इतिहासात आपण पाहिलंच असेल की सर्व साधारणपणे बरेच राजे महाराजे हे वंश परंपरागत पद्धतीने किंवा कटकारस्थान करून राज गादीवर विराजमान झाले आहेत. आता त्यांचा हेतू हा खरंच लोककल्याणाचा होता की फक्त अधिसत्ता गाजवण्याचा होता हा एक चिंतनाचा विषय आहे. कारण असे किती राजे आले आणि गेले पण माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे हाताच्या बोटांवर मोजण्या इतकेच आहेत असं मला वाटतं.त्या पैकीच एक नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज! कारण त्यांनी लोकांच्या हृदयात त्यांचं अढळ असं स्थान निर्माण केलं आहे जे त्यांच्या अद्वितीय कर्तबगारीचं प्रतिक आहे. काय होती ही कर्तबगारी व कशाच्या आधारावर होती? याचं विश्लेषण करण्याचा मी प्रयत्न केला आहे.
शिवाजी राजेंचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर या ठिकाणी शिवनेरी गडावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी जिजाऊ यांच्या पोटी झाला. त्या काळात मुघल साम्राज्याने बऱ्यापैकी आपलं अस्तित्व निर्माण केलं होतं. अशा परिस्थितीत स्वराज्याचं स्वप्न जिजाऊ यांनी पाहिलं आणि शिवबाला त्या परीने घडविले. स्वराज्याचं बाळकडू जिजाऊ यांनी शिवरायांना पाजलं आणि स्वराजाच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू झाली. या सर्व प्रवासात शिवरायांच्या गुरू होत्या खुद्द राजमाता जिजाऊ.
एका राजाला ज्या विद्या व कला अवगत असाव्या लागतात त्या सर्व जिजाऊ यांनी शिवबाला शिकविल्या आणि शिवरायांचं स्वराज्यात पहिलं पाऊल पडलं ते तोरणा किल्ला जिंकून ते ही अगदी बालवयात. पुढे त्यांच्या अंगी असलेल्या अष्टपैलू गुणांच्या आधारे त्यांनी सर्व आव्हानांना सामोरं जावून स्वराज्य उभारलं. आज जनमानसात रयतेचा राजा म्हणून त्यांची ख्याती आहे. याला कारण की त्यांनी प्रत्येक वेळी फक्त रयतेचा आणि त्यांच्या कल्याणाचा विचार केला आहे. तसेच त्या दृष्टीने उपाययोजना केल्या आहेत.
शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही धक्का लागता कामा नये अशी त्यांची भूमिका होती. शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे तसेच त्याची व्याप्ती वाढली पाहिजे त्यासाठी परमुलुखात तो विकण्याची त्यांनी सोय सुद्धा केली. दुष्काळ व टंचाईच्या काळात शेतकऱ्यांना विविध प्रकारची मदत ते करीत असत.जसे की बैलजोडी, धान्य, किंवा इतर उपयोगी वस्तू देणे इत्यादी. त्याचप्रमाणे चारा पाणी जपून वापरा म्हणून रयतेला वेळोवेळी आव्हान सुद्धा करत. शेतकऱ्यांच्या हितासाठी तिजोरीवर भार पडला तरी बेहत्तर अशी त्यांची भूमिका असायची. त्याकाळी सुद्धा दुष्काळ पडत असे पण कोणत्याही कारणासाठी शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली नाही व ती येऊ दिली नाही. कारण शेतकरी संदर्भात ते सतत दक्ष असत व तसा आदेश आपल्या मंत्रीमंडळाला सुद्धा देत.
शिवाजी राजे एक महान संघटक सुद्धा होते. त्यांनी कधी माणसा माणसांमध्ये भेदभाव केला नाही की कोणत्याही प्रकारची अस्पृश्यता पाळली नाही. स्वराज्यामध्ये अठरापगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी एक आदर्श निर्माण केला. त्यांनी कधीच इतर धार्मिक स्थळांची नासधूस केली नाही व कोणाच्या धार्मिक भावना दुखावतील असे कृत्यही केले नाही. राजे विज्ञानवादी विचारसरणीचे होते. त्यांनी त्यांच्या हयात जीर्णरूढी व जाचक प्रथा-परंपरा नाकारल्या. शहाजीराजे यांच्या निधनानंतर जिजाऊ यांना सती जाण्यापासून शिवाजी राजेंनी सुद्धा परावृत्त केले होते. त्यांनी अनेक किल्ले बांधले पण त्यासाठी कधीच मुहूर्त, वास्तुशास्त्र, पंचांग अशा गोष्टींना स्थान दिले नाही.शकुन अपशकुन अंधश्रद्धा या गोष्टी कधी मानल्या नाहीत. एक उदाहरण द्यायचे झाले तर २४ फेब्रुवारी १६७० रोजी जेंव्हा सोयराबाई यांच्या पोटी राजारामचा जन्म झाला तेव्हा तो पालथा जन्माला आला होता. त्याकाळी पालथं जन्माला येणे हा अपशकुन मानीत असत. पण शिवाजी महाराजांनी या घटनेला सकारात्मक दृष्टीने घेऊन असं सांगितलं की हा दिल्लीची पातशाही पालथी घालील.ते आपल्या रयतेतील सर्वांना समान वागणूक देत असत. म्हणूनच प्रसंगी त्यांच्यासाठी जीवाची पर्वा न करता लढणारे शूरवीर कमी नव्हते. इतके प्रेम करायचे सर्व त्यांच्यावर आणि ते सुद्धा त्यांच्या प्रजेवर.
