देतो..


नो थँक्स... एवढ्या पावसात जायचा माझा मूड नाही आता.. विक्रम कॉल कट करतो. आणि मोबाईल खिशात ठेवतो. पण खिशात ऑलरेडी काही तरी असतं. विक्रम हात घालून पाहतो... आपण काकांना आग्रहाने दिलेलं घड्याळ आपल्या खिशात? तो ते आता हातावर बांधण्याऐवजी परत खिशात ठेवून देतो..


रिसेप्शनसाठी आलेले विक्रमचे मित्र रोडसाईडला चहाच्या टपरीवर सिगारेट पीत असतात.. एक दोन कश मारल्यावर विक्रमचं डोकं थोडं ताळ्यावर येतं. त्यातल्याच एकाच्या हातात तो आणलेलं गिफ्ट देतो आणि आल्या पावली परत निघतो....


असा काय हा? एवढ्या लांब पावसात आला काय? आणि रिसेप्शन अटेंड न करता निघाला काय? विक्रमचे मित्र नवल करत राहतात..


अरे विक्रम थांब... ते त्याला आवाज देऊन थांबवायचा प्रयत्न करतात. पण विक्रम कुठलाही प्रतिसाद न देता तिथून स्टेशनच्या दिशेने चालता होतो. आता जाताना परत कॅब बुक करावी हा विचारदेखील त्याला शिवत नाही.


************************************


नुकतीच माझ्या पाहण्यात " द लास्ट राईड " नावाची शॉर्ट फिल्म आली... तीचा स्वैर अनुवाद करण्याचा हा प्रयत्न. 


समाप्त


राजेंद्र भट






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या