परस्त्री आई समान या तत्वानुसार ते जगले. त्यांच्या राज्यात स्त्री अत्याचार आरोपातील गुन्हेगाराला कठोरातील कठोर शिक्षा केली जात असे. त्यामुळे स्रियांकडे वाकडी नजर करून बघण्याची कोणाची हिंमतच होत नव्हती. पीडितांना न्याय देताना त्यांनी कधीच भेदभाव नाही केला. गुन्हेगार कोणीही का असेना त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे या मतावर ते ठाम असत.युद्ध प्रसंगी कोणत्याही स्त्रीवर अन्याय व अत्याचार होणार नाही याची ते विशेष काळजी घेत व तशा सूचना आपल्या सैनिकांना सुद्धा करत.
शिवाजी राजे एक दूरदर्शी व स्थापत्यकला जोपासणारे व्यक्तीमत्व सुद्धा होते. स्वराज्याचा विस्तार होत असताना तो अधिक प्रभावी व शक्तिशाली व्हावा त्यासाठी घोडदळ आणि पायदळ या बरोबरच त्यांनी आरमार दल सुद्धा असावं या जिज्ञासापोटी आरमार दलाची संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात उतरवली. आरमार दल म्हणजेच आजची नेव्ही म्हणता येईल. कल्याण येथील दुर्गाडी किल्ला हा आरमारचं एक प्रतीक आहे. थोडक्यात तो जहाजांचा कारखाना म्हणूनच उभारण्यात आला. तसेच भिवंडी व इतर ठिकाणी त्यांनी आरमाराची स्थापना केली आणि स्वराज्याला अधिक प्रबळ व शक्तिशाली बनविले.
छत्रपती शिवरायांकडून शिकण्या सारखी अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे संयम. राजे आक्रमक तेवढेच संयमी सुद्धा होते. रागाच्या भरात किंवा कठीण परिस्थितीत त्यांनी कधीच आपला मानसिक समतोल ढासळू दिला नाही. मुघलांनी शिवाजी राजांना चित करण्यासाठी अनेक कट व कुरघोड्या रचल्या. त्यांना आपल्या तावडीत पकडण्यासाठी खूप हाहाकार माजविला पण महाराज जराही डगमगले नाहीत. त्यांनी शत्रूचा मनसुबा ओळखला होता त्यामुळे किंचित ही विचलित न होता संयम ठेऊन प्रतिउत्तर देण्यासाठी योग्य संधीची वाट पाहिली व योग्यवेळी त्यांना सडेतोड उत्तर सुद्धा दिले.
त्यांनी प्रत्येक वेळी परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसारच रणनीती आखली आहे...कधी थेट आक्रमण तर कधी गनिमीकावा करून तर कधी प्रसंगी तह करावा लागला तरी तो स्वीकारला आहे. आपल्या तल्लख बुद्धीच्या शक्तीने व युक्तीने ते अनेकवेळा बंदिस्त असताना सुद्धा शत्रूच्या छावणीतून सहज निसटले आहेत आणि त्या नंतर परत संधी पाहून त्यांनी पुन्हा जोमाने प्रतिकार सुद्धा केला आहे. यालाच म्हणतात उत्तम राजकारणी.
राजे स्वतः नियोजन तज्ञ होते. इतक्या मोठ्या स्वराज्याचा डोलारा उभा करणे हे कोणत्याही नियोजन तज्ज्ञाशिवाय शक्य नाही. शिस्तप्रिय शासन व अष्टप्रधान मंत्रिमंडळ यांच्या नेतृत्वाखाली ते स्वराज्यातील प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून असायचे. युद्धाची आखणी आणि राजकारभार सुरळीत चालविण्यासाठी लागणारे शिस्तबद्ध शासन व विस्तारित संघटना बांधणी हे त्याच नियोजनाचा एक भाग आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल तसेच त्यांच्या अंगी असलेल्या विविध गुणांबद्दल सांगण्यासारखं आणि त्यातून शिकण्यासारखं खूप काही आहे. आपण जसे जसे त्यांना वाचत जाऊ तसे तसे महाराज आपल्याला नव्याने उलगडत जातात आणि आपल्यामध्ये लढण्याची, जिंकण्याची आणि जगण्याची नवीन उमेद, ऊर्जा आणि ताकद निर्माण करतात.
सरतेशेवटी शिवरायांना अभिवादन करून सर्वांना एवढंच सांगणं आहे की वाचत रहा... इतिहास तुम्हाला जगायला व आपलं अस्तित्व टिकवून ठेवायला मदत करेल.
धन्यवाद!
0 टिप्पण्या